महिलांसाठी व्हिटॅमिन डी

शरीर निरोगी ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला प्रथिने, लोह, कार्बोहायड्रेट इत्यादी पोषक तत्त्वे आवश्यक असतात त्याच प्रकारे शरीराला व्हिटॅमिन डी ची देखील आवश्यकता असते. सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डी चा सर्वात मोठा स्रोत मानला जातो. चला तर मग आज बोलूया महिलांमध्ये दिसून येणाऱ्या व्हिटॅमिन डी च्या कमतरतेबद्दल...

Story: आरोग्य | डॉ. श्वेता राऊत मुळगावकर |
19th May 2023, 09:06 pm
महिलांसाठी व्हिटॅमिन डी

व्हिटॅमिन डी महत्त्वाचे का आहे?

व्हिटॅमिन डी आपल्या कार्यात अन्य व्हिटॅमिनपेक्षा पूर्णपणे वेगळे व आपल्या शरीरातील हाडे मजबूत बनवण्यासाठी आणि दाताचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आवश्यक असते. शरीरामध्ये याचा अभाव निर्माण झाल्याने आपल्याला अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते. शरीरातील कॅल्शियम, आयरन, मॅग्नेशियम इत्यादीचे शोषण करण्यामध्ये व्हिटॅमिन डी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. हे महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी व शरीराला बळकट करण्यासाठी खूप महत्त्वाचे असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती आणि हाडे मजबूत राहतात. पण पुरुषांच्या तुलनेत भारतीय महिलांमध्ये व्हिटॅमिन डी कमी प्रमाणात आढळते. संशोधनानुसार, व्हिटॅमिन डी ची कमतरता असलेल्या महिलांना हृदयविकार, स्ट्रोक, मधुमेह आणि उच्च रक्तदाब होण्याची शक्यता असते. जर गर्भधारणेदरम्यान व्हिटॅमिन डी ची पातळी कमी झाली तर प्री-एक्लॅम्पसिया, थायरॉईडचा त्रास, मधुमेह (जॅस्टेशनल डायबिटीज) यासारखी स्थिती उद्भवते. 

व्हिटॅमिन डी ची कमतरता कशामुळे होते?

  1. सर्वसाधारणपणे, व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची दोन मुख्य कारणे आहेत:
  2.  आहारात किंवा सूर्यप्रकाशामुळे पुरेसे व्हिटॅमिन डी न मिळणे.
  3.  शरीरात व्हिटॅमिन डी चे योग्यरित्या शोषण न होणे. 
  4. महिलांमध्ये व्हिटॅमिन डी कमतरता का असते:

वेळोवेळी हार्मोनल बदल झाल्याने, रजोनिवृत्तीनंतर, गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीनंतर दूध पाजणाऱ्या महिलांमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. भारतीय महिला मुख्यतः घरगुती कामात किंवा ऑफिसमध्ये व्यस्त असल्यामुळे त्यांना व्हिटॅमिन डी युक्त असलेला कोवळा सूर्यप्रकाश लाभत नाही. भारतीय स्त्रिया सहसा साडी किंवा सूट घालतात, ज्यामुळे त्यांच्या शरीराचा जास्तीत जास्त भाग कपड्यांनी झाकलेला असतो, हे देखील भारतीय महिलांमध्ये व्हिटॅमिन डी च्या कमतरतेचे कारण असू शकते. तसेच अन्नातील शुद्ध तेलाच्या वापरामुळे शरीरात कोलेस्टेरॉलचे कमी कण तयार होतात, जे कण खरं तर शरीरात व्हिटॅमिन डी तयार करण्यात मोठा हातभार लावतात. त्यामुळे शरीरात व्हिटॅमिन डी च्या प्रक्रियेत अडचण येते.

गरोदरपणातील व्हिटॅमिन डी ची कमतरताः

गरोदरपणात व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे बाळाच्या वजनावर परिणाम होऊ शकतो, रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो, रक्तातील साखरेची पातळी वाढण्यामुळे मधूमेह होण्याचा धोका वाढतो. गर्भावस्थेमध्ये कोवळ्या उन्हामध्ये न बसणे, बाहेर जाणे कमी करणे, व्हिटॅमिन डी युक्त पदार्थांचे सेवन न करणे, स्किन पिग्मेंटेशन, सनस्क्रिनची वापर जास्त प्रमाणात केल्याने शरीरामध्ये व्हिटॅमिन डी  ची कमतरता होते. हे गरोदरपणातील २०व्या आठवड्यामध्ये बहुतेक महिलांमध्ये दिसून येते. व्हिटॅमिन डी च्या सेवनामुळे बाळाचा विकास योग्य पध्दतीने होतो व वेळेच्या आधी बाळाचा जन्म होण्याची शक्यता कमी होते. 

