राणी लक्ष्मीबाईंच्या प्रेरणेने मी ‘नऊवारी रनर’ बनले !

मॅरेथॉनपटू क्रांती साळवी यांनी साधला ‘गोवन वार्ता’शी संवाद

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
24th July, 11:47 pm
राणी लक्ष्मीबाईंच्या प्रेरणेने मी ‘नऊवारी रनर’ बनले !

मॅरेथॉन हे नाव घेताच सामान्य माणसाला थकवा मारतो, तर एखादी व्यक्ती साडी घालून मॅरेथॉन कशी धावू शकते? हा प्रश्न येताच क्रांती साळवी हे नाव सामोरे येते. पेशाने अभियंता असलेल्या क्रांतीची तिच्या मुलामुळे मॅरेथॉनशी ओळख झाली. ही ओळख इतकी खोल होती की ती साडी घालून सर्वात वेगवान धावणारी मॅरेथॉनपटू बनली आणि यासाठी ती गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड धारकदेखील आहे. मेलबर्न आणि लंडन मॅरेथॉन पूर्ण करून ती आता रोटरी रेन रन २०२४ च्या १०व्या आवृत्तीत भाग घेणार आहे. तिचा हा मॅरेथॉनपटू बनण्याचा संघर्ष जाणून घेण्याकरीता क्रांतीचा ‘गोवन वार्ता’शी साधलेला संवाद.
.........
प्रश्न : यावर्षी रोटरी रेन रनमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्हाला कशामुळे प्रेरणा मिळाली आणि या रनमधून तुम्हाला काय अपेक्षित आहे?
उत्तर : रोटरी रेन रनचे वेगळेपण त्याच्या नावातच आहे. ‘रोटरी’ हा घटक समाजकारणाचे प्रतिनिधित्व करतो, तर ‘रेन’ (पाऊस) हा घटक कार्यक्रमाला अद्वितीय बनवतो. हे दोन्ही घटक माझ्यासारख्या धावपटूंना आकर्षित करतात, ज्यांचे उद्दिष्ट महिलांचे तसेच इतरांचे आरोग्य आणि शिक्षणाच्या कारणांना समर्थन देण्याचे असते. मी मुंबईतील माझ्या ग्रुपसोबत मागील आवृत्तीत सहभागी होते. या कार्यक्रमाची ही दहावी आवृत्ती आहे आणि ती मोठी असणार आहे ही या रनची प्रसिद्धी दर्शविते. महिलांच्या आरोग्यास मदत करणाऱ्या उपक्रमांवर माझा विश्वास आहे, त्यामुळे मी पुन्हा सहभागी होण्यास उत्सुक आहे.
प्रश्न : तुम्ही इतर कोणत्याही कारणासाठी धावत आहात का?
उत्तर : स्त्रियांचे आरोग्य आणि शिक्षण ही कारणे या शर्यतीसाठी पुरेशी लक्षणीय आहेत. आपल्या समाजात चिंतेची अनेक क्षेत्रे असताना, महिलांचे आरोग्य आणि शिक्षण हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण महिला हे कुटुंब, समाज आणि राष्ट्राचे मूळ आहे.
प्रश्न : तुम्ही कोणत्या श्रेणीत धावत आहात?
उत्तर : मी २१ किमी हाफ मॅरेथॉन प्रकारात धावणार आहे.
प्रश्न : साडीसारख्या पारंपरिक भारतीय पोशाखात मॅरेथॉन धावण्याचा तुमचा अनुभव तुम्ही आमच्या सोबत मांडू शकता का?
उत्तर : सप्टेंबर २०१८ मध्ये, मी पारंपरिक साडीत सर्वात वेगवान मॅरेथॉनसाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड पटकावला. त्यावर्षी मी पिंकाथॉन अॅम्बेसेडर म्हणून महिलांच्या फिटनेसला प्रोत्साहन दिले होते. भारतात खेड्यातील स्त्रिया शेतात अथक काम करतात, त्या साड्या घालून शेतात मुक्तपणे फिरतात यापासून प्रेरित होऊन मी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डच्या प्रयत्नासाठी साडीत पूर्ण अंतर मॅरेथॉन धावण्याचे आव्हान स्वीकारण्याचे ठरवले.
प्रश्न : आधुनिक धावण्याच्या तुलनेत पारंपरिक पोषक परिधान करताना मॅरेथॉनच्या तयारीमध्ये तुम्हला कोणते फरक आढळले?

उत्तर : मॅरेथॉनच्या प्रशिक्षणामध्ये लाँग-रन, टेम्पो रन, स्पीड इंटरव्हल्स आणि स्ट्रेंथ ट्रैनिंग यांचा समावेश होतो. साडीतील माझ्या वेगाशी जुळण्यासाठी मी साडीची तालीमही केली. नऊवारी साडी स्ट्राईडची लांबी मर्यादित करते, तर त्यासोबत घातलेले दागिने जड असतात, ज्याचा परिणाम धावण्यावर होतो. बर्लिनमधील उत्साह, संगीत आणि जल्लोष या तीन गोष्टींमुळे ही आव्हाने पार करता अाली. मला अनेकदा साडी जुळवावी लागली आणि वाऱ्याच्या झुळूकांशी झगडावे लागले. ग्रामीण भागातील महिला आणि राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रेरणेने तसेच मराठी ढोलाने उत्साही होऊन मी हसत खेळत ही शर्यत पूर्ण केली.