खेळांचा कुंभमेळा आजपासून

११ ऑगस्टपर्यंत रंगणार थरार : ११७ भारतीय खेळाडूंचा समावेश

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
26th July, 12:29 am
खेळांचा कुंभमेळा आजपासून

पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये २६ जुलैपासून खेळांचा कुंभमेळा भरणार आहे. २६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीमध्ये पॅरिस शहरामध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन होणार आहे. स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन शुक्रवारी, २६ जुलै होणार आहे. या वेळी एकूण ११७ भारतीय खेळाडू ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहेत.
पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्घाटन सोहळ्यासाठी हे शहर संपूर्ण तयारीनिशी सज्ज झाले आहे. पॅरिसमध्ये तिसऱ्यांदा या खेळांचे आयोजन करण्यात येत आहे. याआधी १९०० आणि १९२४ मध्ये ऑलिम्पिकचे आयोजन झाले होते. यंदाच्या ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा स्टेडियममध्ये नसून पहिल्यांदाच नदीवर होणार आहे. पॅरिस शहरातून वाहणाऱ्या सेन नदीवर हा सोहळा होणार आहे.
ऑलिम्पिक २०२४ तब्बल १० हजार खेळाडू सहभागी होणार असून त्यातील काही खेळाडू उद्घाटन समारंभाचा भाग असणार आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडू बोटीतून परेड करतील. ही परेड सहा किमी इतकी लांब असेल जी सेन नदीवर होईल. ही परेड ऑस्टरलिट्झ ब्रिजपासून सुरू होईल आणि शहराच्या मध्यभागी जाऊन आयफेल टॉवरपर्यंत पोहोचेल. सुमारे ९४ बोटी या परेडचा भाग असतील. ऑलिम्पिकमधील उद्घाटन समारंभासाठी देशांचा क्रम यजमान देशाच्या राष्ट्रीय भाषेच्या अक्षरानुक्रमे ठरवला जातो. त्यामुळे चायनीज तैपेई ताझिकिस्तान आणि टांझानिया यांच्यामध्ये १८०वा देश म्हणून मार्चपास्ट करतील.
पॅरिस ऑलिम्पिक उद्घाटन समारंभात परेड ऑफ नेशन्समध्ये भारत ८४ व्या क्रमांकावर येईल. उद्घाटन समारंभाच्या मार्चपास्टमध्ये ग्रीसचे खेळाडू कायम प्रथम असतात. ऑलिम्पिक खेळांना १८९६ मध्ये अथेन्स, ग्रीस येथे सुरूवात झाली. हा देश ऑलिम्पिक खेळांचे जन्मस्थान मानला जातो. यासाठी ग्रीसचे खेळाडू आधी मार्चपास्ट करतात. या वर्षी ग्रीसचा ध्वजवाहक रेस वॉकर अँटिगोनी दृष्टीबिओटी असेल.उद्घाटन समारंभासाठी यजमान देश मार्चपास्टच्या शेवटी असतो. यावेळी फ्रान्सचे खेळाडू मार्चपास्टमध्ये सर्वात शेवटी असतील. फ्रान्सच्या आधी पुढच्या ऑलिम्पिकचे म्हणजे २०२८ चे यजमानपद मिळवलेला देश म्हणजे अमेरिका असेल.
पदकांचे आयफेल टॉवरशी खास कनेक्शन
ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंच्या नजरा पदके जिंकण्याकडे असतील. भारताने आतापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत एकूण १० सुवर्ण, ९ रौप्य आणि १६ कांस्य पदके जिंकली आहेत. ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू यावेळी पदकांचा दुहेरी आकडा गाठण्यासाठी सज्ज झाले आहेत. गेल्या ऑलिम्पिकमध्ये भारताने ७ पदके जिंकली होती, ही भारताची ऑलिम्पिक इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी होती. पण यंदाचे हे ऑलिम्पिक मेडल खासप्रकारे तयार केले आहेत.ऑलिम्पिक पदकांचाही इतिहास आहे. सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदके पहिल्यांदा १९०४ सेंट लुईस गेम्समध्ये वापरली गेली होती आणि तेव्हापासून पदके देण्याची ही परंपरा सुरू झाली. या पदकांचा आकार, वजन आणि रचनेत वेळोवेळी बदल झाले आहेत. ऑलिम्पिकचे आयोजन करणारे देशही त्यांच्या पद्धतीने पदके तयार करतात.
