अध्यापन वृक्ष

Story: पालकत्व । पूजा भांडारे कामत- सातोस्कर |
20th January 2023, 09:49 pm
अध्यापन वृक्ष

परमेश्वर अनुभूती होते जणू गूरु अन् माऊलीत, ज्ञानाचा प्रसाद अखंड ग्रहण करावा अध्यापन वृक्षाच्या सावलीत’’, मित्रांनो, आपल्या जीवनातील प्रथम गुरु म्हणजेच आपले माता पिता, ज्यांच्यामुळे आज आपण या पृथ्वीतलावर श्वास घेत आहोत. त्या प्रथम गुरुचे चरणस्पर्श करुनी, जेव्हा आपण आपल्या गुरुंच्या मार्गदर्शनास पात्र ठरतो, तेव्हा हे दोन्ही गुरु मिळून एकमेकांच्या संगतीने मुलांचे व्यक्तिमत्त्व घडवत असतात. अशा वेळी अनेक व्यत्यय वाटेत येतात, पण त्या व्यत्ययांना न जुमानता, हे मुलांचे चार हात आपले काम चालूच ठेवतात. शाळेत सगळीच मुले ध्यान एकाग्र करुन शिकतातच, असे नसते. कारण जसे की आपण जाणतो की मुलांची एकाग्रशक्ती खूप कमी प्रमाणात विकसित झालेली असते व त्यामुळे मुलांचे ध्यान अभ्यासाकडे वळवण्याकरीता शैक्षणिक क्षेत्रात शिक्षकांना अनेक विविधांगी पध्दतीचा वापर करुन मुलांना शिकवावे लागते. आणि याच पध्दतींना आपण अध्यापनाच्या प्रभावी पध्दती असे म्हणून संबोधित करतो. चांगले अध्ययन करणे हे एका विद्यार्थ्यांचे कर्तव्य असते, व ते अध्ययन तेव्हाच प्रभावी सिध्द होते, जेव्हा एक अध्यापक अध्ययनाच्या प्रभावी पध्दती मुलांना शिकवतो. आणि आज आपण याच विषयावर चर्चा करणार आहोत, की एक शिक्षक कोणकोणत्या पध्दतीने मुलांना शिकवू शकतो.

स्पष्टीकरण पध्दती

अध्यापनाच्या संपूर्ण प्रक्रियेत सर्वात जास्त ज्या पध्दतीचा वापर केला जातो, ती म्हणजेच स्पष्टीकरण पध्दती होय. आपल्या अभ्यासक्रमात सात ते आठ एकूण विषय जरी असले तरी सुध्दा असे होत नाही, की प्रत्येक विषयात पूर्णत: आपल्याला स्पष्टीकरण पध्दतीचाच वापर होतो. विज्ञान, गणितासारख्या विषयांमध्ये जिथे विषयांचे वर्णन नसते, प्रात्यक्षिकरीत्या प्रयोग करुन दाखवावे लागतात, असे विषय वळगता बाकी सर्व विषयांच्या अध्यापनास आपण ही पध्दती वापरु शकतो. अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या विषयाबाबत जी माहिती पुस्तकात असेल तसेच पुस्तकाबाहेरची माहिती, मुलांना समजावून सांगावी तसेच कुठल्याही विषयाची अधिक माहिती समजावून सांगत असताना, वेगवेगळ्या शैक्षणिक साधनांचा देखील वापर करता येतो, ज्यामुळे ही पध्दत आणखीनच प्रभावी होते. या पध्दतीत शैक्षणिक साधनांचा वापर करत असताना, दृक साधने, श्राव्य साधने, तसेच दृक श्राव्य मिश्र साधनांचा उपयोग करता येतो. आज काल तंत्रज्ञानात अनेक सुविधांचा विकास होत आहे. वर्गात त्यानुसार टीव्ही सारख्या सुविधांचा वापर होऊ शकतो.

प्रत्यक्ष अनुभवातून शिकणे

अनेक विषय असे असतात, ज्यात प्रत्येकवेळी आपण केवळ स्पष्टीकरण पध्दतीचा वापर करु शकत नाही. कधीकधी आपल्याला प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळते. विविधांगी प्रयोग केल्यानंतर, आपल्या डोळ्यादेखत आपण जे काही बघतो, त्यातून आपले ज्ञान वाढते. उदा. विज्ञान, गणित सारख्या विषयांमध्ये अनुभवाच्या माध्यमातून ज्ञान मिळवता येते. त्यामुळे प्रयोग शाळेत असंख्य प्रयोग करुन पाहिल्यानंतरच मग अध्ययन प्रक्रिया ठाम बनते.

