विश्वचषकात अमेरिकेचे स्वप्न भंगले

नेदरलँड उपांत्यपूर्व फेरीत दाखल : उपउपांत्यपूर्व फेरीत ३-१ गोलने विजय


03rd December 2022, 11:30 pm
विश्वचषकात अमेरिकेचे स्वप्न भंगले

न्यूज डेस्क। गोवन वार्ता

दोहा : कतार फिफा विश्वचषकात दणका दाखवणाऱ्या नेदरलँड संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. शनिवारी पहिल्या उपउपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या संघाशी सामना झाला. 

मेम्फिस डेपे, डेली ब्लाइंड आणि डेन्झेल डमफ्रीज यांच्या चमकदार खेळामुळे या संघाने अमेरिकेला एकतर्फी लढतीत पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले. गट सामन्यांमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या नेदरलँड्सने अमेरिकेविरुद्ध ३-१ असा मोठा विजय नोंदवला.

नेदरलँड्सची गोल करून सुरुवात

गटात अव्वल स्थानी असलेल्या नेदरलँड्सने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ दाखवत उपांत्यपूर्व फेरीसाठीच्या सामन्यात अमेरिकेवर पकड कायम ठेवली. खेळ सुरू झाल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत संघाने गोल नोंदवून १-० अशी आघाडी घेतली. मेम्फिस डेपेने डेन्झेल डमफ्रीजचा शानदार पास गोलपोस्टमध्ये टाकून संघाला पहिले यश मिळवून दिले. पहिल्या हाफच्या इंज्युरी टाइममध्ये डेली ब्लाइंडने गोल करत नेदरलँडची आघाडी २-० अशी वाढवली.

सामन्याच्या शेवटच्या मिनिटांत अमेरिकेने जोर धरला आणि ७६व्या मिनिटाला पहिला गोल करण्यात त्यांना यश मिळाले. हाजी राइटने ख्रिश्चन पुलिसिकचा पास गोलपोस्टमध्ये टाकून स्कोअर २-१ असा केला. गोल केल्यानंतर लगेचच नेदरलँड्सकडून प्रत्युत्तर देत गोल करण्यात आला. डेन्झेल डमफ्रीजने गोल करून स्कोअर ३-१ असा केला आणि संघाला पुन्हा एकदा २ गोलने पुढे केले.

अमेरिकेविरुद्ध दणका दाखवणारा नेदरलँडचा संघ याआधी १९७४, १९७८ आणि २०१० मध्ये तीन वेळा या स्पर्धेचा उपविजेता ठरला आहे. २०१८ च्या विश्वचषकासाठी नेदरलँडचा संघ पात्र ठरू शकला नाही. २००२ च्या विश्वचषकानंतर अमेरिकेचा संघ कधीही उपांत्यपूर्व फेरीत पोहोचू शकलेला नाही. कतार फिफा विश्वचषकात नेदरलँडविरुद्धच्या पराभवामुळे त्यांचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले.