पाणी ‘ओटीएस’ला अल्प प्रतिसाद

सुमारे दोन हजार अर्ज दाखल; २ कोटी ७४ लाखांचा महसूल

|
30th January 2023, 12:23 Hrs
पाणी ‘ओटीएस’ला अल्प प्रतिसाद

प्रतिनिधी। गोवन वार्ता

पणजी : पाण्याचे थकित बिल भरण्याची संधी देणारी ओटीएस याेजनेला ग्राहकांकडून अत्यल्प प्रतिसाद लाभला आहे. आतापर्यंत सुमारे २ हजार ग्राहकांनी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज दाखल केले आहेत. ९२ कोटी रुपयांच्या थकबाकीपैकी फक्त २ कोटी ७४ लाख रुपयांची रक्कम वसूल झाली आहे. योजनेची मुदत पूर्ण झाल्यानंतरच चित्र स्पष्ट होणार आहे, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंते संंतोष म्हापने यांनी सांगितले.

राज्यातील ४४ हजार पाणी जोडणी असलेले ग्राहक नियमित बिल अदा करत नाहीत. त्यांची ९० कोटी रुपयांची थकबाकी आहे. त्यांपैकी ४० कोटींची मूळ रक्कम आहे, तर ५० कोटी दंडाची रक्कम आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी एकरकमी बिल अदा करण्याची योजना सरकारने तयार केली होती. ३० डिसेंंबर २०२२ रोजी या योजनेचा शुभारंंभ झाला.      

ज्या थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला नाही, त्यांची जोडणी ताेडण्याची कार्यवाही फेब्रुवारीपासून हाती घेण्यात येणार आहे. थकित बिल भरण्याची ही अखेरची संधी आहे. यानंतर अशी योजना येणार नाही, असा इशारा सार्वजनिक बांंधकाम मंंत्री नीलेश काब्राल यांनी योजनेचा शुभारंंभ करताना दिला होता. या योजनेची मुदत जानेवारीअखेर पर्यंत होती. मुदत वाढवायची की नाही, याचा निर्णय फेब्रुवारीत सरकारकडून घेतला जाणार आहे.

या योजनेअंतर्गत थकबाकी एका हप्त्यात अदा केल्यास दंडाची पूर्ण रक्कम माफ केली जाणार आहे. दोन हप्त्यांत अदा केल्यास दंडाची ८० टक्के रक्कम माफ केली जाईल. तीन हप्त्यांत अदा केल्यास ६० टक्के रक्कम माफ होईल. जास्तीत जास्त सहा हप्त्यापर्यंत थकबाकीची रक्कम अदा करता येते. त्यानंतर दंडाच्या रकमेत सूट मिळणार नाही.