डाग 'जपलेली' पैठणी..!!

Story: तिची कथा | उमा प्रभू |
24th March 2023, 11:56 pm
डाग 'जपलेली' पैठणी..!!

"विभा बाळा... जरा उद्यासाठी साडी काढ बघू कपाटातून तुझ्या आवडीची, तुझ्या लेकाचं बारसं... तुझ्या आवडीचीच नेसेन म्हणते." वत्सलाबाई आपल्या नातसुनेला म्हणाल्या. विभाने कपाट उघडलं आणि छान सुवास तिच्या नाकपुड्यात शिरला, ती क्षणभर हरखली. वत्सलाबाईंचं कपाट व्यवस्थित आवरलेलं होतं. प्रत्येक कार्यक्रमासाठी, वेगळ्या जागी नेसायच्या साड्या सुटसुटीतपणे प्रत्येक कप्प्यात ठेवल्या होत्या. त्यात किती रंग नी किती प्रकार.. 

विभा एक एक साडी हळूवार हाताळत होती इतक्यात तिची नजर खालच्या कप्प्यात ठेवलेल्या रेशमी कापडावर गेली. तिने वाकून ते कापड जरासं सरकवलं. त्याखालून एक निळ्याशार रंगाची पैठणी डोकावत होती. तिने हलक्या हाताने ती बाहेर काढली. त्यावरचं रेशमी वस्त्र दूर केलं आणि त्या पैठणीची निळाई थेट तिच्या काळजाला भिडली. तिने जराशी पैठणीची घडी उसवली अन् नक्षीदार पदर तिच्या दृष्टीस पडला. त्या पैठणीचा मऊसूत स्पर्श तिला वेगळाच आनंद देत होता. 

"काय गं... एकही पसंत नाही की काय तुला..?? अगं... आमच्या आपल्या जुन्या काळातल्या साड्या हो. त्यातल्या त्यात कुठली आवडतेय ती बघ, आता नवी वगेरे नको." वत्सलाबाईंच्या आवाजाने तिची तंद्री तुटली." नाही नाही आजी तसं काही नाही. खूप सुंदर आहेत तुमच्या साड्या. मला खूप आवडल्या. त्यातल्या त्यात ही तर खूपच आवडली. निळ्याशार रंगाची. फक्त हिच्यावर काही डाग आहेत, ड्रायक्लिनिंगला देते ते. निघतील सहज."

 तिचं बोलणं ऐकून वत्सलाबाई हलकेच हसल्या आणि त्यांनी ती पैठणी विभाकडून घेतली. तिच्यावरून हात फिरवला आणि त्यांचे डोळे पाणावले. "हिलाच निवडलसं..!! बाई गं... यावेळी न बोलवताच आलीस. आता माझंही वय झालच आहे म्हणा, त्यामुळे तुझी आठवण राहिली नाही. बघ पण तू मात्र मानपान करवून घ्यायला आलीसच." त्या पैठणीकडे बघत म्हणाल्या. त्यावर विभा गोंधळली. "आजी, काय बोलताय तुम्ही??" "विभा, ही पैठणी फक्त जर आणि नक्षीकाम केलेलं कापड नाही बरं, मी या घरात आल्या क्षणापासून आजपर्यंतच्या प्रत्येक क्षणाची साक्षीदार आहे ही आणि अशी तशी नाही हो! हिच्यावरच्या प्रत्येक डागाची एक रोमांचक कहाणी आहे. या डागांनी वेळोवेळी माझं स्त्रीत्व समृद्ध केलं." वत्सलाबाई भावविभोर होऊन बोलत होत्या. 

"आजी, मला पण सांगा ना ती कहाणी! निदान ऐकून तरी तृप्त होऊ द्या. तुमच्या अनुभवातून मला समृद्ध होऊ द्या." "बाळा, ही पैठणी यांनी मला आमच्या लग्नाच्या पहिल्या रात्री दिली होती. नवी कोरी निळीजर्द पैठणी पाहून अगदी हरखून गेले. ती पैठणी म्हणजे नुसती भेट नव्हती, ती धाग्यांमध्ये केलेली भावनांची गुंफण होती. त्यांना लागलेल्या पहिल्या नोकरीच्या पहिल्या पगारातून त्यांनी पाच रुपयांना घेतली होती कधीतरी त्यांच्या होणाऱ्या बायकोसाठी. आमचं लग्न झालं तेव्हा त्यांना नोकरी लागून सात वर्ष झाली होती. तेव्हापासून त्यांनी ती जपून ठेवली होती. अगदी ठेवणीतली आणि म्हणून ती खास होती नि माझ्यापेक्षा थोरलीसुध्दा..!!

मी तिची घडी आपल्या या घराच्या गृहप्रवेशावेळी मोडली. पहिलं दुध चुलीवरून उतू गेलं ते भांडं मी तिच्या पदरानं उतरवलं आणि त्या दुधाचा पहिला डाग तिच्या पदरावर उमटला नि माझा गृहिणीपदी प्रवेश झाला. नव्या घरात पहिली पंगत उठली आणि तुझ्या आजेसासऱ्यांनी सवयीने हात धुवून पदरालाच पुसले आणि तिचा पदर प्रेमाने न्हाऊन निघाला नि मी तिला पाणी लावायचं टाळलं. लग्नाला वर्ष सरता सरता मातृत्वाची चाहूल लागली आणि तिच्याच पदरातल्या चोरओटी सोबतच्या फळाफुलांचे डाग पुन्हा तिच्यावर अवतरले. 

 तुझ्या सासऱ्याच्या बारशाला साडी शोधता शोधता तीच पुन्हा हाती आली आणि डाग असूनही मी ते लपवून तीच पुन्हा नेसले. नाव ठेवताच याने अगदी भोकांड पसरलं आणि त्याला पाजायला मांडीवर घेतलं नि मला ओसंडून पान्हा फुटला आणि माझ्या लाडक्या लेकाच्या इवल्या जीवणीचा गंध तिच्या प्रत्येक धाग्यात भिनला आणि ती मातृत्वाचं नवं रूप ल्यायली. त्यानंतर मात्र मी ती नेसले नाही पण प्रत्येक सणाला तिला बाहेर काढून तिचा मान म्हणून एक काजळाचा तीट लावत असे. 

माझ्या प्रत्येक चांगल्या प्रसंगी तिचा सहभाग माझ्यासाठी महत्त्वाचा होता अगदी आता आतापर्यंत. पण गेल्या काही वर्षांत मात्र संसाराची घाईगडबड, मुलांचं भावविश्व सांभाळता सांभाळता ती विस्मरणात गेली होती आणि आज तुझ्या निमित्ताने ती पुन्हा एकदा नव्याने नव्या नात्याच्या प्रारंभी प्रगटली आणि माझा खास क्षण तिच्या साक्षीने अजून बहरला त्यात पुन्हा एकदा हे मला भेटायला आलेत असचं वाटलं..." 

वत्सलाबाई बोलता बोलता थांबल्या त्यांना अगदी भरून आलं. विभाने हलकेच त्यांच्या पाठीवरून हात फिरवला आणि बोटाने आपल्या डोळ्यातल्या काजळाचा तीट साडीवर उमटवला आणि पैठणीवरची अनुभव संपन्न अनोखी 'डाग'नक्षी जपण्याचं जणू मूकपणे वत्सलाबाईंना तिने वचनच देऊन टाकलं...