राष्ट्रीय पिकबॉल स्पर्धेत गोव्याच्या नोएलला रौप्यपदक


22nd May 2023, 12:29 am
राष्ट्रीय पिकबॉल स्पर्धेत गोव्याच्या नोएलला रौप्यपदक

क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : राष्ट्रीय मानांकन पिकबॉल स्पर्धेत गोव्याच्या नोएल नोरोन्हा याला रौप्यपदक प्राप्त झाले. ही स्पर्धा टेनिस कोर्ट, फातोर्डा, मडगाव येथे गोवा पिकबॉल असोसिएशनने अखिल भारत पिकबॉल असोसिएशन (एआयपीए) व युवा आणि क्रीडा व्यवहार संचलनालय यांच्या सहकार्याने आयोजित केली आहे.

महाराष्ट्रातील स्नेहा पाटील हिने दुहेरी सुवर्णपदक मिळवले. स्नेहा पाटीलचे अपवादात्मक कौशल्य आणि दृढनिश्चय पूर्ण दिसून आला. तिने वृषाली ठाकरे सोबत मिळून महिला दुहेरी गटात विजय मिळवला.

स्नेहाची शानदार कामगिरी १९ वर्षांखालील मुलींच्या एकेरीतही कायम राहिली. या आशियाई सुवर्णपदक विजेत्याने आणखी एक सुवर्णपदक जिंकले. स्तव्या भसीनने १४ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील गटात सुवर्ण आणि एक रौप्यपदक जिंकले. अदिती सिंग, दिव्यांशु कोटारिया आणि संदीप तावडे हे दिवसाचे इतर उल्लेखनीय विजेते होते.

गोव्याच्या नोएल नोरोन्हा या माजी राज्य टेबल टेनिस चॅम्पियनने पुरुष एकेरी ५०+ गटात रौप्य पदक जिंकले. नोएलच्या उल्लेखनीय कामगिरीने गोमंतकीयांना रोमांचित केले आणि त्याचे अपवादात्मक सर्वांगीण कौशल्य आणि क्षमता प्रदर्शित केली. माजी राष्ट्रीय टेबल टेनिस चॅम्पियन ईशा लखानीने महिला दुहेरीत रौप्यपदक पटकावले.

सुरुवातीच्या दोन दिवसांत महाराष्ट्राने सर्वाधिक सुवर्णपदके मिळवत इव्हेंटमध्ये वर्चस्व राखले. याशिवाय राजस्थान, छत्तीसगड आणि यजमान गोवा या राज्यांनीही आपली कामगिरी दाखवली आणि पदक विजेत्यांमध्ये ते पुढे राहिले.

सविस्तर निकाल खालीलप्रमाणे : 

महिला दुहेरी सुवर्ण : वृषाली ठाकरे / स्नेहल पाटील (महाराष्ट्र), रौप्य : ईशा लखानी / उर्वी अभियानकर (महाराष्ट्र), कांस्य : सौम्या लेले / अनुजा माहेश्वरी (महाराष्ट्र).

१४ वर्षांखालील मुलगे एकेरी : सुवर्ण : स्तव्य भसीन (महाराष्ट्र), रौप्य : अर्जुन सिंग (महाराष्ट्र), कांस्य : जितेश निषाद (छत्तीसगड).

१९ वर्षांखालील मुली एकेरी : सुवर्ण : स्नेहल पाटील (महाराष्ट्र), रौप्य : लक्षिता चितळे (महाराष्ट्र), कांस्य : अदिती सिंग (महाराष्ट्र).

१४ वर्षांखालील मुली एकेरी : सुवर्ण : अदिती सिंग (महाराष्ट्र), रौप्य : किरण पाटील (महाराष्ट्र), कांस्य : काव्या नंदरदाणे (महाराष्ट्र).

पुरुष एकेरी ५०+ : सुवर्ण : संदीप तावडे (महाराष्ट्र), रौप्य : नोएल नोरोन्हा (गोवा), कांस्य : ठाकूरदास रोहिरा (महाराष्ट्र).

१४ वर्षांखालील मुली दुहेरी : सुवर्ण : अंजली पोळ / जिनीशा के श्रीसागर (महाराष्ट्र), रौप्य : अदिती सिंग / श्रद्धा चव्हाण (महाराष्ट्र), कांस्य : काव्या नंदरदाणे / आराध्या सातपुते (महाराष्ट्र).

१९ वर्षांखालील मुलगे एकेरी : सुवर्ण : दिव्यांशू कोटारिया (राजस्थान), रौप्य : स्तव्य भसीन (महाराष्ट्र), कांस्य : अनुष पोपली (महाराष्ट्र).