बीसीसीआय आयओएला देणार ८.५ कोटी रुपये

पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी सचिव जय शाह यांची घोषणा

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
22nd July, 12:14 am
बीसीसीआय आयओएला देणार ८.५ कोटी रुपये

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ सुरू होण्यासाठी आता काही दिवस उरले आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय खेळाडूंना मदत करण्यासाठी बीसीसीआय ८.५ कोटी रुपये देणार असल्याची घोषणा सचिव जय शाह यांनी केली आहे. बोर्ड ही रक्कम भारतीय ऑलिम्पिक संघटनेला (आयओए) देणार आहे. जय शाह यांनी सोशल मीडियावर सदर माहिती दिली.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर लिहिले की, मला ही घोषणा करताना अभिमान वाटतो की, पॅरिस ऑलिम्पिक २०२४मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आपल्या खेळाडूंना बीसीसीआय पाठिंबा देत आहे आणि या मोहिमेसाठी आम्ही भारतीय ऑलिम्पिक संघटनेला ८.५ कोटी रुपये देत आहोत. आम्ही संपूर्ण भारतीय पथकाला शुभेच्छा देतो. भारताचे नाव उज्ज्वल करा. जय हिंद.
दरम्यान, भारत जगातील सर्वात प्रतिष्ठित स्पर्धेत भाग घेण्यासाठी त्याच्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या तुकडीसह सज्ज झाला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची ही २६ वी उपस्थिती असेल. यावेळी भारताकडून ११७ खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत असून भारताच्या पदकांची संख्या दुहेरी आकड्यापर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. ही बहुराष्ट्रीय स्पर्धा पॅरिसमध्ये २६ जुलै ते ११ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.

भारताने आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये एकूण ३५ पदके जिंकली आहेत. यामध्ये १० सुवर्ण, ९ रौप्य आणि १६ कांस्य पदकांचा समावेश आहे. टोकियो ऑलिम्पिक २०२० हे भारतासाठी आतापर्यंतचे सर्वात चांगले ऑलिम्पिक राहिले आहे, ज्यामध्ये देशाने एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांसह एकूण सात पदके जिंकली आहेत.