राज्यात गरजेइतकी वीज उपलब्ध : मुख्य अभियंते

पश्चिम, दक्षिण ग्रीडमधून ६२८ मेगावॅट मंजूर झाल्याचा खुलासा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th January 2023, 11:43 Hrs
राज्यात गरजेइतकी वीज उपलब्ध : मुख्य अभियंते

पणजी : गोव्याला पश्चिम आणि दक्षिण ग्रीडमधून ६२८ मेगावॅट विजेचा कोटा मंजूर झाला आहे. याशिवाय सोलर एनर्जी कॉर्पोरेशन, विद्युत व्यापार निगम लिमिटेड यांच्याकडून वीज मिळत आहे. त्यामुळे राज्यात सध्या गरजेइतकी वीज उपलब्ध आहे, अशी माहिती वीज खात्याचे मुख्य अभियंते स्टीफन फर्नांडिस यांनी दिली आहे.
आमदार देविया राणे यांनी गेल्या आठवड्यात झालेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात विजेच्या संदर्भात लेखी प्रश्न विचारला होता. त्यावर उत्तर देताना वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनीही वरील बाब नमूद केली आहे.
राज्याला ५८० ते ७०० मेगावॅट विजेची गरज आहे. पश्चिम आणि दक्षिण ग्रीडमधून ६२८ मेगावॅट वीज उपलब्ध होते. ही वीज सध्याच्या गरजेइतकी पुरेशी आहे. मागणी वाढल्यास अन्य मार्गांनी खाते वीजपुरवठा करत असते. सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून २५ मेगावॅट, विद्युत व्यापार निगम लिमिटेडकडून ६ मेगावॅट, शॉर्टटर्म ओपन एक्सेसकडून १०० मेगावॅट, नेट मीटरिंग यांचेकडून ३३ मेगावॅट वीज उपलब्ध होत असते. याशिवाय सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याकडून सौर ऊर्जेव्यतिरिक्त वीज दिली जाते. पंतप्रधान कुसुम योजनेखाली राज्याला अतिरिक्त ५० मेगावॅट वीज मिळते. वेदांंता, गोवा स्पाँज प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडूनही वीज उपलब्ध करून दिली जाते. यामुळे घरगुती वापरासाठी आणि औद्यागिक वापरासाठी आवश्यक तेवढी वीज उपलब्ध आहे, असे मंत्री ढवळीकर यांनी आपल्या लेखी उत्तरातून स्पष्ट केले आहे. पुढील काळात राज्याला पुरवठा होत असलेल्या विजेत आणखी वाढ होईल, असेही मंत्री ढवळीकर यांनी उत्तरात नमूद केले आहे.