सजले घर हळदी कुंकवाने ...

संक्रांत या सणासाठी महिलावर्ग विशेष उत्सुक असतो. कारण त्यांना अनेक पारंपरिक कार्यक्रम करता येतात. हळदी-कुंकू, वाण इत्यादी बऱ्याच गोष्टी महिला वर्गामध्ये साजऱ्या केल्या जातात. दरवर्षी जानेवारी महिन्यात येणाऱ्या या सणाला विशेष महत्त्व आहे, या दिवसांत घरात रंगीबेरंगी सजावट, तिळगूळ देणे तर काही भागात भेटवस्तू मागणे, पतंग उडवणे अशा वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. हळदी कुंकू समारंभ तर जोमात साजरा केला जातो घराघरातून .... आणि त्यासाठीची सजावट करताना तर आनंद ओसंडून वाहत असतो ... एकमेकांना संक्रातीच्या शुभेच्छा दिल्या जातात. तोंड गोड करत एकमेकांच्या घरी तिळगुळ वाटले जातात.

Story: घराबद्दल बरेच काही । गाैरी भालचंद्र |
20th January 2023, 09:47 pm
सजले घर हळदी कुंकवाने ...

सजावट करताना हस्तकलेचा वापर करून तुम्ही संक्रांती उत्सवादरम्यान तुमच्या घराची शोभा वाढवू शकता. तुम्ही रंगीबेरंगी पत्र्यांमधून पतंग तयार करू शकता किंवा सजावटीसाठी काही अतिरिक्त पतंग आणू शकता. हे पतंग समोरचा दरवाजा, घराच्या भिंती, गच्चीच्या भिंती, पायऱ्यांची रेलिंग, जेवणाचे टेबल इत्यादींना जोडता येतात. भिंतींवर किंवा छतावर टांगण्यासाठी तुम्ही कागदी पतंगाचे तोरणही बनवू शकता.  घर सजवण्यासाठी फुलांचा वापर करा कारण फुले अतिशय उत्साही आणि मोहक रूप देतात. जिवंतपणा आणतात वातावरणात; फुलांचा वापर विविध प्रकारे केला जाऊ शकतो, जसे की दरवाज्यांवर फुललेल्या कमानी बनवणे किंवा पतंगासारखे रांगोळीचे नमुने तयार करण्यासाठी वेगवेगळ्या रंगांची फुले एकत्र करणे. घराच्या आत, खिडक्या आणि रेलिंग. या दिवसात अनेक महिला आपल्या आजूबाजूच्या महिलांना बोलावून हळदीकुंकूवाचा कार्यक्रम आयोजित करतात. पण, हळदीकुंकूला देण्यात येणारे वाण  नेमके काय द्यावे? असा अनेकदा महिलांना प्रश्न पडतो. वर्षानुवर्षे वाण देणाऱ्या महिलांना दरवर्षी यंदा वाण काय द्यावे, हा मोठा गहण प्रश्न पडलेला असतो.

महिलांना स्वयंपाकासाठी मदत करणारे एखादं छानसं रेसिपी बुक वाण म्हणून देऊ शकता. यामुळे सुवासिनींना आनंदी होणार... बाजारात सध्या बरेच वेगवेगळ्या प्रकारचे डिझायनर आरसे मिळतात. असाच एखादा आरसा तुम्ही सुवासिनींना वाण म्हणून देऊ शकता... हळदीकुंकवाच्या वाणासाठी तुम्ही महिलांना टिकल्याचे पाकीट देऊ शकता. आपल्याकडे येणाऱ्या बहुसंख्य महिलांना कोणत्या प्रकारच्या टिकल्या आवडतात, ते ठरवा आणि ते वाण म्हणून सुवासिनींना देऊ शकता. नवीन वर्ष सुरू झाल्याने हळदीकुंकवाच्या वाणासाठी वाण म्हणून तुम्ही कॅलेंडरही देऊ शकता. एक वेगळं म्हणून तुळस ही सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानली जाते. ज्या घरात तुळस आहे तिथे लक्ष्मीचाही वास असतो. त्यामुळे तुम्ही हळदीकुंकवाचं वाण म्हणून तुळशीचं रोप देऊ शकता. असे बरेच पर्याय असतात.                        

मेहेंदी कोनचा वापरही सहसा प्रत्येकजण करतोच करतो. डेली युजसाठी अगदी छोटे छोटे, सिंगल स्टोन असणारे कानातले टॉप्स घालायला अनेकींना आवडते. असे कानातले होलसेल मार्केटमधून खरेदी करून तेदेखील आपण वाण म्हणून देऊ शकतो. ज्यामध्ये केवळ एक साडी व्यवस्थित ठेवता येते असे साडी कव्हर होलसेल मार्केटमध्ये  मिळतात. घरात कितीही साडी कव्हर असले तरी प्रत्येकीला त्याची गरज असतेच असते.  आणि त्यामुळे त्याचा योग्य उपयोग होतो.

काहीवेळा तर गमतीदार खेळ तयार करायचे असतात. आलेल्या प्रत्येकीला हळदीकुंकू आणि तिळगुळ वगैरे दिले  गेले. त्यानंतर मात्र वाण द्यायच्या ऐवजी, एक चिठ्ठ्या ठेवलेली टोपली प्रत्येकीसमोर धरण्यात आली तर फार गम्मत वाटेल. आणि त्यातील एक चिठ्ठी उचलायला सांगायची मग ही चिठ्ठी उघडल्यावर त्यात ज्या वस्तूचे  नाव  लिहिलेले असेल  ते वाण म्हणून देण्यात आलं तर खूप मस्त वाटते.  येणाऱ्या  प्रत्येकीला  या नाविन्यपूर्ण आणि नवीन अशा खेळाची मजा  वाटते , एक वेगळाच आनंद वाटतो. प्रत्येक वेळी कुतूहल, चिठ्ठीत काय लिहिले आहे याचे. अशा वेळी घरात निरनिराळ्या प्रकारच्या वस्तू आणून ठेवायच्या ... या प्रकारे सुद्धा खेळताना हळदीकुंकवाचा आनंद द्विगुणित होतो अगदी. आणि आलेल्या महिलांना पण त्याचा आनंद घेता येतो.

रंगीबेरंगी पतंगांनी आपल्या घराला सजवताना खूप छान वाटत असते आपल्या मनाला आणि घरालासुद्धा. वेगवेगळ्या रांगोळ्यांनी त्यांच्या अनेक रंगांनी सजलेले घर आपल्याला तसेच आपल्याकडे हळदीकुंकवासाठी येणाऱ्या प्रत्येकीला  मोहक वाटत असते. आनंद निर्माण करत असते.  

भरजरी ठेवणीतल्या  सुंदर सुंदर  साड्या,  आकर्षक पैठण्या नेसून आणि नथी तसेच नानाविध प्रकारचे दागदागिने घालून नटून सजून बायका हळदी कुंकवाला येत असतात. त्यामुळे घराला उत्सवाचे स्वरूप येत असते अगदी.  वातावरण उत्साहाने आनंदाने अजून सुरेख बनते. त्या निमित्ताने हास्य विनोद, गप्पा गोष्टी होत असतात. मनाला हलकं फुलकं करणारं, प्रसन्न करणारं वातावरण या हळदी कुंकवाच्या निमित्ताने निर्माण होत असते आणि घरालाही नव्याने सजायची  एक संधी मिळते.