बेलारूसमध्ये रशिया आण्विक शस्त्रे करणार तैनात

पुतिन यांची घोषणा; अमेरिकेसारखाच निर्णय घेतल्याचा दावा


27th March 2023, 12:52 am
बेलारूसमध्ये रशिया आण्विक शस्त्रे करणार तैनात

पुतिन यांच्यासह बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी शनिवारी मोठी घोषणा केली आहे. पुतिन यांनी बेलारूसमध्ये सामरिक अण्वस्त्रे तैनात करणार असल्याचे सांगितले. पाश्चात्य देशांसोबतच्या वाढत्या तणावादरम्यान पुतिन यांनी 'नाटो'ला युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवण्याबाबत इशारा दिला.

पुतिन म्हणाले की, माझ्या या निर्णयामुळे अण्वस्त्र कराराचे उल्लंघन होत नाही. अमेरिकेने आपली अण्वस्त्रे इतर देशांमध्येही तैनात केली आहेत आणि आता आम्हीही तेच करित आहोत, असे पुतिन म्हणाले. त्याचवेळी पुतीन यांच्या निर्णयावर अमेरिकेने म्हटले की, सध्या रशिया अण्वस्त्रांचा वापर करेल असे कोणतेही संकेत नाहीत. अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, अण्वस्त्रांशी संबंधित आमची रणनीती बदलण्याचे कोणतेही कारण आम्हाला दिसत नाही. रशियाकडून अण्वस्त्रांचा वापर होण्याचीही शक्यता नाही. नाटो देशांचे रक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र उभे राहू.

बेलारूसमध्ये इस्कंदर मिसाईल प्रणाली तैनात

पुतिन म्हणाले की, बेलारूसमध्ये अण्वस्त्रे तैनात करण्यासाठी रशिया येथे विशेष स्टोरेज सुविधा तयार करत आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला हे काम पूर्ण होईल. आम्ही यापूर्वीच बेलारूसला अनेक इस्कंदर क्षेपणास्त्र प्रणाली पाठवल्या आहेत, ज्यात आण्विक वॉरहेड्स बसवता येतील. शस्त्रांचे नियंत्रण बेलारूसला देणार नाही.