न्यायाधीशांजवळ खंडणी मागणाऱ्या वकिलाला सशर्त जामीन

पणजीतील चोरी प्रकरणातही होता सहभाग


27th March 2023, 12:33 am
न्यायाधीशांजवळ खंडणी मागणाऱ्या वकिलाला सशर्त जामीन


प्रतिनिधी । गोवन वार्ता

पणजी : प्रथमवर्ग न्यायालयाच्या न्यायाधीशांना चाकू दाखवून धमकावून ४० लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी वाळपई पोलिसांनी मुजाहुद्दीन शेख या वकिलाला अटक केली होती. या प्रकरणी संशयित मुजाहुद्दीन शेख याला डिचोली येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणी वाळपई येथील प्रथमवर्ग न्यायालयाचे न्यायाधीश वासीम रिझवी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, संशयित वकील मुजाहुद्दीन शेख याला आल्तिन्हो - पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयातील चोरी प्रकरणी यापूर्वी अटक केली होती. त्यावेळी न्या. रिझवी ओळखीचे असताना मदत केली नसल्यामुळे संशयित अॅड. मुजाहुद्दीनने त्यांना ६ मार्च रोजी सायंकाळी वाटेत अडवून जाब विचारला. माझ्याजवळ सध्या पैसे नाहीत. चाकू दाखवून दहा दिवसांत मला ४० लाख रुपये द्या, नाहीतर न्यायालयातील चोरीप्रकरणी आपलाही सहभाग असल्याचे मी सांगेन, अशी धमकी दिली होती. या तक्रारीची दखल घेऊन वाळपई पोलिसांनी संशयित अॅड. मुजाहुद्दीन शेख याच्या विरोधात भादंसंच्या कलम ३४१, ३८७ आणि ५०६ (ii) अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्याला न्यायालयाने प्रथम पोलीस कोठडी ठोठावली. ती संपल्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती.

दरम्यान, संशयित मुजाहुद्दीन शेख याने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. तो अर्ज वाळपई येथील प्रथमवर्ग न्यायालयाने फेटाळून लावला होता. याच काळात पोलिसांनी संशयिताने धमकी देण्यासाठी वापरलेला चाकू आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर संशयिताने डिचोली येथील प्रथमवर्ग न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला असता, न्या. अक्षता काळे यांनी शेख याला सशर्त जामीन मंजूर केला आहे.

हेही वाचा