अमेरिकेत चक्रीवादळामुळे २६ जणांचा मृत्यू

गोल्फ बॉलएवढ्या गारा पडल्या; पुन्हा वादळ येण्याची शक्यता


27th March 2023, 12:55 am
अमेरिकेत चक्रीवादळामुळे २६ जणांचा मृत्यू

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

मिसिसिपी : अमेरिकेतील मिसिसिपी येथे शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या चक्रीवादळाच्या तडाख्यात २६ जणांचा मृत्यू झाला. परिसरात मुसळधार पावसात गोल्फच्या चेंडूंएवढ्या मोठ्या गारा पडल्या. त्यामुळे हजारो लोकांच्या घरातील वीज गेली.

शनिवारी, आपात्कालीन सेवांनी ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू केले. मात्र, चक्रीवादळामुळे उद्ध्वस्त झालेल्या इमारतींमध्ये अजूनही अनेक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अधिकाऱ्यांशी बोलून लवकरात लवकर मदत देण्याचे आदेश दिले. धोकादायक वादळामुळे डझनभर लोक जखमी झाले असून अनेक बेपत्ता असल्याची माहिती इर्मजन्सी विभागाकडून देण्यात आली आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो. दुसरीकडे, आज म्हणजेच रविवारी रात्री पुन्हा वादळाची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे सुमारे २० लाख लोकांचे जीव धोक्यात आले आहे.

बीबीसीच्या वृत्तानुसार, चक्रीवादळ वेगवान होते. सुमारे १ तास हे चक्रीवादळ जमिनीवर होते. मिसिसिपीचे महापौर टेट रीव्हस यांनी सांगितले की, बाधित भागात बचाव कार्य सुरू आहे.मिसिसिपीच्या रोलिंग फोर्क शहरात सर्वात जास्त विध्वंस झालेला आहे. येथे राहणाऱ्या एका व्यक्तीने एका वाहिनीला सांगितले की, चक्रीवादळामुळे घरातील सर्व खिडक्यांच्या काचा फुटल्या. अर्ध्याहून अधिक शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे.