पचनसंस्था विकारांमुळे राज्यात वर्षाला सरासरी १,००० बळी!

पाच वर्षांत ५,२२५ मृत्यूंची नोंद; महिलांपेक्षा पुरुषांचा आकडा मोठा

Story: गायत्री हळर्णकर |
03rd December 2022, 12:00 am
पचनसंस्था विकारांमुळे राज्यात वर्षाला सरासरी १,००० बळी!पणजी : पचनसंस्थेच्या विकारांमुळे राज्यात वर्षाला सरासरी एक हजार जणांचा मृत्यू होतो. अशा विकारांनी गेल्या पाच वर्षांत ५,२२५ मृत्यूंची नोंद झालेली आहे. त्यात ४,६७९ पुरुष, तर ५४६ महिलांचा समावेश आहे, अशी माहिती जन्म-मृत्यू संदर्भात जारी झालेल्या अहवालातून समोर आली आहे.

मधुमेह, कॅन्सर आदींसारख्या इतर गंभीर आजारांसोबतच पचनसंस्थेशी संबंधित विकारही राज्यात वाढत आहेत. पचनक्रिया बिघडणे हे अशा रोगांचे मुख्य कारण आहे. शारीरिक तसेच मानसिक अस्वास्थ्यामुळे पचनक्रिया बिघडून त्याचा परिणाम शरीरावर होतो. त्यातून पचनसंस्थेशी संबंधित विविध आजार जडून त्यातच काहींचा मृत्यूही होतो. बदलती जीवनशैली, आहारामुळेच असे आजार वाढत चालल्याची माहिती काही पचन विकारतज्ज्ञांनी 'गोवन वार्ता'शी बोलताना दिली.

बदलता आहार, व्यसनाधीनता कारणीभूत

नागरिकांचा बदलता आहार तसेच मद्यपानासह इतर व्यसनांमुळे पचनसंस्थेशी संबंधित विकारांत वाढ होत आहे. पुरुषांमध्ये व्यसनाधीनता अधिक असते. त्यामुळे पुरुष अशा विकारांना लवकर बळी पडतात, अशी माहिती पचन विकारतज्ज्ञ डॉ. रोहन बडवे म्हणाले. पोषक आहार, प्रक्रिया केलेले अन्न टाळणे, रोजचा व्यायाम आणि व्यसनाधीनतेपासून दूर राहिल्यास पचनसंस्थेशी संबंधित आजारांपासून दूर राहता येते, असेही त्यांनी सांगितले.

तत्काळ ओळख झाल्यास मात शक्य

बदलत चाललेली जीवनशैली, जंक फूडचे वाढते सेवन, मद्यपान याचा नागरिकांच्या पचनसंस्थेवर परिणाम होत आहे. त्यामुळेच गोव्यात अति मद्यसेवनामुळे यकृताचा सिरोसिस किंवा पंचनसंस्थेशी संबंधित इतर आजार जडू शकतात. अशाच विकारांतून स्वादुपिंडाचा कर्करोगही होऊ शकतो. अशा आजारांची तत्काळ ओळख झाल्यास त्यावर उपचार करून मात करता येणे शक्य असते, असे पचन विकारतज्ज्ञ डॉ. संयम फळारी म्हणाले.