बलात्कारप्रकरणी मंत्री बाबूश मोन्सेरात विरोधातील सुनावणी १२ जानेवारीला

|
03rd December 2022, 12:07 Hrs
बलात्कारप्रकरणी मंत्री बाबूश मोन्सेरात विरोधातील सुनावणी १२ जानेवारीला

प्रतिनिधी। गोवन वार्ता                                    

पणजी : पणजीचे आमदार तथा मंत्री अातानसियो (बाबूश) माेन्सेरात यांच्या विरोधात लैंगिक अत्याचार प्रकरणी तक्रार दाखल केलेली पीडित मुलगी आजारी असल्यामुळे शुक्रवारी न्यायालयात हजर राहिली नसल्याची माहिती तिच्या वकिलांनी दिली. याची दखल घेऊन न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ जानेवारी २०२३ रोजी ठेवली आहे.             

पीडित अल्पवयीन मुलीने संशयित बाबूश माेन्सेरात यांनी गुंगीचे औषध देऊन आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप २०१६ मध्ये केला होता. त्याची दखल घेऊन पणजी महिला पोलिसांनी बाबूश यांच्यासह इतर दोघांविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६, ३४२, ५०६ कलमांखाली तसेच बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा २०१२ (पोक्सो)चे कलम ४ नुसार आणि माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६७ बी नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर महिला पोलिसांनी उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात २५० पानी आरोपपत्र दाखल केले, तसेच त्यात सुमारे ४० साक्षीदारांची साक्ष नोंदही केली आहे. 

या प्रकरणी बाबूश यांना अटक केल्यानंतर  न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. त्यानंतर न्यायालयाने ३ जून २०१९ रोजी माेन्सेरात यांच्यासह इतर संशयितांविरोधात आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला होता. बाबूश यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आरोप निश्चितीच्या आदेशाला आव्हान दिले होते. परंतु हा अर्ज मागे घेतल्यानंतर न्यायालयाने बाबूश माेन्सेरात यांच्यासह इतर संशयितांविरोधात अल्पवयीन मुलीवरील बलात्कार केल्याचे आरोप निश्चित करून खटला सुरू केला. 

या प्रकरणाच्या मागील सुनावणीवेळी  पीडित मुलीने न्यायालयात अर्ज दाखल करून सरकारी वकिलांना साहाय्य करण्यासाठी आपल्या वकिलांना परवानगी देण्याची मागणी केली होती. या अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार होती.