ऑस्ट्रेलियात खलिस्तानवाद्यांकडून हिंदू मंदिरांना लक्ष्य

Story: विश्वरंग । सुदेश दळवी |
27th January 2023, 10:13 pm
ऑस्ट्रेलियात खलिस्तानवाद्यांकडून हिंदू मंदिरांना लक्ष्य

गेल्या काही दिवसांपासून ऑस्ट्रेलियामध्ये हिंदू मंदिरांवर सातत्याने हल्ले केले जात आहे. गेल्या आठवड्यात बीएपीएस स्वामीनारायण मंदिरावर हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर आता अल्बर्ट पार्कमधील हिंदू मंदिरात तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात खळबळ उडाली असून प्रार्थनास्थळांच्या सुरक्षितेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. गेल्या महिन्याभरात ऑस्ट्रेलियातील मंदिरांवरील हा तिसरा हल्ला आहे. खलिस्तान समर्थक कोणतीही भीती न बाळगता मेलबर्नमधील तिन्ही हिंदू मंदिरांवर झालेल्या हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पुरावे म्हणून सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. मात्र, आतापर्यंत एकाही घटनेत पोलिसांनी कुणालाही अटक केलेली नाही.       आरोपींनी हिंदू मंदिरात तोडफोड करताना भारतविरोधी घोषणा दिल्या आहेत. याशिवाय मंदिराच्या भिंतीवर भारताचा निषेध करणारा मजकूर लिहिण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील आरोपींविरोधात कठोर कारवाई केली जाण्याची मागणी ऑस्ट्रेलियातील भारतीय समुदायाने केली आहे. ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील इस्कॉन मंदिर, ज्याला हरे कृष्ण मंदिर असेही म्हणतात. दरम्यान, अल्बर्ट पार्क मंदिरातही खालिस्तानी समर्थकांनी तोडफोड केली. मंदिरातील पुजाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी 'खलिस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान मुर्दाबाद' अशा भारतविरोधी घोषणाही भिंतींवर लिहिण्यात आल्या होत्या. अल्बर्ट पार्कातील हिंदू मंदिर हे भक्तियोग आंदोलनाचे केंद्र राहिलेले आहे. 'हिंदू मंदिरावर झालेला हा हल्ला अत्यंत निंदनीय आहे. या हल्ल्यामुळे आम्ही व्यथित झालो असून आरोपींवर कठोर कारवाई व्हायला हवी, असे इस्कॉन मंदिराचे प्रवक्ते भक्त दास यांनी म्हटले आहे. इस्कॉन मंदिरातील आयटी सल्लागार शिवेश पांडे नाराजी व्यक्त करताना म्हणाले, शांतिप्रिय हिंदू समाजाला दुखविण्याचे काम करणाऱ्या आणि द्वेष पसरविणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यात व्हिक्टोरिया पोलीस अपयशी ठरलेली आहे. व्हिक्टोरिया पोलिसांकडून हिंदू समाजाविरुद्ध द्वेषी अजेंडा चालवणाऱ्यांविरुद्ध कोणतीही कारवाई केली जात नाही. व्हिक्टोरियामधील नेत्यांनी दोनच दिवसांपूर्वी बहुसांस्कृतिक आयोगासोबत एक बैठक घेतली होती. त्यानंतरचा हा तिसरा हल्ला आहे. यापूर्वी १२ जानेवारीला खलिस्तान समर्थकांनी मंदिरावर हल्ला केला होता. यानंतर अवघ्या ५ दिवसांनी आणखी एका मंदिराला लक्ष्य करण्यात आले आहे. दरम्यान, हिंदू मंदिरांवर हल्ले करून खालिस्तानी समर्थक ऑस्ट्रेलियात द्वेष पसरविण्याचे काम करत असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे.       

यापूर्वी १२ जानेवारीला मेलबर्नमधील स्वामी नारायण मंदिरावर आरोपींनी भारतविरोधी घोषणा लिहिल्या होत्या. याशिवाय मंदिराला विद्रूप करण्याचाही प्रयत्न खालिस्तानी समर्थकांनी केला होता. त्यानंतर १७ जानेवारीला शिव विष्णू मंदिरावर अज्ञात आरोपींनी हल्ला केला होता. त्यातच आता अल्बर्ट पार्कमधील मंदिरावरही खालिस्तान समर्थकांकडून हल्ला करण्यात आल्यामुळे व्हिक्टोरिया पोलिसांनी आरोपींना अटक करण्याची कार्यवाही सुरू केली आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियात भारतीय समुदाय मोठ्या संख्येने राहतो. यात व्यवसाय, शिक्षण आणि नोकरीसाठी ऑस्ट्रेलियात वास्तव्य करणाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात आहे.