साठवगाठव

Story: गजाल | गीता गरुड |
28th January 2023, 11:00 pm
साठवगाठव

"ओ आयकलास काय. माका ती 'सुनेचं राज्य' सिरीअलमधी देखवतत तसली बुट्ट्यावाली साडी व्हयी म्हंजे व्हयी," सरीता बाबल्याच्या कानाशी भुणभुण करत होती.

"गो, व्हयता कपाट साडयेंनी भरलला असा तरी नयी साडी  कित्याक व्हयी तुका?"बाबल्याने वैतागतच विचारलं.

"माझी मावसभैन, सुमाताई मुंबयसून येव्ची हा. तिका मी हळदीकुकवाचा आमंत्रण दिलय. ती भारीतला पाताळ नेसान येतली. तिका वाटता कामा नये, मिया तिच्यापरीस कमी आसय असा."

"गो तुका कमी म्हतल्यान कुनी? असली शोबाजी करुची खेका?"

"ता काय नाय. तुमी माका साडयेसाठी पैसे दिलास नाय तर मिया आबांकडे मागतलय. आबा माका नाय म्हनाचे नाय."

आबा म्हणजे सरीताचे सासरे. सरीता या घरात यायच्याआधीच त्यांची सहचारिणी हे जग सोडून गेल्याने ते तसे हतबल होते. होता होईल तो मुलाशी व सुनेशी जुळवून घ्यायचं त्यांनी ठरवलं होतं. आबांच्या या कमजोरीचा सरीता बरोबर फायदा उठवत होती. ती नवऱ्याकडून तर पैसे घ्यायचीच शिवाय दारावर मच्छीवाली आली की हातभर लांब सुरमई, सुपभर पसरेल एवढा हलवा तर कधी मुशी घेई. आबांना साद घालून पैसे द्यावयास सांगे. आबाही सांगेल ते पैसे खिशातनं काढून देत.

सरीता मासे तळून अर्धे माहेराला पोचते करी. आबांना सगळे कळत होते पण बोललं की भांडणं होणार लेकाच्या संसारात म्हणून गप्प रहात. सरीताच्या माहेरी तिची वहिनी मात्र बुधवार, शुक्रवारी माशाच्या ताज्या तुकड्या नणंदेकडून मिळतात म्हणून नणंदेवर खूश होती. सरीता माहेरी गेली की तिची वहिनी तिची छान उठबस करी. आईवडील हयात नसले तरी माहेरी आपल्याला अजून मान आहे या विचाराने सरीताचं मन भरून येई. 

साडी घेण्यासाठी पैसे द्यायला बाबल्याने नकार दिला तरी सरीताने सासऱ्यांशी गोड बोलून त्यांच्याकडून पाच हजार रुपये घेतले व भारीतली साडी, बायांना वाण देण्यासाठी स्टीलचे गढवे घेऊन आली. तिची वाणंच वाडीत सगळ्यात सरस असणार असा तिला विश्वास होता आणि झालेही तसेच हळदीकुंकवाच्या दिवशी सरीता दरवर्षीप्रमाणे सोन्याच्या अलंकारांनी नखशिखांत नटली होती. अबोली रंगाची सोनेरी बुट्ट्यावाली तिची साडी पाहून आलेल्या बाया एकमेकींना खुणा करून सांगत होत्या, "ही साडी त्या 'सुनेचे राज्य' सिरयलमधल्या सौदामिनीची असा नि हातातली काकना, गळ्यातलो हारव तस्सोच."

कशेळकरांच्या नलीने विचारलंच, "सरे, व्हयतो हार सोन्याचो काय गो?"

सरी हसत म्हणाली, "वाटता ना सोन्याचो. एक ग्रामचो असा पन असलोच करूचो असा माका. आबांका बोलतलय मी. नाय म्हनुचे नायत माका. माझ्यार लय जीव आसा तेंचो. एकुलती एक सुनबाय ना मी तेंची. ह्या भायरला भुतुरला आकरेकतय ना तेकारनान माझो शब्द टाळनत नाय ते." 

"व्हय गे बाय, "म्हणत बायांनी माना डोलावल्या.

सुमाताईही हळदीकुंकवाला आली. साधी सुती साडी चापूनचोपून नेसून आली होती. सोबत आपल्या सासूलाही घेऊन आली होती. गळ्यात काळ्या मण्यांचा सर, हातीत हिरवा चुडा. त्या साधेपणातही तिचं मुळचं सौंदर्य उठून दिसत होतं. चेहऱ्यावरचं मार्दव पाहून जमलेल्या बाया आपणहून ती कोणा गावची, मुंबईला कुठे रहाते चौकशी करत होत्या. आपल्या नातलगांची, मुलाबाळांची त्या परीसरात खोली असल्यास तिला पत्ताही सांगत होत्या.

सरीने सुमाताई व तिच्या सासूला हळदीकुंकू लावलं, वाण दिलं. 