भारताचे तिरंदाजीत पहिल्या पदकाच्या दिशेने आश्वासक पाऊल
ऑलिम्पिक पदकांचे स्वतःचे वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे यावेळी पॅरिसमध्ये खेळल्या जाणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये देण्यात येणारी पदके एका विशेष धातूपासून बनवली आहेत. पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक दोन्ही पदके षटकोनी आकारात आहेत आणि त्यामध्ये आयफेल टॉवरच्या मूळ लोखंडी धातूचा एक तुकडा बसवला आहे. ज्या धातूचे कुकडे या पदकांवर बसवण्यात आले आहेत, हे धातूचे तुकडे आयफेल टॉवरच्या नूतनीकरण दरम्यान काढण्यात आले होते. प्रत्येक तुकडा त्याच्या मूळ रंगात तयार करून पदकाच्या मध्यभागी बसविला गेला आहे.
एलव्हीएमएच ज्वेलरी हाऊस, चौमेट यांनी या पदकाची रचना केली आहे. पदकाचा आकार षटकोनासारखा आहे कारण त्याचे सहा गुण फ्रान्सच्या नकाशाचे प्रतिनिधित्व करतात. ऑलिंपिकची सुवर्णपदके ही पूर्णपणे शुद्ध सोन्याने बनलेली नसतात. ही पदके प्रत्यक्षात ९२.५ टक्के चांदी आणि १.३४ टक्के सोन्याचे बनलेले आहेत. आयओएच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक सुवर्णपदकामध्ये ६ ग्रॅम सोने असले पाहिजे. पॅरिसमधील प्रत्येक सुवर्णपदकाचे वजन ५२९ ग्रॅम असेल.
दीपिका कुमारी व्यतिरिक्त भारताकडून अंकिता भगत आणि भजन कौर सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत एकूण ६४ तिरंदाजांचा सहभाग होता. अव्वल चार संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळणार होता आणि टीम इंडियाने चौथ्या स्थानी येत उपांत्यपूर्व फेरीतील आपले स्थान निश्चित केले.महिला तिरंदाजी संघाची उपांत्यपूर्व फेरीत मारली धडकभारतीय तिरंदाजांच्या वैयक्तिक गुणांमध्ये अंकिता भक्त सर्वांत अचूक होती. तिने अचूक तिरंदाजी करत एकूण ६६६ गुण मिळवले आणि ती ११व्या क्रमांकावर राहिली. त्यांच्या खालोखाल भजन कौर हिने ६५९ गुणांसह २२ वे स्थान पटकावले. दीपिका कुमारी अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकली नाही आणि ती ६५८ गुणांसह २३व्या स्थानावर राहिली.महिला
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये २५ जुलैपासून भारताच्या खेळांना सुरूवात झाली. गुरुवारी महिला तिरंदाजी स्पर्धेची रँकिंग फेरी पार पडली. भारताकडून तीन तिरंदाजांनी यात सहभाग घेतला पण कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. भारतीय तिरंदाजांमध्ये माजी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या दीपिका कुमारीकडून सर्वाधिक अपेक्षा होत्या पण ती मागे पडली. मात्र, ही सांघिक स्पर्धा होती आणि असे असताना भारताच्या या तिन्ही महिला तिरंदाजांनी एकूण कामगिरी चांगली करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे.
