सोनसडो कब्रस्तानसाठी लवकरच निविदा

सरकारची खंडपीठात माहिती : स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश


31st January 2023, 12:02 am
सोनसडो कब्रस्तानसाठी लवकरच निविदा

प्रतिनिधी । गोवन वार्ता                  

पणजी : सोनसडो येथील नियोजित कब्रस्तान प्रकल्पासाठी २,५०० चौ. मी. जमीन निश्चित केली आहे. प्रकल्पाच्या बांधकामासाठी पुढील काही दिवसांत निविदा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, अशी माहिती अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात दिली. पुढील सुनावणी वेळी स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश खंडपीठाने जारी केले.             

राज्य सरकारने कब्रस्तानासाठी २०१०-११ मध्ये सोनसडो येथील सुमारे ३३ हजार चौ.मी. जमीन संपादन करून मडगाव नगरपालिकेला दिली होती. त्या ठिकाणी तसेच राज्यात अनेक ठिकाणी मुस्लिमांना कब्रस्तान, हिंदूना स्मशानभूमी व ख्रिश्चनांना दफनभूमी नसल्याचा मुद्दा उपस्थित करून सय्यद काद्री यांनी २०१९ मध्ये खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेत राज्य सरकार, पंचायत संचालनालय, मडगाव पालिका, फोंडा पालिका, म्हापसा पालिका, सुन्नी जमात-उल-मुस्लिमीन आणि दक्षिण गोवा नियोजन विकास प्राधिकरण यांना प्रतिवादी केले आहे. याची दखल घेऊन खंडपीठाने प्रतिवादींना वेळोवेळी निर्देश जारी केले होते. याच दरम्यान खंडपीठाने नियोजित कब्रस्तान प्रकल्पाचे बांधकाम २८ नोव्हेंबरपूर्वी सुरू करून सहा महिन्यांत पूर्ण करण्याचा आदेश सार्वजनिक बांधकाम खाते आणि गोवा राज्य नगरनियोजन प्राधिकरणाला (जीसुडा) दिला होता.             

संबंधित प्रकल्प प्रकरणी खंडपीठात सेंट अँथनी चॅपल ट्रस्ट आगाळी आणि डाॅ. अँथनी रॉड्रिग्ज यांनी अर्ज दाखल करून संबंधित परिसरात इतर धर्माच्या नागरिकांना दफन करण्यासाठी जमीन उपलब्ध करण्याची मागणी केली होती. या संदर्भात सोमवारी खंडपीठात सुनावणी झाली. सरकारने कब्रस्तान प्रकल्पासाठी नियुक्त केलेले सल्लागार राहुल देशपांडे आणि असोसिएट्स यांनी कब्रस्तानसाठी २,५०० चौ. मी. जमीन निश्चित केली आहे. निविदा प्रक्रिया करून मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी सांगितले. खंडपीठाने २ मे रोजी स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश जारी केले. इतर धर्मियांना दफनाची परवानगी देण्याचा विषय पुढे घेण्यात येणार आहे.

हेही वाचा