करोना गेला, काळोखाचे स्मरण कायम

करोनाचा कहर आठवताना अगदी शहारल्यासारखे होते. करोना साथीमुळे समाजाला सार्वजनिक आरोग्य व्यवस्था चांगली असणे आणि समाज विज्ञानाधिष्ठित असण्याची गरज समजली होती. साथ विकोपाला गेली असताना देव मंदिरांमध्ये होते, पण असंख्य विज्ञाननिष्ठ माणसे देवासारखी लोकांच्या मदतीला धावून येत होती. आज मात्र माणूस पुन्हा एकदा दैववादी होताना दिसत आहे. मागे वळून बघताना जाणवणारे वास्तव.

Story: विचारचक्र। डॉ. अभिजीत वैद्य |
25th March 2023, 12:23 Hrs
करोना गेला, काळोखाचे स्मरण कायम

करोनाची महासाथ आली आणि संपूर्ण जगाचा चेहरामोहरा बदलून गेला. या घटनाचक्राला आता तीन वर्षांचा काळ उलटून गेला आहे. तीन वर्षांपूर्वीचे हे दिवस आपण प्रचंड तणावाखाली घालवले आहेत. ती जगावर अचानक येऊन आपटलेली एक आपत्ती होती. करोनाची साथ हे सगळ्यांच्याच दृष्टीने मोठे आणि अनाकलीय संकट होते. याबाबत घडलेली आणखी एक वेगळी बाब म्हणजे हा विषाणू अधिक ताकदवान आणि रूप बदलणारा होता. चीनने तो प्रयोगशाळेत तयार करून जगामध्ये सोडल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि आजही त्याची शक्यता नाकारली जात नाही. अशा या विषाणूने संपूर्ण जगाला वेठीस धरले आणि मानवजातीवर कुलुपबंद जगण्याची वेळ आणली. विविध माध्यमांतून आता जग जोडले गेल्यामुळे, जवळ आल्यामुळे ही साथ अत्यंत वेगाने पसरली.      

माझ्या मते, जगाला या साथीचे गांभीर्य जाणवण्यास आणि आकलन होण्यास बराच वेळ लागला. विशेषत: राज्यकर्त्यांनाही परिस्थितीचे आकलन होण्यास बराच वेळ लागला. त्यामुळे सुरुवातीच्या काळात ज्या वेगाने पावले उचलली जाणे अपेक्षित वा गरजेचे होते, तो वेग साधता आला नाही. आपल्याकडे तर सरकार अत्यंत हास्यास्पद पद्धतीने ही साथ हाताळत राहिले. स्पष्ट सांगायचे तर साथ, लॉकडाऊन आणि त्या अनुषंगाने समोर येणाऱ्या परिस्थितीचा उपयोग करून घेण्यापलीकडे सरकारने काहीच केले नाही. परिणामी, प्रचंड प्रमाणात लोक मृत्युमुखी पडले. काहींची तर हलाखीची अवस्था झाली. त्यात पहिली, दुसरी, तिसरी अशा लाटांवर लाटा येत राहिल्या आणि संकटे गहिरी झाली. पण असे सगळे असूनही त्या काळात संपूर्ण जगातील मानवी समाजाने, विशेषत: भारतासारख्या गरीब देशातील समाजाने दाखवलेला चिवटपणा आणि धैर्य अफाट आणि अचाट होते. एकमेकांना मदत करण्याच्या प्रवृत्तीमध्ये आपल्याला माणुसकीची अनेक बेटे दिसली. मायेचा ओलावा दिसला. या सगळ्या गोष्टी अत्यंत दिलासादायक होत्या. एका विषाणूने जग बंद करून टाकल्यानंतरही माणूस जगू इच्छितो, वेगवेगळ्या आघाड्यांशी लढू इच्छितो हे सत्य समोर आणणारे अभूतपूर्व दृश्य त्या काळाने आपल्याला दाखवून 

दिले.      

करोना काळात माणसांनी जगण्याचे विविध मार्ग शोधून काढले. एक व्यवसाय बंद पडला तर अल्पावधीत पर्यायी व्यवसाय शोधले. शिक्षणाचे तसेच वैद्यकीय उपचारांचे पर्यायी मार्ग शोधले. या सगळ्यामध्ये विशिष्ट वर्गाचे कौतुक करायलाच हवे. त्यात वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच लोकांचा समावेश होतो. त्यांचा ‘करोना योद्धा’ म्हणून सन्मान केला गेला. यामध्ये केवळ डॉक्टर्सचाच समावेश नव्हता तर परिचारिका, तंत्रज्ञ, वॉर्डबॉय, अन्य मदतनीस या सर्वांचेच महत्त्वपूर्ण योगदान होते. त्याप्रमाणेच संपूर्ण पोलीस यंत्रणा आणि देशभरातील सफाई कामगारांचाही अत्यंत आवर्जून उल्लेख करायला हवा. मी प्रत्यक्ष त्यांचे काम पाहत होतो. ‘आरोग्य सेने’च्या माध्यमातून आम्ही कामाची काही वेगळी प्रारुपे जन्माला घातली. या सगळ्या काळात लक्षात आलेली महत्त्वाची बाब म्हणजे माणसाची जगण्याची इच्छा अफाट आहे. संकट आल्यानंतर माणूस प्रथम हबकून जातो पण, लवकरच त्यातून उभाही राहतो आणि पर्याय शोधत पुढे जातो. याच मूळ प्रेरणेतून या काळात अनेक गोष्टींची सुरुवात झाली. डिजिटल व्यवहारांमध्ये क्रांती घडली. प्रत्यक्ष उपस्थित न राहता अनेक गोष्टी होऊ शकतात, हे आपल्याला जाणवले आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत व्यवहार सुरू राहिले. त्या काळात लोकांनी अनेक कलाविष्कार सादर केले, साहित्यनिर्मिती झाली. थोडक्यात, या गंभीर साथकाळातही माणसाची सर्जनशीलता मेली नाही. खरे तर तेव्हा घराघरांतील माणूस जात होता. माणसे प्राणवायूच्या शोधात वणवण हिंडत होती. लॉकडाऊनमुळे कोट्यावधी मजुरांचे संसार अक्षरश: रस्त्यावर आले. पण इतके सगळे घडूनही माणसे सावरत गेली. विशेषत: शेतकऱ्यांनी हा देश सावरला. त्या काळात शेतीचे उत्पादन चांगले होते. त्यामुळेच देशाच्या उत्पन्नात भर टाकण्यास फार मोठी मदत झाली. त्या काळात मजुरांनीही जीवाची पर्वा न करता अनेक प्रकल्पांवर कामे केली.      

सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट असणारे देश या साथीमध्येही भक्कमपणे तगले, पण सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मुळातच व्हेंटिलेटरवर होती. तिथल्या जनतेला व्हेंटिलेटर लागल्यास तो देणार कोण, हाच मुख्य प्रश्न होता. आपल्या देशाबाबत ही बाब तंतोतंत लागू पडली. देशातील मृतांचे आकडे लपवण्याचा अश्लाघ्य प्रयत्न पाहायला मिळाला. या काळाचा सरकारने राजकीयदृष्ट्या वापर करून घेतला, कारण त्या काळात घाईघाईने अनेक कायदे मंजूर करून घेण्यात आले. पण या सगळ्यातच एक नवे जग घडत असल्याचेही दिसू लागले. ऑनलाईन शिक्षणामुळे शिक्षणाच्या नानाविध संधी विद्यार्थ्यांच्या मोबाईलपर्यंत पोहोचल्या. या माध्यमातून अत्यंत दुर्गम भागातही विद्यार्थीही जगाशी जोडले जाऊ शकतात, हे उमगले. पण साथ संपली, जगाने नवा श्वास घेतला आणि जणू आपल्या गळ्याभोवती आवळलेला फास मोकळा झाल्याचे जाणवले. त्या क्षणापासून दुर्दैवाने जग पुन्हा आपल्या मूळ रुपात परतू लागले. ही बाब अत्यंत दुखद आहे.      

माणसे पुन्हा आपल्या मूळ स्वभावाकडे गेली. पुन्हा पारंपरिक गोष्टींकडे वळली. पुन्हा प्रचंड प्रमाणावर धार्मिक उत्सव सुरू झाले. लाखोंच्या समुदायाच्या सभा संपन्न झाल्या. हे पाहून मनात एक गोष्ट आली की खरेच जग करोना साथरोगातून काहीच शिकले नाही काय? विशेषत: आपल्या देशात सध्या इतके दिवस बंदिस्तावस्थेत राहण्याचा सूड उगवण्यासारखी स्थिती पाहायला मिळते आहे. अशा पद्धतीने विवेक गमावून माणसे पुन्हा जगण्याकडे वळली आहेत. त्यांनी मुक्तपणे वावरावे, कलांचा मुक्त आस्वाद घ्यावा हे खरे. पण हे करतानाही मागील दाहक अनुभव विसरता कामा नयेत. करोनाकाळात ऐकायला मिळणारा एक विचार होता की, ‘देव मैदान सोडून पळाले मात्र समाजाला वाचवण्यासाठी राहिले ते विज्ञान...’ हा विचार ऐकल्यानंतर माझ्यासारख्या माणसाच्या मनात करोना साथीच्या निमित्ताने का होईना, समाज विज्ञानवादी बनेल, अशी आशा निर्माण झाली होती. पण त्याउलट चित्र दिसते आहे. करोनाकाळात लपून बसलेले सर्व बुवा-बाबा आता नव्या जोमाने समाजात अंधश्रद्धा पसरवण्यास सज्ज झाले आहेत आणि समाज खुळ्यासारखा पुन्हा विज्ञान विसरून त्यांच्या पाठीमागे जात आहे. समाजातला हा बदल अत्यंत वेदनादायी आहे. करोना साथीमुळे समाजाला सार्वजनिक आरोग्य व्यवस्था चांगली असणे आणि समाज विज्ञानाधिष्ठित असण्याची गरज समजली होती. पण साथ गेल्यानंतर बहुदा अजूनही समाजाला हे उमगले नसल्याचे समोर येते आहे. दुर्दैवाने पुन्हा एकदा देशात आधीचीच भाषा सुरू झाली आहे. समाजाला विज्ञानाचे महत्त्व पटेल आणि सरकार सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करेल ही आशाच धरण्यात अर्थ उरलेला नाही, असे वाटते आहे. माणूस असाच वागत राहिला तर भविष्य अधिक भयावह होण्याची भीती वाटते.