शैक्षणिक अक्षमतेचे निवारण

Story: पालकत्व | पूजा भांडारे कामत- सातोस्कर |
25th March 2023, 12:33 am
शैक्षणिक अक्षमतेचे निवारण

विद्यार्थ्यांशी संबंधित प्रत्येक समस्या, योग्य पध्दतीने केवळ पालक व शिक्षक मिळून हाताळू शकतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात हे दोन्ही खांब अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात, त्यामुळे जेव्हा मुलांना या अक्षमतांमुळे शिक्षणात समस्या येतील, त्यावेळी त्याचे निवारणसुध्दा माता पिता व गुरु करु शकतात. 

सर्वात प्रथम आपण श्रवणप्रक्रियेच्या चालनासंबंधित अक्षमता (Auditory Processing Disorder) या समस्येचे निवारण पाहूया:

मुलांची आसन व्यवस्था

वर्गात ज्या मुलांना या अक्षमतेची अडचण भासत असेल, त्यांच्या आसन व्यवस्थेवर खास लक्ष देणे गरजेचे आहे. जर वर्गात त्यांना पहिल्या बाकावर बसवले, तर नक्कीच ती मुले शिक्षिकेने शिकवलेले समजतील, तसेच जर त्यांना कुठे अडचण भासत असेल, तर तेही शिक्षिकेला सहज समजेल व त्यांच्या हावभावांवर खास लक्ष देता येईल.

दृक साधनांचा वापर

वर्गात अध्ययन अध्यापन प्रक्रियेत आपण अनेक वेळा शैक्षणिक साधनांचा वापर करतो, जेणेकरुन मुलांना नीट आकलन व्हावे. जेव्हा शिक्षिका वर्गात दृक साधनांचा वापर करत असेल त्यावेळी अक्षमता असलेल्या मुलांनी नीट लक्ष देऊन ऐकावे, यासाठी एका गुरुने प्रयत्नशील असावे. दृक साधनाचा वापर करत असताना, शिक्षिकेने अक्षमता असलेल्या मुलांना पाहून त्यांचे लक्ष आहे की नाही हे सुनिश्चित करावे. 

शब्दसंपत्तीचा वापर

अनेक वेळा शिक्षक वर्गात शिकवताना वेगवेगळ्या शब्दांचा वापर करतात, सोप्या शब्दांपासून ते  कठीण शब्दांपर्यंतच्या प्रवासात एका शिक्षकाने जास्तीतजास्त सोप्या शब्दांचा वापर करावा. वयाप्रमाणे विकासित होणारी मुलांची आकलनशक्ती लक्षात घेऊन शिक्षकाने शब्द उच्चारावेत. तसेच उगाच जास्त माहिती न देता, महत्त्वाच्या शब्दात तसेच थोडक्यात स्पष्टीकरण करावे.

मुद्देसूद आखणी

शिक्षकाने वापरलेल्या शब्दांमध्ये एक सुयोग्य क्रम असावा, ते बोलणे तूटक वाटू नये. जेव्हा गुरुच्या स्पष्टीकरणामध्ये योग्य क्रम असेल तेव्हा मुलांना चांगल्या प्रभावी पध्दतीने आकलन होईल.

गणिताशी संबंधित समस्या (dyscalculia) या अक्षमतेच्या निवारणाचे उपाय

समस्येची जाणीव

गणिताशी संबंधित अनेक मुलांना ही समस्या जाणवते, ज्यामुळे गणिताची अधिकच भीती निर्माण होऊन मुले गणित विषयाला शत्रूत्वाच्या दृष्टीने पहातात. मुळातच त्यांना कुठल्याही प्रकारचे अंक तसेच अंकांचा क्रम, लेखनाची पध्दत वगैरे न समजल्याने ती अधिकच अस्वस्थ होतात. त्यामुळे नेमका कुठे त्यांना जास्त त्रास होतो, त्यावर सुयोग्य पध्दतीने पालकांनी व गुरुने अभ्यास केला पाहिजे. जरीही ही अक्षमता सामान्य असली तरीही प्रत्येक मुलांमध्ये तिचे स्वरुप वेगवेगळे असते.

मुलांचा दृष्टिकोण

एकदा का प्रत्येक मुलाच्या वर्तनाचा अभ्यास करुन अक्षमतेची पार्श्वभूमी समजून घेतली, की दुसरे पाऊल उचलायचे ते म्हणजे मुलाचा गणितविषयाबाबत दृष्टिकोण बदलायचा. मुलांना गणित जमत नसल्याकारणाने जो गणित विषयाचा धाक त्यांच्या मनात निर्माण होतो, तो धाक आनंदात आधी परिवर्तीत व्हायला हवा. असंख्य खेळांच्या, छोट्या छोट्या नाटकांच्या रुपात, गोष्टींच्या रुपात त्यांच्या मनातली गणिताची भीती आपण घालवली पाहिजे.

मजेशीर अध्ययन अध्यापन

गणितातसुध्दा किती मनोरंजन असते, याचे प्रात्यक्षिकरण मुलांना आपण करुन दिले पाहिजे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर गणिताचा वापर कसा होतो, याचे त्यांना प्रत्यक्ष अनुभव दिले पाहिजेत. जशी भाषा म्हणजे शब्दांचा खेळ तसा गणित म्हणजे अंकांचा खेळ. अंकांचे मजेशीररीत्या चित्र काढणे, अंकाचे गाणे बनवणे, गोष्ट बनवणे अशा अनेक माध्यमातून आपण मुलांना गणित विषय शिकवू शकतो. 

शैक्षणिक साधनांव्दारे अध्ययन

गणितात स्पष्टीकरण पध्दत नाही, तर उदाहरणांच्या पध्दतीव्दारे शिकवले जाते. त्याचबरोबर गणित शिकवत असताना अंकांचे विश्व समजण्याकरीता अनेक शैक्षणिक साधनांचा वापर करणे गरजेचे आहे, ज्यामुळे मुलांची गणितातील रुची आणखीनच वाढीस लागेल. बाकी अक्षमतांचे निवारण आपण आपल्या पुढील लेखात पाहू.