भारतीय महिला संघाचा नेपाळ संघाविरुद्ध बंपर विजय

आशिया चषक : शेफाली, हेमलताची शानदार खेळी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
23rd July, 10:31 pm
भारतीय महिला संघाचा नेपाळ संघाविरुद्ध बंपर विजय

दंबुला : भारतीय महिला संघाने नेपाळविरुद्ध ८२ धावांनी बंपर विजय मिळवला. महिला आशिया चषक २०२४ च्या गट टप्प्यात, टीम इंडियाने तिन्ही सामने जिंकून ‘अ’ गटात अव्वल स्थान पटकावले आहे. 

आशिया कपच्या उपांत्य फेरीत भारताने आधीच स्थान निश्चित केले आहे. या सामन्यात भारताने प्रथम खेळताना १७८ धावांची मोठी मजल मारली होती. प्रत्युत्तरादाखल, नेपाळ संघाने सतत विकेट्स गमावल्या आणि या पराभवासह ते स्पर्धेतून अधिकृतरित्या बाहेर झाले.


नेपाळविरुद्ध प्रथम खेळताना भारतीय महिला संघाने १७८ धावा केल्या. महिला आशिया चषक २०२४ च्या गट टप्प्यातील भारताचा हा शेवटचा सामना होता. टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा सलामीवीर शेफाली वर्माने केल्या. तिने ४८ चेंडूंत ८१ धावांची शानदार खेळी केली. शेफालीसह दयालन हेमलताने १२२ धावांची सलामी भागीदारी करून भारताला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाचे योगदान दिले. दुसरीकडे नेपाळकडून सीता राणा मगरने सर्वाधिक विकेट घेतल्या. तिने ४ षटकांत २५ धावा देत २ बळी घेतले.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो खूप चांगला ठरला. शेफाली वर्मा आणि दयालन हेमलता यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या १० षटकांत संघाची धावसंख्या ९१ धावांपर्यंत नेली. त्यानंतरही दोघांनी जोरदार फलंदाजी करत पुढच्या ३ षटकांत २३ धावा केल्या. पण हेमलता १४व्या षटकात बाद झाली. तिने ४२ चेंडूंत ४७ धावा केल्या. अवघ्या ९ चेंडूंनंतर शेफाली वर्माही मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात यष्टीचीत झाली. शेफालीने ८१ धावांच्या खेळीत १२ चौकार आणि एक षटकार लगावला.

शेवटच्या ३ षटकांत भारताच्या ३५ धावा

हेमलता आणि शेफाली बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा रनरेट मंदावला. १६व्या आणि १७व्या षटकात फक्त १२ धावा झाल्या. पण शेवटच्या ३ षटकांत भारताने ३५ धावा केल्या आणि त्यांचा डाव १७८ धावांवर संपला. 

शेवटच्या षटकांमध्ये जेमिमाह रॉड्रिग्जने १५ चेंडूंत २८ धावांची छोटी खेळी खेळून टीम इंडियाला १७० च्या पुढे नेले. रॉड्रिग्जने आपल्या खेळीत ५ चौकार मारले. नेपाळच्या गोलंदाजांचा एवढी धुलाई झाली की सातपैकी चार गोलंदाजांनी १० पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने धावा दिल्या. सीता राणाने २, तर कविता जोशीने १ विकेट घेण्यात यश मिळवले.