रँकिंग फेरीत दीपिका, भजन आणि अंकिता या भारतीय त्रिकुटाने चमकदार कामगिरी करत एकूण १९८३ गुण मिळवले आणि पहिल्या चारमध्ये स्थान मिळवत उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट बुक केले. भारताशिवाय दक्षिण कोरिया, चीन आणि मेक्सिकोचे संघही पहिल्या चारमध्ये आहेत. कोरियाच्या महिला संघाने २०४६ गुण, चीनने १९९६ गुण आणि मेक्सिकोच्या संघाने १९८६ गुण मिळवले आणि हे तिन्ही संघ भारतापेक्षा पुढे होते.
तिरंदाजीतील उपांत्यपूर्व फेरीतील सामने
दक्षिण कोरिया वि. यूएसए/चिनी तैपेई
चीन वि. इंडोनेशिया/मलेशिया
मेक्सिको वि. जर्मनी/ग्रेट ब्रिटन
भारत वि. फ्रान्स/नेदरलँड
सिंधू, निरज चोप्रा, मिराबाई चानूकडून पदकांची अपेक्षा
२७ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधू सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. सिंधू भारताला पदक मिळवून देईल अशी दाट शक्यता आहे. लवलीना बोरगोहेन ही २७ जुलैपासून बॉक्सिंग रिंगमध्ये उतरणार आहे. त्याच्यासोबत निखत जरीनदेखील भारताला पदक मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. ७ ऑगस्ट रोजी वेटलिफ्टर मीराबाई चानू वेटलिफ्टिंग स्पर्धेतील ४९ किलो वजनी गटात भाग घेणार आहे. मीराबाई चानूने २०२० मध्ये झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले होते. याशिवाय, ८ ऑगस्ट रोजी भारताला सुवर्ण पदक मिळण्याची अपेक्षा आहे. स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा ६ ऑगस्ट रोजी पात्रता फेरीत आणि त्यानंतर ८ ऑगस्ट रोजी अंतिम फेरीत मैदानात उतरेल.

स्पेनची शानदार सुरुवात; अर्जेंटिना-मोरोक्को सामना बरोबरीत
पॅरिस : स्पेन आणि अर्जेंटिना यांनी पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत दुसऱ्या फळीतील खेळाडू उतरवले आहेत. स्पेनच्या संघाने क गटात विजयी सुरूवात केली, तर अर्जेंटिनाला ब गटात बरोबरीवर समाधान मानावे लागले.
पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील फुटबॉल सामन्यांना गुरुवारपासून सुरूवात झाली. ब गटातील सामन्यात मोरोक्कोने वर्चस्व राखताना अर्जेंटिनाला जखडून ठेवले होते. रहिम सौफिन याने ४५+२ मिनिटाला मोरोक्कोला पहिल्या हाफमध्ये आघाडी मिळवून दिली. त्यानंतर ४९व्या मिनिटाला पेनल्टीवर आणखी एक गोल करून मोरोक्कोने अर्जेंटिनाला बॅकफूटवर फेकले. ६८ व्या मिनिटाला सिमॉन गियूलिनोच्या गोलने अर्जेंटिनाला धीर दिला. तरीही त्यांना शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करावा लागला. ९०+१६ मिनिटाला मेडिना ख्रिस्टियनच्या गोलने अर्जेंटिनाचा पराभव टाळला. मोरोक्कोविरुद्धचा हा सामना २-२ असा बरोबरीत सुटला.
क गटातील सामन्यात स्पेनने २-१ अशा फरकाने उझबेकिस्तानचा पराभव केला. मार्क पुबिलने २९व्या मिनिटाला स्पेनला पहिला गोल करून दिला. त्यानंतर ४५+३ मिनिटाला पेनल्टीवर एल्डर शोमुरोडोव्हने गोल करून उझबेकिस्तानला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. दुसऱ्या हाफमध्ये दोन्ही संघांनी आघाडीसाठी जोर लावला, परंतु ६२व्या मिनिटाला सर्गिओ गोमेझच्या गोलने स्पेनला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर स्पेनने ही आघाडी कायम राखताना विजय पक्का केला.