दुसऱ्याचं भलं कर, तुझं भलं होईल

Story: वाचू आनंदे | अक्षता किनळेकर |
03rd December 2022, 09:04 pm
दुसऱ्याचं भलं कर, तुझं भलं होईल

नेहमी आपले कर्मच ठरवते की आपण सुखाच्या हिंदोळ्या झुलणार की नैराश्येच्या? 'जैसे कर्म तैसे फळ' हा विचार आपल्याला आपल्या अनेक धार्मिक ग्रंथात आढळतो. चांगल्या कर्माचे फळ चांगले व वाईट कर्माचे फळ वाईट हे माहीत असून देखील मनुष्य अनेक वेळा दुष्कर्माच्या जाळ्यात अडकून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतो व आपल्यावर आलेल्या संकटांमुळे देवाला दोषी ठरवत असतो. परमेश्वर कृपावंत, दयावंत असल्यामुळे तो ही आपल्या लेकरांनी आपल्यावर केलेले चुकीचे आरोप सहन करतो व आपल्याला योग्य मार्ग दाखवितो.

याच विषयावर आधारित गोविंद सदाशिव पोके रचित 'दुसऱ्याचं भलं कर तुझं भलं होईल' ही ५५ पृष्ठांची उत्तम नाटिका आहे. श्री. गोविंद सदाशिव पोके हे 'सद्गुरू श्री. वामनराव पै' यांचे अनुयायी आहेत. सद्गुरू श्री. वामनराव यांच्या विचारांचा त्यांच्यावर असलेला प्रभाव त्यांच्या पुस्तकात दिसून येतो. आपल्या गुरुप्रती त्यांच्या मनात अनन्यसाधारण आदर आहे. आपल्या बुद्धी विचारांचा वापर करून सद्गुरुंच्या मुखातून ऐकलेली कथा त्यांनी नाट्यस्वरूपात वाचकांच्या समोर ठेवली आहे.

पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणजे पुस्तकाची 'अर्पणपत्रिका'. त्यांनी पुस्तकाच्या सुरुवातीलाच अर्पणपत्रिकेद्वारे देशातील पीडित, शेतकरी, गरीब, देशसेवक इत्यादींचे स्मरण करून हे पुस्तक त्यांना अर्पण केले आहे. माजी शिक्षक, मुख्याध्यापक व गोवा राज्य पुरस्कार कीर्तनकार श्री. व्ही. जी. शेटगांवकर यांनी श्री गोविंद सदाशिव पोके यांच्या पुस्तकाला समर्पक प्रस्तावना दिली आहे. श्री व्ही. जी. शेटगांवकर व श्री. गोविंद सदाशिव पोके हे दोन्ही एकाच गावी राहत असल्यामुळे गोविंदजीविषयी असलेली आत्मीयता शेटगांवकर यांच्या प्रस्तावनेत दिसून येते. ते लेखकाचे पोटभरून कौतुक करतात. 

ही नाटिका मराठी भाषेत असून लेखकाने अनेक ठिकाणी "घडे भरले की वडे मिळतात" यासारख्या म्हणींचा वापर व "प्रयत्न हे रत्न देवापेक्षा श्रेष्ठ", "पैसा कमावणे हे जितके महत्त्वाचे आहे, त्याहूनही कितीतरी अधिक महत्त्वाचे आहे ते माणसे जोडणे"  यासारख्या अनेक सुविचारांचा वापर पुस्तकात केल्यामुळे पुस्तक वाचताना अनेक जीवनमूल्यांचा धडाही वाचकांना मिळतो. प्रसंगानुरूप गीतांचाही वापर लेखकाने केला आहे ही या नाटिकेची जमेची बाजू आहे. लेखक पेडणे तालुक्यातील असल्यामुळे नाटिकेत गावांची नावे काल्पनिक न वापरता पेडण्यातील पार्से, तुये इत्यादी गावांची खरी नावे त्यांनी वापरली आहेत.

पुस्तकाचे मुखपृष्ठ पुस्तकाला साजेसे आहे. नाटिका असल्यामुळे त्यावर रंगमंचाचा लाल पडदा दाखविला आहे. नाटिकेत नारदाच्या मार्गदर्शनामुळे माणसाचे कसे भले होते हे दाखविल्यामुळे नारदाचे चित्र व सृष्टी रचेता ब्रह्मदेवाचे चित्र ही मुखपृष्टावर असल्यामुळे मुखपृष्ठ अधिकच मनोवेधक झाले आहे. एक गृहस्थ जीवनातील तंट्याला कंटाळून आत्महत्या करायला निघतो. त्या गृहस्थाला नारदाचे मार्गदर्शन लाभते. नारद त्याला एका संतांकडे जायला सांगतात. त्या गृहस्थाला वाटेवर मुक्या मुलीची दुःखी आई, कंपनीचे नुकसान झालेला व्यापारी, वडिलोपार्जित धनाच्या शोधात असलेले दोन भाऊ, ही माणसे भेटतात. 

सगळी माणसे आपल्या दुःखाचे कारण त्या संताला विचारून त्याचे निरसन करण्याची विनंती गृहस्थाला करतात. गृहस्थ संतांकडे पोहचल्यावर संत गृहस्थाला कोणत्याही तीनच शंका विचार असे सांगतो. गृहस्थ आपला प्रश्न मागे ठेवतो आणि त्या सर्व माणसांचे दुःख संताला विचारतो. अशा प्रकारे, दुसऱ्याच्या प्रश्नांना प्राधान्य दिल्यामुळं, आपल्या आधी दुसऱ्याचा विचार केल्यामुळे गृहस्थाचे जीवन कसे सुखी होते हीच कथा सांगणारी ही नाटिका आहे.  मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याची वृत्ती माणसांची असल्यामुळे आजकाल स्वार्थामुळे कुणीही कुणाचे भले चिंतीत नाही. दुसऱ्याचे भले केल्याने आपले भले होईल या विचाराचा आता सगळ्यांना विसर पडला आहे. याच अवगुणांमुळे सर्व असूनसुद्धा माणूस कसा असमाधानी व दु::खी आहे हे या नाटिकेत वाचायला मिळते. ही नाटिका म्हणजे नैतिक मूल्यांची शिकवण देणारा, कौतुकास पात्र ठरणारा ग्रंथ आहे. ही नाटिका म्हणजे मंगल स्तोत्र आहे.

लेखक : गोविंद सदाशिव पोके 

साहित्य प्रकार : नाटिका 

पृष्ठसंख्या : ५५ 

प्रकाशक : गोविंद सदाशिव पोके 

किंमत : १००/- रुपये