धर्मरक्षणार्थ झुंजलेले शंभूछत्रपती...

यावनी आक्रमनात अवघा दख्खन गारठलेला असताना छत्रपती शिवरायांनी इथल्या समाजमनात नवचेतनेचं स्फुल्लिंग चेतवलं, त्याला फुंकर घातली, ते जपलं, जाणीवपूर्वक वाढवलं. नवमहाराष्ट्र घडला तो त्यांच्या या स्वाभिमानी उद्यमशिलतेने. राज्याभिषेकाने त्यांच्या या 'स्वराज्य उद्योगावर' कालजयी शिक्कामोर्तब केले.

Story: इतिहासाची साेनेरी पान | संतोष काशीद |
28th January 2023, 10:39 Hrs
धर्मरक्षणार्थ झुंजलेले शंभूछत्रपती...

मराठ्यांना अन महाराष्ट्राला अभिषिक्त 'छत्रपती' लाभला. 'प्रतिपदेच्या चंद्रासारखं' स्वराज्य वाढलं, विस्तारलं. शत्रु निर्दालन केल्याने इथं रामराज्य अवतरलं. मात्र, नियतीने आपलं काम चोख बजावलं. अवघ्यांचा पोशिंदा असलेले शिवराय करोडो होनांचं राज्य इथेच टाकून अनंताच्या प्रवासाला कायमचे निघाले. शोकसागरात बुडालेलं स्वराज्य पुढचे कित्येक दिवस या घटनेतून सावरलं नाही. हा आघातच तसा होता. पण तरीही स्वराज्याची नौका अगदी बेमालूम तरली होती. शिवप्रभूंचा महत्त्वाकांक्षी वारसा चालवणे हे अत्यंत जिकिरीचं काम होते. शिवरायांनी शून्यातून उभारलेल्या स्वराज्याचा हा वैभवशाली वारसा तेढ्याच मजबूत खांद्यावर तोलून धरणारा वारसदार म्हणून शिवपुत्र संभाजीराजे खडे ठाकले. 

महाराष्ट्राचा हा दुसरा छत्रपती छातीची ढाल करून उभा राहिला तोच मूळी धगधगत्या अंगारांच्या तप्त ज्वाला अंगावर लेवून. स्वकीयांच्याच विखारी कटकारस्थानांनी भयंकर व्यापलेला असतानाही हा धुरंधर उभा राहिला. शिवरायांच्या धोरणांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा ध्यास मनात बांधलेला हा छावा प्रत्येकाला 'जशास तसे' उत्तर देण्यास समर्थ होता. स्वराज्य टिकले पाहिजे इतकेच नव्हे तर ते वाढलेही पाहिजे ही भावना ठेवून शंभूछत्रपतींनी आपली धोरणे आखली. इतके करत असताना त्यांनी तलवारीच्या जोरावर शत्रूच्या मनात जितकी आपली दहशत बसवली तेवढेच रयतेच्या मनावर अधिराज्य गाजवले. संभाजी महाराजांच्या कार्यकाळात स्वराज्यात प्रचंड धामधूम उठली होती. खासा औरंगजेब पाच लाखांचा सेनासागर घेऊन दख्खनेत उतरला होता. एकीकडे पोर्तुगीज, सिद्दी, इंग्रज अशा युद्ध आघाड्या उघडल्या असतानाच मोगल सत्तेला शह देण्याचं जिकिरीचं काम शंभूराजांवर येऊन ठेपले होते. याही काळात ते आपल्या विवेकबुध्दीला पटेल असे निर्णय घेत असत याचे दाखले इतिहासात अनेक आहेत. 

या सगळ्या काळात त्यांची स्वधर्मविषयक तत्वे प्रकर्षाने दिसून येतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाचा वेळोवेळी पुरस्कार केला होता, प्रसंगी त्यासाठी समशेरही उचलली होती. शंभूराजांनीही आपल्या कर्तृत्ववान पित्याचा हा गुण अलगद उचलला. धर्माचा पुरस्कार करण्याचा जेव्हा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा तेव्हा त्यांनी तो प्रत्यक्षात आणला. 

