भाऊसाहेब बांदोडकर स्मृती फुटबॉल स्पर्धा : ओडिशा एफसीशी किताबी लढत
पणजी : स्व. भाऊसाहेब बांदोडकर स्मृती फुटबॉल स्पर्धा २०२४च्या उपांत्य फेरीत एफसी गोवाने सीडीएस डिफेन्सा वाय जस्टीसचा १-० गोलने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. हा सामना पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियम, फातोर्डा येथे मंगळवारी खेळवण्यात आला होता.
चेन्नईयीन एफसीविरुद्धच्या सामन्यात दोन रेड कार्ड मिळाल्यामुळे या सामन्यात डिफेन्साला खेळाडू निवडीचा कमी पर्याय होता. यामुळे त्यांना आपल्या राखीव गोलरक्षकाला मध्यरक्षक म्हणून खेळवणे भाग पडले. दरम्यान, एफसी गोवाला त्यांचे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ यांच्याशिवाय खेळावे लागले. मार्केझ इंटरकॉन्टिनेंटल कपमध्ये भारतीय संघासोबत असल्यामुळे त्यांना हैदराबादला रवाना व्हावे लागले.
६ सप्टेंबर रोजी रंगणार किताबी लढत
गतविजेत्या एफसी गोवाचा अंतिम फेरीत ओडिशा एफसी संघाशी सामना होणार आहे. दरम्यान दुसऱ्या उपांत्य सामन्यात मंगळवारी ओडिशा एफसी व ब्रिस्बेन रोअर एफसी संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात ओडिशाने ब्रिस्बेनचा २-१ गोलने पराभव केला. अंतिम फेरीचा सामना ६ सप्टेंबर रोजी पं. जवाहरलाल नेहरू स्टेडियम, फातोर्डा येथे रंगणार आहे.