शिवेंदू भूषण एएनसीच्या अधीक्षकपदी

राजेंद्र राऊत देसाई यांची किनारी पोलीस अधीक्षकपदी बदली

|
31st January 2023, 12:05 Hrs
शिवेंदू भूषण एएनसीच्या अधीक्षकपदी

प्रतिनिधी । गोवन वार्ता                  

पणजी : गोवा पोलिसांच्या दोन पोलीस अधीक्षकांची बदली करण्यात आली आहे. याबाबतचा आदेश कार्मिक खात्याचे अव्वल सचिव इशांत सावंत यांनी जारी केला आहे.                   

या आदेशानुसार, हल्लीच बढती झालेले भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस) अॅग्मू कॅडरचे २०१९ बॅचचे अधिकारी शिवेंदू भूषण यांची अमली पदार्थ विरोधी पथकाच्या (एएनसी) पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे सायबर विभागाच्या पोलीस अधीक्षकपदाचा अतिरिक्त ताबाही देण्यात आला आहे. एएनसीचे पोलीस अधीक्षक राजेंद्र राऊत देसाई यांची बदली किनारी पोलीस अधीक्षकपदी केली आहे.             

भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस) अधिकारी शिवेंदू भूषण यांची ९ ऑगस्ट २०२१ रोजी गोव्यात प्रोबोशनवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी मडगाव पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारीसह सायबर विभागाचे उपअधीक्षक पदाची जबाबादारी पार पाडली. हल्लीच केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांना बढती दिली आहे. गढवा-झारखंडयेथील शिवेंदू भूषण यांनी खासगी कंपनीत सेवा बजावत असताना केंद्रीय लोकसेवा आयोगाची (युपीएससी) परीक्षा २०१८ मध्ये दिली. परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची आयपीएस अॅग्मू केडरच्या २०१९ बॅचचे अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.


संतोष देसाई मडगाव उपविभागीय अधिकारी

पोलीस खात्याने मडगाव उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून उपअधीक्षक संतोष देसाई यांची बदली केली आहे. याबाबतचा आदेश पोलीस स्थापना मंडळाच्या मंजुरीनुसार मुख्यालयाचे पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांनी जारी केला आहे.