सगळ्याजणी सरीताने दिलेल्या गढव्यांचं कौतुक करत होत्या. "वाण कसा वजनदार देव्चा ता सरीकच ठाऊक असा. देऊघेऊक तेचो हात कोन धरुचो नाय." व्हाळावरची शिल्पावैनी म्हणाली तसं सरीताचं काळीज सुपाएवढं झालं. 

सुमाताईने सरीला जाताना विचारलनं, "सरे, माझ्या जावेने पोस्टाची एजन्सी घेतलीय. तुझ्या बाजुच्याच गावात रहाते. तुला आवर्ती खाते (रिकरींग अकाऊंट) उघडायचं असेल तर तिला पाठवते. दर महिन्याला ठराविक रक्कम भरायची. अगदी पाचशे रुपये भरलेस दर महिना तरी पाच वर्षांनी एक घसघशीत रक्कम हाताशी येईल तुझ्या. पुढे मुलंबाळं होतील, तेव्हा त्यांच्या शिक्षणासाठी ती रक्कम तू मुदतठेव म्हणून ठेवू शकतेस. दहा वर्ष पोस्टात ठेवलीस तर दुप्पट पैसे मिळतील तुला. मग पाठवू का माझ्या जावेला तुझ्याकडे?"

सरी मान वेळावत म्हणाली, "ते माका बचतीचा वगैरे टेंशन नाय  सुमीताई. माका व्हये ते पैसे हे देतत. आमचा हाटेल बरा चललाहा नि माझे सासरे शिक्षक व्हते तेंची पेंशन येता. आमच्याशिवाय तेंचा आसा कोन दुसरा खानारा? मी कितकेव पैसे मागलय तरी नाय म्हनाचे नाय ते." सुमाताई मग काहीच न बोलता निघून गेली.

दिवस असेच पुढे सरत होते. बचत नाही. घोवाने कमावलेलं, सासऱ्याची पेंशन यात थाटामाटात सणवार साजरे करायचे, गावजेवणं घालायची असं सगळं सरीचं चाललं होतं.. नि एका रात्री गावातल्या जत्रेतून माघारी येताना ठेच लागून सरीचे सासरे पडले. 

साधीशी खोप पडली कपाळाला म्हणून हळदपटकी केली पण सकाळ झाली तशी त्यांची चिन्हं वेगळीच दिसू लागली. तोंड वाकडं दिसू लागलं. सरीच्या नवऱ्याने त्यांना हॉस्पिटलात एडमिट केलं. डॉक्टर हरएक चाचणी करत होते. मागतील तसे पैसे द्यावे लागत होते. सरीच्या नवऱ्याकडे सरीने पैसा साठायला दिलाच नव्हता. सासऱ्याकडे काही जमापुंजी असली तरी ती आताशा मिळणं शक्य नव्हतं.

सरी रडकुंडीला आली. तिचा तिच्या सासऱ्यांवर जीव होता. आशेने ती माहेरी गेली. तिने वहिनीकडे मदत मागितली पण वहिनीने "आमचाच आमका जड झाला हा. आमच्याकडे खय आसत पैसे!" अशा शब्दांत तिची पाठवणी केली. 

सरीने वाडीत सगळ्यांकडे मदत मागितली. लोकांनी जमेल तशी मदत केलीही पण ती अगदीच तुटपुंजी होती. यावेळी सुमाताई मदतीला धावून आली. मुंबईसून सरीसाठी ती गावाला आली, वेळप्रसंगाला धावून आली. सुमेची आरडी परिपक्व झाली होती. ते पैसे सुमेने सरीला हॉस्पिटलचं, मेडीकलचं बील भरण्यासाठी दिले.

सरीला काय बोलावं सुधरेना. वेळेवर केलेल्या औषधोपचारांमुळे अनर्थ टळला. सरीचे सासरे बरे झाले पण हे आलेलं संकट सरीला बरंच काही शिकवून गेलं. आता तीही सुमीताईप्रमाणे बचत करू लागली. सुमीताईचे पैसे सरीच्या सासऱ्यांनी स्वतः जाऊन परत केले.

सरी आता सासऱ्याने व नवऱ्याने घरखर्चासाठी दिलेल्या पैशातून ठरावीक रक्कम बचतीसाठी काढू लागली. सुमाताईच्या भावजयीच्या मदतीने तिने पोस्टात बचत खाते खोलले. त्यात जमतील तसे पैसे न्हेऊन ठेवू लागली. आवर्त खातेही खोलले.

सुमाताईची भावजय दरमहा सरीकडे येऊन पैसे घेऊन जाऊ लागली तसं वाडीतल्या इतर बायांनीही साठवगाठव करण्यासाठी सुमाताईच्या भावजयीचे मार्गदर्शन घ्यायला सुरुवात केली.

आताही सरी हळदीकुंकु समारंभ साजरा करते, सणवार साजरे करते पण उधळमाधळ न करताही ते करता येतात आणि कोणतेही सोंग आणता येते पण पैशाचे सोंग आणता येत नाही हे सरीला पटल्याने सरीचे सासरेही आपल्या सुनेवर, सरीवर खूश आहेत.समाप्त...