धर्मांतर झालेल्या हिंदुंना पुन्हा धर्मात घेण्याचा ऐतिहासिक निर्णय शिवाजी राजांनी नेताजी पालकर प्रकरणात मोठ्या धाडसाने दाखवला होता. शंभुकाळात १६८६ मध्ये गंगाधर रंगनाथ कुलकर्णी या ब्राह्मणाला मोगलांनी बाटवले आणि जबरदस्तीने मुसलमान धर्म स्विकारण्यास भाग पाडले. रंगनाथ सुमारे पाच वर्षे मुस्लिम म्हणून जगत होता. दरम्यान पुनः हिंदू धर्मात घेण्यासाठी त्याने रायगडवर संभाजी राजांकड़े वर्षभर प्रयत्न केले. शेवटी राजांनी त्र्यंबकेश्वरमध्ये प्रायश्चित्तपूर्वक त्याचे शुद्धिकरण करून घेतले आणि त्यास तो हिंदू झाल्याच्या अष्टप्रधानांच्या साक्षी घेतल्या आणि शुद्धीपत्र दिले. 

शंभूराजांनी गोव्यावर स्वारी केली तेव्हा गोव्यातील सामाजिक अन धार्मिक व्यवस्था पोर्तुगीजांनी संपूर्णतः उलथवली होती. शक्य तिथे हिंदू मंदिरांचा नाश करून तिथे चर्च, इगर्जी (छोटी चर्च, चॅपल) यांची उभारणी केली. असंख्य हिंदूंना येनकेन प्रकारे बाटवून, प्रसंगी हत्या करून का होईना पण हिंदुत्वाचा नाश करण्याचा सपाटा लावला होता. त्यावेळची वर्णने उलगडणारे असंख्य ग्रंथ आज उपलब्ध आहेत. हे अत्याचार म्हणजे हिंदुत्वावर जाणूनबुजून केलेला हल्ला होता हे संभाजी राजांना ज्ञात होते. त्यामुळेच त्यांनी आपल्या गोवा स्वारीमध्ये पोर्तुगीजांच्या धर्मावर, धर्मस्थळांवर जबर हल्ला केला होता. हिंदू जनतेवर पोर्तुगीजांनी केलेल्या अत्याचाराची इतकी प्रचंड चीड महाराजांना अन एकूणच सैन्याला होती की १६८३ सालातील गोव्याच्या प्रसिद्ध जुवें युद्धात मराठा सैनिकांनी राजांच्या आदेशाने पोर्तुगीजांची असंख्य इगर्जी अर्थात छोटी चॅपल नष्ट केली. जुवेंच्या चर्चमधील सेंट स्टीफन्सचा पुतळा (मूर्ती) जाळून टाकला. मेरीच्या हातात असलेल्या बालयेशूचं मस्तक तलवारीच्या एकाच घावात वेगळे केले. क्रूसावर केलेल्या येशूच्या प्रतिमेचेही पाय तोडले होते. हिंदूंवरील अत्याचाराचा बदला म्हणून महाराजांनी अशी जबरदस्त दहशत गोव्यात बसवली होती. 

शंभुराजेंनी अगदी कमी वयातच बुधभूषण सारखा उत्तम ग्रंथ साकारला होता. या ग्रंथाची पारायणे करावीत इतक्या ऐतिहासिक मूल्याचा, धार्मिक वचनांचा अन शंभूविचारांचा यात समावेश आहे. ग्रंथातल्या दुसऱ्या अध्यायात ३१६ व्या श्लोकात राजाची कर्तव्ये सांगताना ते 'धर्मासने प्रतिष्ठानं' असे म्हणतात अर्थात धर्मसनाची, धर्माची स्थापना करणे हे राज्याचे प्रमुख कर्तव्य आहे हे ते अगदी ठासून मांडतात. त्यांनी आपली चतुरंग सेना यासाठी अगदी जाणीवपूर्वक वापरली आहे. कवायती फौज बाळगणाऱ्या पोर्तुगीज, इंग्रज यांनाही यामुळे राजांची धास्ती होती. 

