५८०५ किलो वजनाचे इस्रोने ब्रिटनचे ३६ सॅटेलाईट केले लाँच

प्रोजेक्टमध्ये अमेरिका, जपानसह ६ देशांच्या कंपन्यांचा समावेश


27th March 2023, 12:50 am
५८०५ किलो वजनाचे इस्रोने ब्रिटनचे ३६ सॅटेलाईट केले लाँच

न्यूज डेस्क । गोवन वार्ता

नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने रविवारी एकाच वेळी तब्बल ३६ ब्रिटनचे उपग्रह प्रक्षेपित केले. पाठवलेल्या सर्व उपग्रहांचे एकूण वजन ५,८०५ किलो आहे. या मोहिमेला एलव्हीएम३-एम३/वन वेब इंडिया-२ असे नाव देण्यात आले आहे. सतीश धवन अंतराळ केंद्र श्रीहरीकोटाच्या स्पेसपोर्टवरून सकाळी ९ वाजता उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात आले.

यामध्ये इस्रोचे ४३.५ मीटर लांबीचे एलव्हीएम ३ रॉकेट (जीएसएलव्ही-एमके III) वापरले गेले. हे इस्रोचे सर्वात वजनदार रॉकेट आहे. दुसर्‍या लाँचपॅडवरून ते टेक ऑफ झाले. या प्रक्षेपण पॅडवरून चांद्रयान-२ मोहिमेसह ५ यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलेले आहे. चांद्रयान-२ मोहिमेसह सलग पाच यशस्वी मोहिमा एलव्हीएम ३ वरून प्रक्षेपित करण्यात आल्या आहेत. त्यांचे हे सहावे यशस्वी उडान आहे.

अमेरिका, जपानसह ६ कंपन्यांची भागीदारी

वनवेबसाठी इस्रोचे व्यावसायिक युनिट न्यू स्पेस इंडिया लिमिटेड (एनएसआयएल) चे हे दुसरे मिशन होते. नेटवर्क अॅक्सिस असोसिएटेड लिमिटेड म्हणजेच वनवेब ही यूके स्थित कम्युनिकेशन कंपनी आहे. त्याची मालकी ब्रिटीश सरकार, भारताची भारती एंटरप्रायझेस, फ्रान्सची युटेलसॅट, जपानची सॉफ्टबँक, अमेरिकेची ह्यूजेस नेटवर्क्स आणि दक्षिण कोरियाची संरक्षण कंपनी हानव्हा यांच्याकडे आहे. ही सॅटेलाईट आधारित सेवा देणारी एक संपर्क कंपनी आहे. त्याचे मुख्यालय लंडन येथे आहे.

यशस्वी झाल्यास, प्रत्येक कोपऱ्यात स्पेस-आधारित ब्रॉडबँड सेवा असेल

इस्रोने सोमवारी ट्विट करून एलव्हीएम३-एम३/वन वेब इंडिया-२ मिशनच्या प्रक्षेपणाची माहिती दिली होती. वन वेबचे ३६ उपग्रह १६ फेब्रुवारीलाच फ्लोरिडाहून भारतात आले. हे प्रक्षेपण यशस्वी झाल्यास, वन वेब ​इंडिया-२ अंतराळातील पृथ्वीच्या ६०० हून अधिक खालच्या कक्षेतील उपग्रहांचे नक्षत्र पूर्ण करेल. यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात स्पेस आधारित ब्रॉडबँड इंटरनेट सेवा पुरविण्याच्या प्लॅनमध्ये मोठी मदत होणार आहे.

लो अर्थ ऑर्बिट ही पृथ्वीची सर्वात खालची कक्षा आहे. त्याची उंची पृथ्वीभोवती १६०० किमी ते २००० किमी दरम्यान आहे. या कक्षेतील वस्तूचा वेग ताशी २७ हजार किलोमीटर आहे. यामुळेच 'लो अर्थ ऑर्बिट'मधील उपग्रह वेगाने फिरतो आणि त्याला लक्ष्य करणे सोपे नसते.