स्नानं समर्पयामि

Story: ग्रंथोपजीविये | वैद्य. रश्मिना आमोणकर |
28th January 2023, 10:50 pm
स्नानं समर्पयामि

षोडशोपचार पूजेमध्ये सोळा उपचारांपैकी सहावा उपचार स्नान आहे. देवाला गंगाजल, पंचामृत, सुगंधीद्रव्य मिश्रित जलाने स्नान घातले जाते. माशेल जवळ वरगाव परिसरात धुमक आहे. तिथे पाण्याचे झरे आहेत. तिथे नैसर्गिक पाण्याच्या स्रोतात आंघोळ करायला अनेक लोक जातात. गोवेकर दरवर्षी एकदा तरी समुद्रस्नान करतात. खारे पाणी अंगावर घेणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. तीर्थक्षेत्री संगमावर स्नान करणे पवित्र मानले जाते. नित्यस्नान दिनचर्येचा महत्त्वाचा भाग आहे.

स्नानं सदा श्रमस्वेदमलबैभत्स्यगंधनुत् ।

तंद्रा निद्रादाह पाप्माऽलक्ष्मी कण्डूतृषाप्रणुत्।। 

दीपनायुस्तृप्तिमेधापुंस्वौजो बलपुष्टिदम्।

रक्तप्रसादनं हृद्यं सर्वेन्द्रियविबोधनम् |। कैयदेव निघण्टु

नित्य स्नान केल्याने श्रमपरिहार होतो. घाम, मळ, दुर्गन्ध, बीभत्सता दूर होते. तन्द्रा, खूप झोप येणे, जळजळ, खाज, खूप तहान लागणे, पाप, दरिद्रता,  नष्ट होते.  स्नान पचनशक्ती वाढविणारे, बलदायक, पुंसत्वकारक, आयुष्य वाढविणारे आहे. रक्तशुद्धी करणारे, हृदयासाठी हितकर, इंद्रियांची शक्ती वाढविणारे आहे. मेधाशक्ति म्हणजे ग्रंथ समजण्याची शक्ति वाढविणारे आहे. स्नान केल्यानंतर ग्रंथाचे वाचन केल्यास विषय चांगला समजतो.

शीतल पाण्याने स्नान करणे रक्ताचे विकार, पित्ताचे दोष, नाकातून रक्त वाहणे या आजारांसाठी चांगले आहे. गरम पाण्याने आंघोळ केल्यास बलदायक, कफ - वाताचे शमन करणारे आहे. डोक्यावरून खूप गरम पाण्याने स्नान केल्यास केस व डोळ्यांचे आरोग्य बिघडते. परंतु वात व कफ दोष प्रकुपित झाल्यास डोक्यावरून गरम पाणी उपचार म्हणून घ्यावे.

अतिशीतं हि शीते च श्लेष्ममारुतकोपनम् | अत्युष्णमुष्णकाले च पित्तशोणितकोपनम् ।। कैयदेव निघण्टु

थंडीच्या दिवसात अतिथंड पाण्याने आंघोळ केल्यास वात व कफाचा प्रकोप होतो. तसेच उष्ण काळात अति गरम पाण्याने आंघोळ केल्यास पित्त व रक्ताचे आजार उद्भवू शकतात. ऋतुनुसार, शरीराची गरज ओळखून थंड, गरम किंवा कोमट पाण्याने आंघोळ करावी.

वाहणारे पाणी जसे कि नदी, समुद्रावर स्नान करणे श्रेष्ठ आहे. एका जागी साचलेल्या पाण्यात, तलावात स्नान करणे मध्यम श्रेणीचे व चार भिंतीमध्ये, न्हाणीघरात आंघोळ करणे धर्मशास्त्र, आध्यात्मिक दृष्ट्या अधम मानले जाते. स्नान केल्याशिवाय केलेल्या धर्मकार्याचे  फळ प्राप्त होत नाही. म्हणून बऱ्याच तीर्थस्थानी नदी, संगमावर स्नान केल्यानंतरच लोक देवदर्शनाला जातात.

घराबाहेर नैसर्गिक पाण्यात स्नान करण्याचे काही नियम कैयदेव निघण्टु ग्रंथात दिले आहेत. सर्वप्रथम डोके पाण्याने भिजवावे. अतिशय कमी पाण्यात व अतिथंड पाण्यात स्नानासाठी उतरू नये. नग्न होऊन स्नान किंवा पोहणे निषिद्ध आहे. पाण्यात आपले स्वरूप पाहणे, तटावर उभे राहून पाण्याकडे पाहणे, हाता पायांनी पाणी उडवणे निषिद्ध आहे. स्नान केल्यानंतर अंग चोळणे, केस झटकणे अशा क्रिया करू नयेत.

