महाराष्ट्रात पुन्हा उघडू लागले कोविड वॉर्ड

देशात सक्रिय कोरोना रुग्ण संख्या १० हजारांच्या पुढे


28th March 2023, 12:55 am
महाराष्ट्रात पुन्हा उघडू लागले कोविड वॉर्ड

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या १० हजारांच्या पुढे गेली आहे. गेल्या २४ तासांत १८०५ नवीन रुग्ण आढळले आहेत. तर ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी शनिवारी १८९० कोरोना रुग्ण आढळून आले होते आणि ७ मृत्यू झाले होते.

आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, सक्रिय रुग्ण १०३०० पर्यंत वाढले आहेत, ही नोव्हेंबरपासूनची सर्वाधिक रुग्णसंख्या आहेत. यापूर्वी १२ नोव्हेंबर रोजी देशात ११०८४ सक्रिय रुग्ण नोंदवण्यात आले होते.

महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. येथील रुग्णांची वाढ पाहता चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. मुंबईतील काही खासगी रुग्णालयांमध्ये कोविड वॉर्ड सुरू झाले आहेत. त्याचबरोबर सरकारने सर्व सरकारी आणि खासगी रुग्णालयांना स्टँडबाय मोडमध्ये राहण्यास सांगितले आहे. यासोबतच लोकांना कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

ऑक्टोबरनंतर महाराष्ट्रात २००० हून अधिक सक्रिय रुग्ण

महाराष्ट्रात ऑक्टोबरनंतर प्रथमच २००० हून अधिक सक्रिय रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३९७ नवीन रुग्ण आढळले असून शनिवारच्या तुलनेत ही संख्या ४० ने कमी आहे. शनिवारी राज्यात ४३७ बाधित आढळले. तर ३ रुग्णांचा मृत्यू झाला होता.

मुंबईत रविवारी १२३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ४३ कोविड रुग्ण दाखल आहेत, त्यापैकी २१ ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. रविवारी मुंबईत १७ नवीन पॉझिटिव्ह रुग्ण दाखल झाले.

मुंबईतील लीलावती रुग्णालयाचे सीईओ डॉ. व्ही. रविशंकर यांनी सांगितले की, त्यांनी कोविड रुग्णांसाठी १५ खाटांचा आयसोलेशन वॉर्ड आणि आयसीयू तयार केला आहे.

गुजरातमध्ये ३०३, केरळमध्ये २९९ रुग्ण

महाराष्ट्रानंतर गेल्या २४ तासांत गुजरातमध्ये 303 रुग्ण आढळले आहेत. तर 1 रुग्णाचा मृत्यू झाला. दुसरीकडे, केरळमध्ये २९९, कर्नाटकात २०९ आणि दिल्लीत १५३ रुग्ण नोंदवले गेले आहेत.

याशिवाय उत्तर प्रदेशात ७७, राजस्थानमध्ये ४६, मध्य प्रदेशात ५ आणि छत्तीसगडमध्ये गेल्या २४ तासांत करोनाचा एक रुग्ण आढळला आहे. सध्या, यूपीमध्ये २४६, राजस्थानमध्ये २०७, मध्ये प्रदेशात ५१ आणि छत्तीसगडमध्ये २३ सक्रिय रुग्ण आहेत.

१०-११ एप्रिलदरम्यान देशभरातील रुग्णालयांमध्ये कोविड संदर्भात मॉक ड्रिल होणार आहे. मॉक ड्रीलमध्ये सरकारी आणि खासगी रुग्णालयांचा समावेश असेल. यामध्ये औषधे, रुग्णांसाठी खाटा, वैद्यकीय उपकरणे आणि वैद्यकीय ऑक्सिजनच्या उपलब्धतेचा आढावा घेतला जाणार आहे. आज होणाऱ्या बैठकीत मॉक ड्रीलबाबत संपूर्ण माहिती दिली जाणार आहे.केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनीही दोन दिवसांपूर्वी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिले होते. यामध्ये त्यांनी राज्यांना करोना चाचणी वाढवण्यास सांगितले.