खेळाच्या माध्यमातून ज्ञान

अनेकदा अध्ययन अध्यापन पध्दतीत नाविन्य निर्माण व्हावे याकरीता, अध्यापक विद्यार्थ्यांना अनेक खेळ खेळूनच त्यातून ज्ञानदान करतात. जसे पंचतंत्र गोष्टींच्या माध्यमातून तिन्ही राजकुमार शिकले व त्यांना ते कधी शिकले हेच समजले नाही, त्याचप्रमाणे काही मुलांना या अध्ययन प्रक्रियेत आपल्याला कधी, कसे व कधी, कुठल्या माध्यमातून ज्ञान मिळाले हे समजायला उशीर लागतो. मुख्यत: ज्यांचे व्यक्तिमत्त्व आकार घेत असताना जर काही व्यत्यय आला असेल तर अशा मुलांची आकलनशक्ती विपरीत दिशेने वळते. म्हणूनच त्यांचे ध्यान अभ्यासात केंद्रित होत नाही, व अशा मुलांना शिकवायची ही पध्दत उत्तम आहे.

कुठल्याही भाषेत व्याकरण हाताळण्याकरीता दोन पध्दती अध्यापक हाताळतात.

स्पष्टीकरणापासून उदाहरणापर्यंत

उदाहरणापासून स्पष्टीकरणापर्यंत

प्रथम अध्यापन प्रक्रियेत अध्यापक व्याकरणातल्या छोट्या छोट्या विषयांचे मुलांना स्पष्टीकरण देतात व त्यानंतर अधिक स्पष्ट करण्याकरता, उदाहरण देतात. व्दितीय पध्दतीत सर्वात प्रथम उदाहरणे सोडवली जातात व त्याबाबत स्पष्टीकरण नंतर दिले जाते.

बालकेंद्रीय अभ्यासक्रम, प्रकल्पाच्या योजना

बालकेंद्रीय अभ्यासक्रमात, शिक्षणातील मुख्य केंद्र बिंदू मुले असतात. याचमुळे अभ्यासक्रम चालू असताना, एक साधा प्रकल्प जरी करायचा झाला, तर त्याबद्दल सगळी तयारी मुलांवरच सोपवली जाते. मुलांनीच सर्व तयारी करायची, प्रकल्पाच्या विषयाचे चयन करुन, तो कसा पूर्ण करणार याबाबत वेगवेगळ्या योजना तयार करायच्या, त्या योजना आपल्या मार्गदर्शन गुरुच्या कानावर घालायच्या व मग गुरु त्यांना योग्य मार्ग दाखवतात. केवळ दिशानिर्देश करतात,  व मुले कुठलेही काम एकतेने कसे करतात, यावर आधारित मूल्यमापन करतात. जेणेकरुन मूल आणखीनच हुशार बनते, आपले काम करत असताना अनेक समस्यांमधून उपाय शोधते. व त्यामुळे त्यांच्या विचारसरणीत बदल होतो. व हा बदल त्यांना खूप फायदेशीर ठरतो.

चर्चा पध्दती

या अध्यापन पध्दतीमध्ये गुरु मुलांना एक विषय देतात, वर्गात मुलांचे दोन गट करतात, व त्यांना चर्चा करण्यास प्रवृत्त करतात. चर्चा होत असताना त्या विषयावर आधारित असंख्य सकारात्मक मुद्दे तसेच नकारात्मक मुद्द्यांचा शोध लागतो. अशा पध्दतीमुळे मुलांचे ध्यान आपोआपच विषयाकडेच तटस्थ राहते. 

अशा अनेक पध्दती आपल्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेत आहेत. या पध्दती म्हणजेच ज्ञानरुपी वृक्षाची वाढ व्हावी म्हणून त्यांना घातलेले पाणी, खत, त्यांना मिळत असलेल्या सूर्यप्रकाशाने जशी रोपे तरारुन उठतात, तसेच ज्ञानाच्या वृक्षालासुध्दा सर्व पध्दतींचे पोषण निरंतर मिळत राहणे गरजेचे असते.