शैक्षणिक अक्षमतेची पार्श्वभूमी...

मागील लेखात या विषयाचे विवेचन करताना, शैक्षणिक अक्षमता म्हणजे काय व अध्ययन अध्यापन प्रक्रियेत कशा पध्दतीने या अक्षमता अडचणी निर्माण करु शकतात, यावर चर्चा केली. या अक्षमता आपण पालक व शिक्षक हाताळण्याची शक्ती बाळगतो, पण समस्येचे निवारण शोधण्यासाठी, शैक्षणिक अक्षमता कोणकोणत्या असतात, याची माहिती असणे गरजेचे आहे. जेव्हा त्यांचे प्रकार व त्यासंबंधित लक्षणे आपल्या ध्यानात येतील, तेव्हाच आपण यावर उपाय शोधून काढू शकतो.

Story: पालकत्व | पूजा भांडारे कामत- सातोस्कर |
18th March 2023, 12:44 am
शैक्षणिक अक्षमतेची पार्श्वभूमी...

शैक्षणिक अक्षमतेचे काही महत्त्वाचे प्रकार खालीलप्रमाणे

श्रवणप्रक्रियेच्या चालनासंबंधी अक्षमता (auditory Processing Disorder)

जसे की आपण जाणतो, की आपल्या वैचारिक क्षमतेचा विकास, आपल्या मेंदूच्या विकासावर अवलंबून असतो. आपल्या समक्ष जेव्हा समोरचा व्यक्ती काही कथन करतो, त्यावेळी ते संकेत आपल्या कानांव्दारे मेंदूच्या आकलन शक्तीपर्यंत पोहोचतात, त्याचे आकलन केले जाते, व त्यानुसार शरीर क्रिया करते. योग्य श्रवणाची क्रिया होण्याकरीता समोरचा व्यक्ती आपणास जे काही सांगत आहे, त्या शब्दांमध्ये योग्य तो भेद समजणे गरजेचे आहे. योग्य उच्चार समजणे महत्त्वाचे आहे. पण या अक्षमतेमध्ये एक व्यक्ती कथनातील उच्चाराचा नेमका फरक समजू शकत नाही, त्यामुळे योग्य ती माहिती कर्णेद्रियांव्दारे, मेंदूपर्यंत पोहोचत नाही, म्हणूनच आकलनही होत नाही व त्यामुळे संभाषण अप्रभावी ठरते.

डिस्केल्कूलीया (Dyscalculia)

ही मानसिक अक्षमता गणित विषयाशी संबंधित असते. १०० टक्क्यांपेक्षा ८० टक्के पालक तसेच मुलांना गणित विषयांसंबंधीच समस्या असते. तक्रार असलेल्या प्रत्येकालाच ही अक्षमता असते असे नाही, पण अनेकांच्या बाबतीत, ही समस्या नक्कीच डोकावू शकते. या अक्षमतेत, मुलांना गणिताशी संबंधित अनेक समस्या जाणवतात, त्यांना गणित सोडवणे खूप कठीण बनते, कारण गणितातले अंक त्यांना समजत नाहीत. कितीही शिकले तरी सुध्दा, ते अंक लिहिण्यात, वाचण्यात असमर्थ बनतात, गणितातील बेरीज वजाबाकी तर दूरच, पण अंकांचा योग्य क्रमसुध्दा, ते समजू शकत नाहीत. त्यांच्या डोळ्यांसमोर सगळे अंक नाचत आहेत, असे मुलांना वाटते. उत्कृष्ट हिंदी चित्रपट तारे जमी पर, हे या अक्षमतेचे योग्य उदाहरण आहे, ज्यात मुलाच्या मानसिक अक्षमतेवर प्रकाश घातला आहे.

डिस्ग्राफीया (dysgraphia)

जसे की आपण जाणतो की भाषेच्या प्रवासात चार मुख्य पायऱ्या असतात, त्याच्यातील लेखन कौशल्य नकारात्मकरीत्या प्रभावित करणारी अक्षमता म्हणजेच, डिस्ग्राफिया होय. या मानसिक अक्षमतेमध्ये मुले लिहिण्यात असमर्थ असतात, सगळी अक्षरे उलट सुलट लिहितात, उलट्या क्रमाने लिहितात. इंग्रजी असो वा मराठी, काही मुलांच्या बाबतीत लिहिणे तर सोडाच, पण पेन्सिलही त्यांना नीट पकडता येत नाही. लिहित असताना वेडीवाकडी अर्थहीन अक्षरे काढून, मध्ये जागा सोडणे, आडव्या उभ्या रेषा काढणे, पेन्सिल हातात पकडण्यासाठी दबाव टाकणे, ही अशी लक्षणे दिसून येतात. केवळ लेखनच नाही,  तर आकलन शक्तीवर सुध्दा याचा प्रभाव दिसून येतो.

 डिस्लेक्सीया (dyslexia)

ज्यापध्दतीने डिस्ग्राफिया लेखन कौशल्य प्रभावित करतो, त्याचप्रमाणे डिस्लेक्सीया ही अक्षमता मुलांच्या वाचन व भाषण या कौशल्याला प्रभावित करतो. ज्या मुलांना ही अक्षमता असते, त्यांना वाचनात अडचणी निर्माण होतात. अशा मुलांना वाचन करायला जमत नाही, त्यांना अक्षरे समजत नसतात, कुठल्या अक्षराचा उच्चार कसा करावा यात ती गोंधळतात, सगळीच अक्षरे एकसारखी भासल्याने, उच्चाराचा वळणाचा भेद, मुलांना समजत नाही, व त्यांच्या डोक्यावर प्रचंड तणाव निर्माण होऊ शकतो. वाचनावर जेव्हा प्रभाव होतो, त्याप्रमाणे लेखनावर सुध्दा प्रभाव व्हायला सुरुवात होते, भाषणावर प्रभाव होतो, कारण मुळात अक्षरेच समजत नसेल तर बाकीच्या भाषा कौशल्यांवर तरी कसे प्रभुत्त्व मिळवता येईल. त्यांच्या मेंदूत संवेदना निर्माण होतात, पण पूर्णपणे ती प्रक्रिया पूर्णत्वास न आल्यामुळे ही अध्ययनाची क्रिया अर्धवट राहते. 

डिस्प्रेक्सिया (Dyspraxia)

डिस्प्रेक्सिया ही अक्षमता मुलांना असल्यास, त्यांना शारीरिक अवयवांच्या हालचालींमध्ये अडथळा जाणवतो. आपल्याला माहितच आहे की, आपल्या शरीराचे डोक्यापासून ते पायाच्या बोटांपर्यंतचे हावभाव, हे केवळ आपल्या मेंदूवर अवलंबून असते. आपला मेंदू ज्याप्रमाणे आपल्या शरीरास संकेत देतो, त्याप्रमाणे आपले शरीर हावभाव करते. पण या अक्षमतेत मेंदूने दिलेले संकेत, शरीराच्या अवयवांपर्यंत नीट पोहोचत नाही. मेंदूच्या संकेतांमध्ये व शरीराच्या हालचालींमध्ये संतुलन रहात नाही. त्यामुळेच ही समस्या, इतर अक्षमतेसोबतच निर्माण होते.

याच अक्षमतांसोबतच विविधांगी पध्दतीच्या अक्षमता आहेत, पण वर उल्लेख केलेल्या अक्षमता महत्त्वाच्या आहेत, ज्या अनेक मुलांमध्ये दिसून येतात. पुढच्या लेखात या सर्व समस्यांचे निवारण आपण कसे करु शकतो, हे पाहूया.