स्नान करताना अंगावरचा मळ दूर करण्यासाठी औषधी चूर्णे तेलमिश्रीत करून किंवा कोरडी अंगावर घासावीत. वीटाचे चूर्ण शरीरावर घासल्यास खाज दूर होते. 

फेनकेन तु संघर्षः शौर्यलाघवदार्ढकृत् ।

कोठकण्ड्वनिलस्तंभमलरोगनिवारणः ।। कैयदेव निघण्टु

फेनक म्हणजे फेस येणारा साबण. फेनकाने शरीर स्वच्छ केल्यास शरीर शक्तीशाली, हलके व सुदृढ होते. शरीरावरचा मळ, खाज, पुळ्या दूर होतात व वात कमी होतो. कैयदेव निघण्टु पंधराव्या शतकातील आयुर्वेदीय ग्रंथ आहे. त्या काळात फेनकाचा उल्लेख नैसर्गिक द्रव्ये, रिठासारख्या फेस येणाऱ्या वनस्पती, माती यापासून तयार केलेल्या साबणाला उद्देशून असावा.

यः सदाऽऽमलकैः स्नानं करोति स विनिश्चितम् । बलीपलितनिर्मुक्तो जीवेद्वर्षशतं नरः।। भावप्रकाश संहिता

आवळा मिश्रित पाण्याने किंवा आवळ्याचे चूर्ण अंगाला लावून स्नान केल्याने अंगाला पडणाऱ्या सुरकुत्या व केस अकाली पिकणे कमी होतात. तसेच दीर्घायुष्य लाभते.

स्नानाचे ७ प्रकार कैयदेव निघण्टु या ग्रंथात दिले आहेत.

मान्त्रंपार्थिवमाग्नेयं वायव्यं दिव्यमेव च । वारुणं मानसं चेति सप्तैतानि क्रमेण तु ॥ (कैयदेव निघण्टु)

● मांत्र स्नान :-.' शन्न आपस्तु वै मन्त्र , मांत्र स्नान म्हणजे ‘शन्नों आपः’ मंत्राचे पठण केल्याने शरीराची शुद्धी होते.  . 

● पार्थिव स्नान:- मृदालभ्यं तु पार्थिवम्, म्हणजेच शरीरावर मातीचा लेप लावून शरीराची शुद्धी करता येते.

● आग्नेय स्नान :- भस्मना स्नानं आग्नेयं म्हणजे शरीरावर भस्माचे लेपन करणे हेच भस्म स्नान आहे.

भस्मस्नानाने घाम, विषारी द्रव्ये, अतिरिक्त पाणी शोषले जाते, चिकटपणा दूर होतो. तसेच थंडीपासून रक्षण होते.

● वायव्य स्नान:- वायव्यं गोरजोद्भवम् याचा अर्थ, गायीच्या खुराने उडणारी धूळ अंगावर घेणे हे वायव्य स्नान आहे.

● दिव्य स्नान:- आतपे सति या वृष्टि दिव्यं स्नानं तदुच्यते ।

सूर्याचे ऊन व पाऊस एकत्र पडत असताना त्या पावसात स्नान करणे हे दिव्य स्नान समजले जाते.

● वारुण स्नान :- बहिर्नद्यादिके स्नान वारूणं प्रोच्यते बुधैः।

नदी किंवा तलावाच्या वाहत्या पाण्यात स्नान करणे हे वारूण स्नान आहे. 

● मानस स्नान:- यद ध्यानं मनसा विष्णोर्मानस तत् प्रकीर्तितम् ।

मानस स्नान या प्रकारात भगवान श्री विष्णुचे ध्यान केल्याने मन व शरीराची शुद्धी होते असे ग्रंथात आले आहे.

स्नानस्यानन्तरं सम्यग्वस्त्रेणाङ्गस्य मार्जनम् कान्तिप्रदं शरीरस्य कण्डूत्वग्दोषनाशनम् ।। भावप्रकाश संहिता

स्नान केल्यानंतर शरीर कपड्याने व्यवस्थित पुसून घ्यावे. असे केल्याने कांति वाढते, खाज कमी होते व त्वचेच्या दोषांचे, विकारांचे शमन होते.

स्नान केल्यानंतर स्वच्छ, पवित्र, शुद्ध, मस्त, फ्रेश वाटते. मन, आत्मा, शरीर यांच्या वरचा मळ निघून जातो.

स्नान केलेल्या व्यक्तीच्या जवळ नकारात्मक शक्ती येत नाही. पुण्याची प्राप्ती होते. सकारात्मकता वाढते. स्नानाने शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक आरोग्य जपले जाते.