भ्रष्टाचारविरोधी पथकातर्फे पाच वर्षांत २३ गुन्हे दाखल

१६ प्रकरणी खटले सुरू : केवळ एक प्रकरणात शिक्षा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
28th March 2023, 12:13 am
भ्रष्टाचारविरोधी पथकातर्फे पाच वर्षांत २३ गुन्हे दाखल

पणजी : दक्षता खात्याच्या भ्रष्टाचारविरोधी पथकातर्फे (एसीबी) १ जानेवारी २०१८ ते १२ मार्च २०२३ पर्यंत २३ गुन्हे दाखल करण्यात आले. या कालावधीत १६ गुन्ह्यांचे खटले न्यायालयात सुरू असून फक्त एक प्रकरणात शिक्षा झाल्याची माहिती मुख्यमंत्री तथा दक्षता खात्याचे मंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली आहे. केपेचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी या विषयी विधानसभेत अतारांकित लेखी प्रश्न दाखल केला होता.       

लेखी उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, भ्रष्टाचारविरोधी पथकाने वरील कालावधीत २३ गुन्हे दाखल केले आहेत. त्यानुसार, २०१८ मध्ये ९, २०१९ मध्ये ७, २०२० मध्ये ४, तर २०२१ मध्ये ३ मिळून २३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. वरील कालावधीतील गुन्ह्यांसह २०१८ पूर्वीचे काही गुन्हे मिळून १६ प्रकरणी न्यायालयात आरोपपत्रे दाखल केली आहेत. या शिवाय २६ गुन्ह्याचे अंतिम अहवाल सादर केले आहेत. न्यायालयाने २०१९ मध्ये एका खटल्यातील आरोपीला शिक्षा ठोठावली आहे. या शिवाय २०२० आणि २०२२ मध्ये दोन प्रकरणांतील अधिकाऱ्यांची न्यायालयाने निर्दोष सुटका केल्याची माहिती माहिती लेखी उत्तरात दिली अाहे.                   

या व्यतिरिक्त दक्षता खात्याकडे वरील कालावधीत ४७ तक्रारी दाखल झाल्या असून त्यातील ३४ सरकारी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रलंबित अाहे, तर भ्रष्टाचारविरोधी पथकाकडे ३४ तक्रारी प्रलंबित असल्याची माहिती लेखी उत्तरात दिली आहे.

हेही वाचा