रजोनिवृत्तीतील व्हिटॅमिन डी ची कमतरताः

हाडांची झीज वाढत्या वयाबरोबर वाढते आणि त्याचा प्रभाव स्त्रियांमध्ये स्पष्टपणे दिसून येतो. रजोनिवृत्तीच्या दरम्यान याचा प्रभाव वाढतो. साधारणपणे ४५ ते ६० वर्षे वयामध्ये मासिक पाळीत खंड पडल्याने स्त्रियांमध्ये मूड स्विंग, चिंता आणि हार्मोनल असमतोल होतो. शरीरात कॅल्शिअमचे शोषण झपाट्याने कमी होते, हाडे अशक्त नी अधिक मऊ होतात. वजन आणि शक्ती कमी होऊन ‘स्पॉंजी बोन’ म्हणजे हाडे ठिसूळ होतात आणि फ्रॅक्चर होण्याचा धोका वाढतो, व हे ऑस्टिओपोरोसिसला कारणीभूत ठरते. अधिक प्रमाणात जीवनसत्त्व डी शरीरास मिळाल्याने रजोनिवृत्तीच्या लक्षणात घट होते, ज्यामुळे हाडांची घनता सुरक्षित राहते. म्हणून  ४५ ते ६० वर्षे वयोगटातील स्त्रियांनी नियमितपणे याची तपासणी करून घेतली पाहिजे.

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची लक्षणेः

लगेच थकवा येणे, सांधे दुखणे, पाय सुजणे, बराच वेळ उभे राहण्यात अडचण येणे, स्नायू कमकुवत होणे, शरीरावर डाग पडणे, वजन वाढणे, त्वचा काळी पडणे ही व्हिटॅमिन डी च्या कमतरतेची लक्षणे आहेत. 

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या समस्याः

हाडे आणि स्नायू कमकुवत होणे - व्हिटॅमिन डी, कॅल्शियम शोषण आणि हाडांच्या आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे, हाडांची घनता कमी होते, ज्यामुळे हाडे फ्रॅक्चर होण्याची शक्यता खूप जास्त असते. यामध्ये व्यक्तीला हाडे आणि स्नायूंमध्ये सतत वेदना जाणवू लागतात.

प्रतिकारशक्ती कमकुवत होणे- व्हिटॅमिन डीची एक महत्त्वाची भूमिका म्हणजे आपली प्रतिकारशक्ती मजबूत ठेवणे. ज्यामुळे रोग निर्माण करणाऱ्या विषाणूंशी लढणे शक्य होते. व्हिटॅमिन डी पातळी कमी असल्यास वारंवार फ्लू, ताप आणि सर्दी होण्याची शक्यता असते.

तणाव आणि नैराश्य- महिलांमध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता जास्त प्रमाणात आढळते. कमतरतेमुळे महिलांना अनेकदा चिंता आणि थकवा जाणवतो ज्यामुळे त्या दिवसभर निराश राहतात. ज्याचा नंतर आरोग्यावर वाईट परिणाम होतो. दुखापत बरी होण्यास वेळ लागतो- शस्त्रक्रिया किंवा दुखापतीनंतर जखम भरून येण्यास वेळ लागत असल्यास ते सूचित करते की व्हिटॅमिन डी पातळी खूप कमी आहे.

व्हिटॅमिन डी ची कमतरता कशी दूर करावी 

  1.  दररोज सकाळी १० ते १५ मिनिटे ऊन पडण्याआधीचा कोवळा सूर्यप्रकाश घ्यावा.
  2.  वजनावर नियंत्रण ठेवा, लठ्ठपणा वाढल्याने शरीरात व्हिटॅमिन डी ची कमतरता सुरू होते.
  3.  आहारात फॅटी फिश आणि मशरूम यासारख्या जीवनसत्त्वांनी समृद्ध पदार्थांचा समावेश करा.
  4.  जेवणात कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ वापरा.
  5.  नियमितपणे किमान २ ग्लास दूध प्या, गाईचे दूध पिण्याचा प्रयत्न करा.
  6.  वैद्यकीय सल्ल्यानुसार व्हिटॅमिन डी चे सप्लीमेंट्स चालू करा.