टीम ‌इंडियाचा उपांत्य फेरीत प्रवेश

महिला आशिया कप टी-२० : आज नेपाळ विरुद्ध गटातील शेवटचा सामना

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
22nd July, 12:03 am
टीम ‌इंडियाचा उपांत्य फेरीत प्रवेश

दंबुला : श्रीलंकेत सुरू असलेल्या महिला आशिया कपमध्ये रविवारी‍ हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने यूएईचा ७८ धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. भारत २३ जुलै रोजी नेपाळ विरुद्ध गटातील शेवटचा सामना खेळणार आहे. यूएईविरुद्धच्या विजयासह भारतीय संघ अ गटातील गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे. भारताच्या खात्यात चार गुण आहेत आणि +३.३८६ चा रन रेट आहे. महिला आशिया कप टी-२० मध्ये भारताने सलग दुसरा सामना जिंकला आहे. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता.
‍दंबुला येथील रंगिरी दंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात यूएईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने २० षटकांत ५ गडी गमावून २०१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात यूएईला २० षटकांत ७ गडी गमावून १२३ धावा करता आल्या आणि भारताने हा सामना ७८ धावांनी जिंकला. ऋचा घोष या सामन्याची मानकरी ठरली.
विजयासाठी २०२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या यूएईची सुरुवात चांगली झाली नाही. त्यांना पहिला धक्का बसला तो ११ धावांवर. रेणुका सिंगने तीर्थ सतीशला बाद केले. तिला केवळ चार धावा करता आल्या. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रिनिथाला पूजाने बाद केले. तिला फक्त सात धावा करता आल्या. यानंतर समायरा ५ धावा करून बाद झाली. या सामन्यात सलामीवीर ईशा ओजाने ३८ धावांची खेळी केली. तर खुशी १० धावा, हीना ८ धावा आणि रितिका ६ धावा करून बाद झाली. तर, कविशा ४० धावा करून नाबाद राहिली. या खेळीत तिने ३२ चेंडूंचा सामना करताना ३ चौकार आणि १ षटकार लगावला.
टीम इंडियासाठी दीप्ती शर्माने गोलंदाजीत ४ षटकांत २३ धावा देत २ बळी घेतले. तर रेणुका सिंग, तनुजा कंवर, पूजा वस्त्रकार आणि राधा यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिला संघाने २० षटकांत ५ गडी गमावून २०१ धावसंख्येपर्यत मजल मारली होती. या सामन्यात शेफाली वर्मा आणि स्मृती मानधना यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी २३ धावांची भागीदारी झाली. कविशाने उपकर्णधार मानधनाला रिनीता राजीथच्या हातून झेलबाद केले. गेल्या सामन्यात ४५ धावांची स्फोटक खेळी खेळणाऱ्या या स्टार फलंदाजाला केवळ १३ धावा करता आल्या. मात्र शेफालीने ३७ धावांची शानदार खेळी केली. या खेळीत तिने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या दयालन हेमलताला केवळ दोन धावा करता आल्या.
हरमनप्रीत कौर आणि जेमिमाह रॉड्रिग्स यांनी चौथ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली जी १२व्या षटकात कविशाने मोडली. जेमिमा १४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या ऋचा घोषने दमदार कामगिरी करत कर्णधारासोबत ७५ धावांची भागीदारी केली. १९.१ षटकात संघाची धावसंख्या १८१ असताना हरमनप्रीत ४७ चेंडूत ६६ धावांची स्फोटक खेळी करून बाद झाली. तिने ४१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीदरम्यान तिने सात चौकार आणि एक षटकार लगावला. त्याचवेळी यष्टीरक्षक फलंदाज घोषने २९ चेंडूंचा सामना करत ६४ धावांची तुफानी खेळी खेळली. यादरम्यान तिने १२ चौकार आणि एक षटकार लगावला. पूजा वस्त्राकर आणि ऋचा यांच्यात २० धावांची नाबाद भागीदारी झाली. विशेष म्हणजे पूजा नाबाद राहिली, तिला खातेही उघडता आले नाही.
यूएईकडून गोलंदाजीत कविशाने २ बळी घेतले. तर हीना आणि समायराने प्रत्येकी १ बळी घेतला. कर्णधार ईशाने २ षटकात २६ धावा दिल्या. मात्र तिला एकही गडी बाद करता आला नाही.
आशिया कपमध्ये भारतीय महिलांच्या सर्वोच्च धावा
महिला इंडिया टीमने आशिया कप २०२४ स्पर्धेत इतिहास रचला. टीम इंडियाने या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारली आहे. भारताने यूएई विरुद्ध स्पर्धेतील पाचव्या सामन्यात खेळताना २० षटकांत ५ गडी गमावून २०१ धावा केल्या. टीम इंडियाकडून कर्णधार हरमनप्रीत कौर आणि रिचा घोष यांनी अर्धशतकी खेळी केली. तर शेफाली वर्माने ३७ धावांचे योगदान दिले. त्यामुळे टीम इंडियाला २०० पार मजल मारता आली.