इस्रायलमध्ये जनआंदोलन; नेतन्याहूंच्या घराला घेराव

न्यायालयीन सुधारणा विधेयकाचा विरोध : संरक्षण मंत्री बडतर्फ


28th March 2023, 12:56 am
इस्रायलमध्ये जनआंदोलन; नेतन्याहूंच्या घराला घेराव

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

तेल अवीव : इस्रायलमध्ये नेतन्याहूंनी वादग्रस्त न्यायालयीन सुधारणा विधेयक मागे घेण्याच्या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनादरम्यान लोकांनी इस्रायलच्या तेल अव्हीवचे मुख्य रस्ते ब्लॉक केले.

नेतन्याहूंच्या न्यायालयीन सुधारणा विधेयकाच्या विरोधात बोलल्याने तिथे संरक्षण मंत्री योआव्ह गॅलेंट यांना बडतर्फ केले आहे. योआव्ह यांनी शनिवारी टीव्हीवर एका कार्यक्रमात म्हटले होते की, देशातील न्यायालयाला कमकुवत करण्यासाठी जे विधेयक आणले गेले आहे, त्याने सैन्यात फूट पडत आहे. यामुळे देशाच्या सुरक्षेला धोका आहे. सरकारने विरोधकांसोबत बसून चर्चा करायला हवी.

नेतन्याहूंच्या घराबाहेर सुरक्षा कर्मचाऱ्यांना भिडले आंदोलक

इस्रायलच्या लोकांनी रविवारी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंच्या वैयक्तिक निवासस्थानासमोरही जोरदार आंदोलन केले. पोलिस लोकांत तणाव निर्माण झाला. तर आंदोलनादरम्यान लोकांनी थाळ्याही वाजवल्या. अनेकांनी महामार्गावर आगही लावली.

एका आंदोलकाने बीबीसीला सांगितले की, नेतन्याहूंनी देशाची लोकशाही धोक्यात टाकण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. प्रकरण वाढताना पाहून अमेरिकेनेही इस्रायलमधील आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. व्हाईट हाऊसचे प्रवक्ते म्हणाले की इस्रायलने लवकरात लवकर या प्रकरणावर तोडगा काढायला हवा.

इस्रायलमध्ये केवळ सामान्य नागरिकच नव्हे तर मोठ्या पदांवरील पोलीस अधिकारी आणि व्यावसायिकही सरकारच्या निर्णयाला विरोध करत आहेत. यापूर्वी १२ मार्च रोजी झालेल्या आंदोलनात तेल अवीव्हचे पोलीस प्रमुख एमिशाई अशेद यांनी सहभागी होत सरकारला झटका दिला होता. ते आंदोलनात सहभागी होतात नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. मात्र, यानंतर त्यांना पदावरून हटवून दुसरीकडे बदली करण्यात आली.