लेखन कौशल्याचा विकास

Story: पालकत्व । पूजा भांडारे कामत- सातोस्कर |
02nd December 2022, 09:14 Hrs
लेखन कौशल्याचा विकास

एका बाळाच्या मुखातून निघालेला पहिलाच शब्द आई किंवा बाबापासून सुरु झालेला शब्दांचा प्रवास, अखेरच्या श्वासापर्यंत चालू असतो. अशा या मनातील शब्दांना मुखावर आणायला तर सोपे असते, पण मुखावरुन ते एका कागदावर उतरविण्यास बरीच मेहनत लागते. त्यालाच आपण लेखन क्षमता म्हणून संबोधतो. आज आपण चौथे कौशल्य म्हणजेच लेखन कौशल्याच्या विकासाबाबत विचार करत असताना काही मुद्द्यांवर लक्ष देऊया.

लेखनाची अक्षमता

अनेक मुलांना बालपणापासूनच लेखनासंबंधित काही बाधा आढळून येतात. उदा. हातांच्या असंतुलनामुळे, हातात योग्य पध्दतीने पेन वा पेन्सिल पकडण्याकरीता अडचणी निर्माण होणे, अक्षरे उलटी सुटली लिहिणे, अशा पध्दतीच्या समस्या शारीरिक तसेच मानसिक अवस्थेशी संबंधित असतात. आणि या समस्यांचे निवारण जर शक्य असेल तर लहान वयातच व्हावे. 

आकलनशक्तीचा विकास

लेखन करण्याकरिता मनात विचार येणे सर्वप्रथम गरजेचे आहे. जेव्हा मुलांच्या मनरुपी समुद्रात विचारलहरी उठतील, तेव्हाच तर त्या किनाऱ्यापर्यंत येतील. त्यामुळे आपण लेखनास प्रारंभ करण्याआधी मुलांना वेगवेगळी स्थाने दाखविली पाहिजेत, त्यांनी अनुभवलेल्या प्रसंगांवर आधारित प्रश्न विचारले पाहिजेत, मुलांची मते लक्षात घेतली पाहिजेत, त्यामुळे त्यांचा स्वत:चा एक दृष्टिकोण तयार होईल. स्वत:चे निर्णय त्यांना स्वत: घेण्यास सांगावे, व आपण योग्य व अयोग्य याचे मार्गदर्शन करावे, जेणेकरुन मुलांची विचारप्रक्रिया विकसित होईल. एकुणच सांगायचे झाले तर जितके शब्द जास्त, तितके विचार जास्त, आणि तितकीच वाचनात व लेखनात वृध्दी होते.

मुळाक्षरांचे ज्ञान, व्याकरणाची जाणीव

कुठल्याही भाषेचा मूळ टप्पा म्हणजेच मुळाक्षरे होय. भाषेकडे पहाण्याची खूप लोकांची मानसिकता एकदम भिन्न असते. ‘अरे बाप रे, भाषा शिकणे किती कठीण आहे’ असा लोक विचार करतात. पण मुळात भाषा म्हणजेच अक्षरांचा खेळ, ज्या खेळात अनेक अक्षरे एकत्र येतात व शब्द तयार होतो, त्यातून वाक्ये तयार होतात, वाक्यातून परिच्छेद तयार होतो. इतकेच. सकारात्मकतेने जर आपण भाषेकडे पाहिले तर आपल्याला समजेल की भाषा शिकणे किती सोपे असते. त्यामुळे सर्वात आधी मुळाक्षरे समजून घ्यावी व सोपे सोपे व्याकरण समजावे.

शब्दभांडार

शब्दभांडार एक असे अक्षयपात्र, ज्यातील शब्द भरुन नेहमीच ऊतू जातात. ते कधीही कमी होत नाहीत, उलट वाढत जातात. त्यामुळेच आपण दर दिवशी निदान एक तरी नवा शब्द मुलांना शिकवावा. व आपणास माहीत नसल्यास, मुलांना शिकवताना आपणही नकळता खूप काही शिकतो. शब्दभांडारात जितकी जास्त भर पडेल, तितकीच लेखनातसुध्दा वृध्दी होईल.