संभाजी राजांसाठी गागाभट्ट यांनी 'समनयन' नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथाची एक प्रत इटलीमधील फ्लोरेन्सच्या संग्रहालयात आहे. अभ्यासकांनी गागाभट्ट यांनी राजांसाठी लिहिलेला उत्तम धर्मग्रंथ असल्याचे म्हटले आहे. पुण्यातील भांडारकर संस्थेत या ग्रंथाची एक अपूर्ण प्रत असल्याचे डॉ. कमल गोखले म्हणतात. यात एकूण २६८ श्लोक असून प्रत्येक श्लोक धर्मविषयक चिकित्सा करणारा आहे. केशव पंडित यांनी 'धर्मकल्पकता' नावाचा एक धर्मचिकित्सा करणारा ग्रंथही १६८२ साली संभाजीराजांसाठी लिहिला होता. तंजावरच्या सरस्वती ग्रंथ संग्रहालयात याची एक प्रत असल्याचेही म्हटले जाते. शंभूराजांनी स्वतःच्या राज्याचे रक्षण करणारी जी आक्रमक भूमिका घेतली होती तिला पूरक असे हे धर्मकार्य त्यांनी अगदी सुरुवातीपासूनच आरंभले होते यात शंका नाही. 

शंभूराजांची धर्मकल्पना किती प्रखर, जाज्वल्य अन ठाम होत्या हे त्यांनीच रचलेल्या 'बुधभूषण' सारख्या उत्कृष्ट ग्रंथात पाहायला मिळते. या ग्रंथाच्या दुसऱ्या अध्यायातील ६११ वा श्लोक त्यासाठी अभ्यासनीय आहेत. यात शंभूराजे म्हणतात, 

जीवितम् मृतकम् मन्ये देहिनां धर्मवर्जितं।

मृतो धर्मेण संयुक्तो दीर्घजीवी भविष्यति।।

(बुधभूषणम अध्याय २ श्लोक ६११) 

अर्थात, धर्म सोडलेल्या माणसाचे शरीर जिवंत असून मृतवत् मानावे तर धर्मासह मृत्यु पत्करणारा मृत्यु होऊनही चिरंजीव होतो ! 

अगदी हेच तत्व शंभूराजांच्या अखंड आयुष्याला लागू पडते. त्यांनी स्वधर्माचा अवडंबर न माजवता त्याच्या रक्षणार्थ जे जे शक्य होईल ते सर्व केले आहे. साधू संतांना वर्षासने देण्यापासून ते परधर्मीय शत्रूंवर वचक बसवण्यापर्यंत सगळ्या अंगांनी त्यांनी आपल्या कर्तव्याची मोहोर उमटवली आहे. इतिहाच्या पानावर संभाजी राजांच्या चौफेर कर्तृत्वाची छाप उमटली आहे. अभ्यासकांनी त्याकडे एकवार नजर फिरवणे गरजेचे आहे. संभाजीराजे धर्मातील अवडंबर स्वीकारणारे नव्हते. मात्र जेव्हा जेव्हा धर्मविषयक बाबी निर्माण होतील तेव्हा तेव्हा ते आपली स्वतःची भूमिका मांडून त्यावर ठाम राहत असत. आज शंभूराजे स्वराज्यरक्षक की धर्मवीर असा निरर्थक वाद उकरून शिवप्रेमींमध्ये गोंधळ माजवण्याचे काम केले जात आहे. वास्तविक, कर्तृत्ववान पित्याच्या कर्तृत्वाला शोभेल असे वर्तनाचरण करणारा वारसदार म्हणून शंभूराजे इतिहासाच्या कालपटावर केव्हाचेच नोंदले गेले आहेत. ज्या तडफेने स्वराज्याच्या इंच-इंच भूमीचे त्यांनी रक्षण केले अगदी त्याच बेदरकार वृत्तीने त्यांनी स्वतःच्या मानसन्मानाची, धर्माची पताका त्रैलोक्यात फडकवली होती. त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने 'स्वराज्यरक्षण करणारे धर्मवीर' होते. त्यांच्या कर्तृत्वाची परिसीमा हा त्यांच्या व्यक्तित्वाचा मौल्यवान अलंकार आहे....