कुलाल हल्लाप्रकरणी अटकेतील संशयितांच्या कोठडीत वाढ

|
03rd December 2022, 12:11 Hrs
कुलाल हल्लाप्रकरणी अटकेतील संशयितांच्या कोठडीत वाढ

 प्रतिनिधी। गोवन वार्ता      

मडगाव : कोलवा सर्कलनजीक २७ रोजी रात्री गुंड विजय कुलाल याच्यावर पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याप्रकरणी अफझल शेख, रिहान अहमद व क्रिष्णा लोहार यांना अटक करण्यात आली होती. त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर पोलिसांकडून संशयितांना न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे.       

कोलवा या ठिकाणी रविवारी रात्री हॉटेलमधील झालेल्या बाचाबाचीनंतर संशयित वॉल्टर फर्नांडिस, जोसेफ सिक्वेरा, सायमन साल्ढाणा, अफझल शेख, रिहान अहमद व क्रिष्णा लोहार यांनी गुंड विजय कुलाल याला मारहाण केली. कुलाल याला काठीने, दगडाने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत व्हिडिओ काढला व 

समाजमाध्यमात व्हायरल केल्यानंतर सोमवारी सायंकाळी फातोर्डा पोलिसांकडून सहाजणांविरोधात गुन्हा नोंद करत अफझल शेख, रिहान अहमद व क्रिष्णा लोहार या तिघांना अटक करण्यात आली. न्यायालयाकडून तिन्ही संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. शुक्रवारी पोलीस कोठडीची मुदत संपल्याने पोलिसांनी संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाकडून आणखी तीन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या प्रकरणी पसार असलेले वॉल्टर फर्नांडिस, जोसेफ सिक्वेरा, सायमन साल्ढाणा या संशयितांचा शोध सुरू आहे. दरम्यान, या तिन्ही संशयितांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.