पाच दिवसांत पॅन आधारशी जोडा !

मुख्यमंत्र्यांचे आवाहन : दुप्पट फी घेणे ठरणार गुन्हा


27th March 2023, 12:36 am
पाच दिवसांत पॅन आधारशी जोडा !

प्रतिनिधी। गोवन वार्ता            

पणजी : पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याची अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ आहे. त्यामुळे जनतेने केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाची वेबसाईट, चार्टर्ड अकाऊंटंट, टॅक्स ऑडिटर किंवा नागरी सेवा केंद्रात जाऊन एक हजार रुपयांचा दंड भरून ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी केले.

आयकर विभागाने पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी अंतिम मुदत ३१ मार्च २०२३ आहे. या मुदतीत पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक न केल्यास पॅनकार्ड १ एप्रिल २०२३ पासून निष्क्रिय होईल. तसे झाल्यास आयकर रिटर्न भरता येणार नाही​. पॅनकार्ड संबंधित सेवा वापरता येणार नाहीत. शिवाय विमा किंवा म्युच्युअल फंडही खरेदी करता येणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वत:हून गोमंतकीय जनतेला पुढील पाच दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.       

नागरी सेवा केंद्रांवर गर्दी       

पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्यासाठी राज्यभरातील नागरी सेवा केंद्रांवर नागरिकांची गर्दी उसळली आहे. काही जण वित्त मंत्रालयाच्या वेबसाईटवरून ही प्रक्रिया पूर्ण करून नागरी सेवा केंद्रांवर जाणे टाळत आहेत. 

मुख्यमंत्री म्हणतात...         

केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्यासाठी ३१ मार्च २०२२ ही अंतिम मुदत दिलेली होती. परंतु, कोविडमुळे ही मुदत वर्षभर वाढवली व एक हजार रुपयांचा दंड भरून ही प्रक्रिया करण्याच्या सूचना केल्या.
गोमंतकीय जनतेने वित्त मंत्रालयाची वेबसाईट, चार्टर्ड अकाऊंटंट, टॅक्स ऑडिटर किंवा नागरी सेवा केंद्रात जाऊन एक हजार रुपयांचा दंड भरून ही प्रक्रिया पूर्ण करावी.      

दंडाव्यतिरिक्त ही प्रक्रिया करण्यासाठी फी भरावी लागेल. या प्रक्रियेसाठी दुप्पट फी घेता येणार नाही. तसे केल्यास तो गुन्हा ठरेल.


हेही वाचा