वयानुसार प्रशिक्षण

आपल्या जीवन संचालकाने म्हणजेच परमेश्वराने आयुष्यातील प्रत्त्येक छोट्या मोठ्या घटनेला एक नेमका वयाचा टप्पा ठरवून ठेवला आहे व त्यानुसारच सर्व काही घडत जाते. जन्माला आलेल्या अर्भकाला शाळेत नेले तर त्याला काही कळणार नाही. पहिलीतल्या मुलाला एकदम दहावीच्या वर्गात बसविले तर तो भांबावून जाईल व रडू लागेल. यामागे सांगायचा मुद्दा असा की लेखनास प्रारंभ करताना प्रथम टप्प्याची सुरुवात अक्षरांच्या लेखनापासून करावी. कारण सुरुवातीलाच जर मुलांना लिहायला मोठमोठे मुद्दे दिले, वाक्ये दिली, तर ती एक शब्दही लिहिण्यास असमर्थ ठरणार, कारण त्यांचा पायाच कमकुवत असेल. आई वडील सतत आपल्या मुलांकडून अपेक्षा ठेवतात, पण आपल्या मुलाच्या आकलनशक्तीनुसार व त्याच्या वयाच्या टप्प्यानुसार त्यांचा हळूहळू विकास व्हायला हवा. आपल्या मुलाकडून त्याच प्रमाणात अपेक्षा बाळगाव्या, जितक्या त्यांच्या वयाकरीता पुरेशा व आनंददायी असतील. त्यामुळे सर्वप्रथम त्यांचा पाया मजबूत बनला पाहिजे. सुरुवातीला अक्षरे लिहायचे प्रशिक्षण देऊन मगच शब्दाकडे वळले पाहिजे. मुलांकडून आईबाबांनी अशा अपेक्षा ठेवाव्या, ज्या मुले आनंदाने साकार करतील. त्यांना अपेक्षांचे ओझे भासता कामा नये.

लेखन उपक्रम

एकदा का मुले शब्दांच्या तसेच वाक्यांच्या लेखनात पारंगत झाली, की त्यांना आपण नवनवीन उपक्रम देऊ शकतो. सर्वप्रथम सुवाच्च व वळणदार अक्षर व्हावे याकरीता चार ओळीच्या वहींचा लेखनाकरीता वापर करावा. मुलांना त्यांच्या मनात येईल तो कुठलाही प्रसंग, एका वहीवर लिहावयास सांगावा. मुले जे काही लिहितील, त्या त्यांच्या स्वत:च्या भावना असतील. त्यामुळे चूका जरी झाल्या तरी त्या दुरुस्त करुन द्याव्या. मुलांना दररोज एक वा दोन परिच्छेदांचा संदर्भ घेऊन शुध्दलेखन करण्यास सांगावे. शाळेत सुध्दा अनेक लेखनावर आधारित उपक्रम तसेच स्पर्धा घेतल्या जातात, उदा. परीक्षेचे उपक्रम, निबंध स्पर्धा, गोष्ट, कवितालेखन, पत्रलेखन, वृत्तांतलेखन, काव्यलेखन, अनुभवलेखन असे वेगवेगळे उपक्रम आपण राबवू शकतो. वर्गात मुलांना शिक्षकांनी अध्यापनाच्या वेळी महत्त्वाचे मुद्दे एका वेगळ्या वहीत टिपून ठेवण्याची सवय लावावी जेणेकरुन मुलांना स्वत:हून काहीतरी लेखन करण्याकरीता प्रेरणा मिळत राहील.

वर्तमानपत्रावरील साहित्याचे वाचन

लेखनात मूल एका योग्य स्तरावर येऊन पोहोचले की त्यांना सुरुवातीपासूनच इतरांचे साहित्य वाचण्याची सवय लावावी, मग ते वर्तमानपत्र असो वा इतर लेखक व कवीचे अनमोल साहित्य. ते वाचले असता मुलांच्या मनात देखील स्वत:हून काहीतरी लेखन करण्याची इच्छा जागृत होईल, व जिथे इच्छा असते तिथे देव सुध्दा नक्कीच साथ देतो असे म्हणतात ना, त्याचप्रमाणे मुलांच्या मनात सुध्दा उत्तम लेखन करण्याची भावना जागृत होईल.