कंपन्यांमधील अपघातांत २२ कामगारांचा मृत्यू

साडेपाच वर्षांतील आकडेवारीतून स्पष्ट

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th January 2023, 11:52 Hrs
कंपन्यांमधील अपघातांत २२ कामगारांचा मृत्यू

पणजी : राज्यातील विविध कंपन्यांमध्ये जून २०१७ ते १८ जानेवारी २०२३ या सुमारे साडेपाच वर्षांच्या कालावधीत ४० अपघातांची नोंद झाली असून, त्यात २२ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर, ३२ जण गंभीर जखमी झाले आहेत.
आमदार दिगंबर कामत यांनी नुकत्याच झालेल्या अधिवेशनात वरील विषयाला अनुसरून अतारांकित प्रश्न विचारला होता. त्यावर कारखाने आणि बाष्पक खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी वरीलप्रमाणे लेखी उत्तर दिले आहे.
विविध औद्योगिक वसाहती आणि इतर ठिकाणी मिळून राज्यात एकूण ७९६ कंपन्या अर्थात कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये अनेक कामगार काम करतात. या कारखान्यांमध्ये अधूनमधून लहान-माेठे अपघात होत असतात. आग लागणे, छप्पर कोसळणे, मशिनरी खराब होऊन अपघात होणे असे प्रकार घडत असतात. अशाप्रकारे गेल्या सुमारे साडेपाच वर्षांत ४० अपघात झाले आहेत. त्यात २२ कामगारांचा मृत्यू झाला आहे तर, ३२ जण गंभीर जखमी झाले आहेत.
कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कारखाने आणि बाष्पक खात्याची नियमावली आहे. त्याचे पालन कारखान्यांकडून होते की नाही, याची जबाबदारी खात्याची आहे. काही कारखान्यांकडून याचे उल्लंघन केले जाते. अशांना खात्याकडून वेळोवेळी सूचना केली जाते. तरीही काही कारखाने त्याकडे दुर्लक्ष करत असतात. परिणामी अपघात होण्याची शक्यता बळावते, अशी मत कामगार वर्गातून व्यक्त होत आहे.

उत्तरातील ठळक मुद्दे...

- अपघातात मृत्यू पावल्या कुठल्याच कामगाराच्या कुटुंबीयांना कारखाने आणि बाष्पक खात्याकडून आर्थिक सहाय्य दिले गेलेले नाही.
- एकूण ४० अपघातांपैकी केवळ ७ प्रकरणांची कायदेशीर चौकशी करून कारवाई करण्यात आली आहे. तर अन्य प्रकरणांची चौकशी झाली आहे.