संसदेत विरोधकांचा काळ्या कपड्यात निषेध

राहुल गांधीना अपात्र केल्याने संतप्त : तृणमुलसह १७ पक्षांचाही समावेश


28th March 2023, 01:00 am
संसदेत विरोधकांचा काळ्या कपड्यात निषेध

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

दिल्ली : संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारी सुरू होताच स्थगित करण्यात आले. अदानी आणि राहुल यांच्या अपात्र प्रकरणी विरोधकांच्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत आणि लोकसभेचे कामकाज ४ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले होते. राहुल गांधी यांना संसदेतून अपात्र ठरवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचे खासदार काळे कपडे घालून संसदेत पोहोचले होते.

राहुल गांधी यांच्यासाठी काँग्रेससह एकत्र आलेल्या विरोधकांनी मोदी सरकारला घेरण्यास सुरूवात केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी काळे कपडे घालून सरकारचा निषेध नोंदवला. सोनिया गांधी यांनीही या आंदोलनाला साथ दिली. अदानी आणि राहुल गांधींवरील अपात्रतेची कारवाई या दोन्ही मुद्द्यांवरून संसदेत हंगामा झाला. त्यानंतर कामकाज स्थगित करण्यात आले.

लोकशाहीचा काळा अध्याय : खर्गे

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट केले की, लोकशाहीसाठी ‘काळा अध्याय’ सत्ताधारी पक्ष पहिल्यांदाच संसद ठप्प करत आहे. का? कारण मोदीजींच्या जिवलग मित्राची काळी कृत्य उघड होत आहेत. विरोधक जेपीसीच्या मागणीवर ठाम असल्याचे खर्गे म्हणाले.

काँग्रेस खासदार सौरव गोगोई म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधीचे सदस्यत्व यासाठी रद्द केलं कारण ते अदानीवर बोलू पाहात होते. राहुल गांधींवर आरोप करण्यात आले. त्यांच्याविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले पण त्यांना एकदाही बोलू दिले गेले नाही. त्यामुळे हा सगळा प्रकार निषेधार्हच आहे. काँग्रेस खासदार रंजीत रंजन म्हणाले की, लोकशाहीचा आवाज दाबण्याचा हा प्रकार आहे. लोकसभेत सत्ताधारी हे विरोधकांचा आवाज दाबू पाहात आहेत. जर घोटाळा झाला तर त्यावर बोलायचे नाही का? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

खर्गे यांच्या दालनात विरोधकांची बैठक

संसदेचे अधिवेशन सुरू होण्यापूर्वी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी संसदेतील त्यांच्या चेंबरमध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. काँग्रेस, द्रमुक, सपा, जेडीयू, बीआरएस, सीपीएम, आरजेडी, एनसीपी, सीपीआय, आप आणि टीएमसीसह १७ पक्ष या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीला तृणमूल काँग्रेसची उपस्थिती आश्चर्यकारक होती. याबाबत खर्गे म्हणाले की, लोकशाही रक्षणासाठी जो पुढे येईल त्याचे स्वागत करू.

हेही वाचा