अफाट धर्मकार्य केलेले : स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद म्हणजे आपल्या भारताचे खरेखुरे रूप. भारताच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ते कायम झटले. त्यांच्या विचारांमधून उपनिषदांची चमक आेसंडत असे. आपल्या भारतातील अनेक थोर नेत्यांबद्दल त्यांना अभिमान होता. त्यांच्याविषयी थोडक्यात...

Story: प्रासंगिक। चित्रा रा. पराडकर, मो. ९४०४ |
25th January 2023, 12:12 Hrs
अफाट धर्मकार्य केलेले : स्वामी विवेकानंद

स्वामी विवेकानंद हे एक उत्तम वक्ते, लेखक तसेच कवीदेखील होते. १२ जानेवारी १८६३ रोजी सक्रांती दिवशी त्यांचा जन्म झाला. १९८५ साली स्वामीजींचा जन्मदिवस ‘युवक दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा, असे भारत सरकारने जाहीर केले. कुमार आणि तरुण गटातील मुला-मुलींसाठी स्वामी विवेकानंद हे सर्वार्थाने सुंदर आदर्श आहे. त्यांनी नेहमी विश्वाच्या कल्याणाचा विचार केला.                   

कोलकाता शहराच्या उत्तरेकडचा भाग म्हणजे सिमला तेथील दत्त कुटुंबात त्यांचा जन्म झाला. दत्त कुटुंब हे श्रीमंत आणि विद्वान कुटुंब होते. दानशीलता आणि खंबीरपणे डोकावणारी स्वातंत्र्यवृत्ती हे या कुटुंबाचे वैशिष्ट्य होते. त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे एक उत्तम वकील होते, तर आई भुवनेश्वरी देवी अतिशय चाणाक्ष आणि बुद्धिमान होत्या. विश्वनाथ दत्त यांनी वकिली पेशात भरपूर पैसा कमावला आणि भरभरून उधळलाही. ते स्वाभावाने अतिशय दानशूर व कनवाळू होते. त्यांनी अनेक होतकरू गरीब मुलांना शिक्षणासाठी सढळ हस्ते  मदत केली. त्यांचा हाच गुण स्वामी विवेकानंदांमध्ये उतरला. लहानपणी ते अत्यंत निर्भय तसेच  परोपकारी होते. दारावर कुणी भिकारी आला की, त्यांच्या हाताला जी वस्तू सापडेल ती त्याला देऊन टाकायचे. लहानपणी नरेंद्रनाथ किंवा नरेन या नावाने लोक त्यांना आेळखायचे. त्यांना बिलेही म्हणत. ते शिवभक्त होते. लहानपणी ते कितीतरी वेळ ध्यानस्थ बसायचे. त्यांच्या वडिलांनी त्यांना घरीच खासगी शिक्षकाची सोय केली होती. तेव्हा ते किती तल्लख बुद्धीचे आहेत, हे त्यांना समजले. त्यांची स्मरणशक्तीही तीव्र होती. ते स्वाभिमानी तसेच नम्रही होते. ते जस जसे मोठे होत गेले तस तसे ते अनेक विद्या शिकले. जसे गायन, पखवाज, तबला, सतार वादन इत्यादी कलांमध्ये ते निपूण झाले.                              

१६ व्या वर्षी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होऊन नरेंद्रनाथ यांनी प्रेसिडेन्सी काॅलेजमध्ये प्रवेश घेतला. १८८४ साली त्यांनी बी. ए. पर्यंतचे शिक्षण घेतले. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळविण्यासाठी त्यांनी भरपूर कष्ट घेतले. काॅलेजमध्ये प्रोफेसर हेस्टी यांचेे ते आवडते विद्यार्थी बनले. प्रो. हेस्टी यांच्यामुळेच नरेंद्रनाथ यांना ‘श्रीरामकृष्ण परमहंस’ यांच्यासारखे आध्यात्मिक तृष्णा असलेले गुरू भेटले आणि पुढे त्यांचे जीवन बदलले. 

इ. स. १८८१ नोव्हेंबर महिन्यात श्रीरामकृष्ण परमहंस नरेंद्रनाथ यांना प्रथमच भेटले. त्यांनी नरेंद्रनाथ यांना कोलकात्यातील दक्षिणेश्वराला येण्याचे आमंत्रण दिले. सूक्ष्म योग दृष्टीच्या साहाय्याने ते नरेंद्रनाथांचा अती उज्ज्वल भावी काल पाहू शकले. गुरूने सांगितलेल्या मार्गाने साधना करीत नरेंद्रनाथ उन्नती साधत होते. त्यांच्यासमवेत असलेल्या अन्य तरुण साधकांनी रामकृष्णांच्या आदर्शांना स्वीकारून काशीपूरच्या उद्यानात तपश्चर्या केली. त्यांच्या सेवेत हे सर्व तरुण सतत राहिल्याने त्या सर्वांच्यात अपूर्व प्रेमसंबंध जोपासले गेले आणि या ठिकाणीच भावी ‘रामकृष्ण संघाची’ पायाभरणी झाली. एके दिवशी सर्व शिष्यांना भगवे वस्त्रे देऊन गुरूने त्यांना संन्यास दीक्षा दिली व नरेंद्रनाथ यांचे नामकरण ‘स्वामी विवेकानंद’ असे केले. त्यांनी त्यांच्याकडून लोकशिक्षणाचे कार्य करवून घेतले. आपल्या गुरूंच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी भारत भ्रमण केले. शेवटी ते कन्याकुमारी या भारताच्या दक्षिण टोकाला जाऊन समुद्रातील शिलाखंडावर ध्यानस्थ बसले. त्यावेळी भारतातील दैन्य पाहून त्यांचे कासावीस झालेले मन अधिकच हळवे झाले. भारताच्या कल्याणासाठी येथील जनतेच्या उद्धारासाठी आयुष्य समर्पित करणे व त्यासाठी या मातृभूमीचा सेवक बनून झटणे,  असा दृढसंकल्प त्यांनी केला. अद्वैत वेदान्त विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आणि माणसातील सुप्त मनुष्यत्व जागे करण्यासाठी त्यांनी भारताच्या सीमा आेलांडून पश्चिमात्य जगात जाण्याचे ठरविले.                              

११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो शहरातील शिकागो - आर्ट इन्स्टिट्यूट येथे सर्वधर्मीय परिषदेला स्वामी विवेकानंद गेले होते. तेथे त्यांनी ‘अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो, अशी भाषणास सुरुवात केली आणि प्रचंड टाळ्यांचा कडकडाट झाला. या परिषदेत स्वामी विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना वेदांतावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्माचे सारतत्त्व एकच आहे असे सांगून अमेरिकेतील लोकांची मने जिंकली. वेदांत आणि योग या विषयांवर त्यांनी अमेरिका आणि इतर काही युरोपीय देशांमध्ये जाहीर व्याख्याने दिली. तसेच तरुणांना मार्गदर्शन, देशसेवा, धर्मजागृती अशी अनेक कार्ये केली.                              

अखेर ४ जुलै १९०२ रोजी त्यांनी समाधी घेतली. ते अत्यंत अल्प म्हणजे फक्त ३९ वर्षे जगले. इतक्या कमी काळात त्यांनी अफाट धर्मकार्य केले. त्यांचे कार्य हे येणाऱ्या पिढ्या सदैव लक्षात ठेवतील. कन्याकुमारी येथे समुद्रात स्वामी विवेकानंदांचे सुंदर असे स्मारक उभे आहे. एकदा तरी या स्मारकाला अवश्य भेट द्यायला हवी.