...त्यामुळे कदाचित एखाद्या श्रद्धाचे प्राण वाचू शकतील !!

आयुष्याचा रिटेक कधी होत नाही आणि आयुष्यात आलेला क्षण एकदा गेला की तो परत येतही नाही, हे सर्व माहीत असूनही जेव्हा आयुष्यात असे काही विपरीत प्रसंग घडत जातात की, आपण या वाचलेल्या किंवा समजून घेतलेल्या सर्व गोष्टी विसरून जातो.

Story: मर्मबंधातील ठेव । कविता प्रणीत आमोणक |
02nd December 2022, 09:11 Hrs
...त्यामुळे कदाचित एखाद्या श्रद्धाचे प्राण वाचू शकतील !!

एखाद्या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळेस जर शॉट ओके झाला नाही, तर त्याचा रिटेक घेता येतो.  एखादे चित्र चांगले झाले नाही, तर ते परत काढता येऊ शकते. म्हणजेच एखादी गोष्ट जर आपल्या मनासारखी झाली नाही, तर आपण ती परत दुसर्‍यांदा वेगळ्या पद्धतीने करू शकतो. पण आपल्या आयुष्य जगताना त्या त्या प्रसंगाचा रिटेक मात्र कधी होऊ शकत नाही. त्यासाठी जगताना समोरचा आलेला क्षण किंवा प्रसंग कसा “ परफेक्ट “ होईल हे समजून घेऊन आयुष्य जगलो तर ते निश्चितच सुंदर होईल.

हे सर्व समजून ही आपल्याला तसे वागता येते का ? हा खरा प्रश्न आहे. आयुष्याचा रिटेक कधी होत नाही आणि आयुष्यात आलेला क्षण एकदा गेला की तो परत येतही नाही, हे सर्व माहीत असूनही जेव्हा आयुष्यात असे काही विपरीत प्रसंग घडत जातात की आपण या वाचलेल्या किंवा समजून घेतलेल्या सर्व गोष्टी विसरून जातो.

आयुष्य जगताना आपल्या अनेक प्रसंगांना सामोरे जावे लागते. कधी कधी मनाप्रमाणे घटना घडतात तर कधी मनाविरुद्ध घटना घडतात. अशा विविध प्रसंगांना सामोरे जाताना मनाच्या विविध अवस्था होत जातात. मनात विचारांचे काहूर माजते. तर कधी कधी मन उद्विग्न, विषण्ण होते. मनावरचा एकदा ताबा सुटला की, मन आपल्या हातात उरत नाही. ते बेलगाम होते. बेभान होते. नजरेसमोर अंधकार माजतो. पुढे काय करावे, ते कळत नाही. द्विधा मनस्थिती झाल्याने योग्य तो निर्णय घेऊ न शकल्याने परिस्थिती कधी कधी हाताबाहेर जाते. आणि मग क्षणार्धात होत्याचे नव्हते होऊन जाते.

मनात अशा वेळी विचारांचे काहूर उठत जातात आणि मन निराशेच्या गर्तेत खोलवर गिरक्या घेत जाते. अशावेळी समोर समजून घेणारी व्यक्ती नसेल तर परिस्थिती बिकट होते. काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे घडलेल्या श्रद्धा हत्याकांड पाहता श्रद्धा ही गेली दोन वर्षे विमनस्क अवस्थेत जगताना दिसत होती. तिने आपल्यावर जी परिस्थिती ओढवली आहे, याची कल्पना अनेकांना दिली होती. पण श्रद्धा जेव्हा जेव्हा व्यक्त झाली, आपल्यावर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडायचा तिने जेव्हा जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा तिच्यासोबत राहणार्‍या तिच्या मित्राने चालाकीगिरी करून श्रद्धाला आपल्या जाळ्यात ओढले आणि प्रेमाचे नाटक करून तिला परत आपल्या जवळच्या व्यक्तींकडे व्यक्त होण्याची संधी दिली नाही. आणि जेव्हा श्रद्धाने आपल्यावर होणार्‍या अन्यायाची वाचा फोडताना आपल्यासोबत राहणारा आपला मित्र हा आपल्या शरीराचे तुकडे करून मारून टाकण्याची भीती व्यक्त केली आणि याला न्याय मागण्यासाठी पोलीस स्थानकावर जी तक्रार दिली होती, ती ही तिच्या सोबत राहणार्‍या मित्राने गोड बोलून मागे घ्यावयास लावली. कारण श्रद्धाने जर आपल्या मित्राविरुद्ध पोलीस स्थानकात केलेली तक्रार जर पुढे गेली असती, तर श्रद्धाच्या त्या मित्राला तुरुंगाची हवा ही खायला लागली असती, आणि हे तिच्या मित्राला पक्के ठाऊक होते. म्हणूनच त्याने श्रद्धाला भुलावून श्रद्धाने पोलीस स्थानकात केलेली तक्रार मागे घ्यावयास लावली.

जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठवते, किंवा इतरांकडे मदत मागते, तेव्हा तिथे काहीतरी न घडण्यासारखे घडत आहे, याची जाणीव सुज्ञ नागरिकांनी ठेवणे गरजेचे आहे. कोणतीही व्यक्ती जेव्हा आपल्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध आवाज उठवते, किंवा आपल्यावर होणार्‍या अन्यायाविरुद्ध दाद मागते, तेव्हा तिच्याकडे सहानुभूतीने पाहून तिला योग्य तो सल्ला किंवा मदत करणे हे प्रत्येक जागरूक नागरिकाचे कर्तव्य आहे.

 नेहमी उत्साहात वावरणारी व्यक्ती जर अकस्मात उदास दिसू लागली, किंवा कोणाशी संपर्क टाळू लागली, अथवा एकलकोंडी राहू लागली, तर त्या व्यक्तीशी संवाद साधून त्या व्यक्तीला बोलके करून त्या व्यक्तीच्या मनातील दुख जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे. श्रद्धा ही या परिस्थितीतून गेली होती. काही महिन्यापूर्वीपासून ती आपल्या मित्र परिवाराशी किंवा आपल्या ऑफिसमधील सहकार्‍यांशी संपर्क टाळताना एकलकोंडी बनली होती. तिचा कोणाशीच जास्त संपर्क नव्हता.

नेहमी बोलकी, समाजप्रिय असणारी व्यक्ती जेव्हा एकलकोंडी बनते, तेव्हा  त्या व्यक्तीला बोलके करताना प्रथम विश्वासात घेऊन त्या व्यक्तीच्या मनात कोणते विचार घोळत आहेत, किंवा त्या व्यकीचे दु:ख काय आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. मन जेव्हा विमनस्क होते, तेव्हा माणसाला आपण काय करत आहोत , याचे भान उरत नाही. विचार करण्याची शक्ती नष्ट होते. शरीर तसेच मन ही क्षीण होत जाते.

अशी विमनस्क परिस्थिती आपल्या आयुष्यात येऊ नये म्हणून रोज भविष्यात किंवा भूतकाळातील घटनेत गुंतून न जाता समोर आलेला क्षण आनंदाने भरभरून जगायला शिकायला हवे. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार हे असतातच. आपण सर्व जण एकदम परिपूर्ण असे नसतोच. त्यामुळे आयुष्यात जर मनाला न पटणारे प्रसंग किंवा मनाविरुद्ध असे काही प्रसंग घडतात, तेव्हा मनात जे विचारांचे वादळ घोंघावते. हे वादळ शांत करण्यासाठी आपण आपल्या भावना किंवा मनातील विचार आपल्या कुटुंबातील व्यक्तींना, मित्र मैत्रिणींना बोलून दाखवायला हवेत. त्यांचे सल्ले घ्यायला हवेत. आणि हो, आपल्या अवतीभोवती जर अशीच एखादी भरभरून बोलणारी श्रद्धा जर एकलकोंडी राहताना दिसली, किंवा तुमच्याशी संपर्क टाळू लागली, तर नक्कीच जागरूक राहून आपले कर्तव्य बजावण्यास विसरू नका. नाहीतर काही दिवसांनी ती श्रद्धा आपल्याला ३५ किंवा त्यापेक्षाही जास्त तुकड्यात पहायाला मिळेल.

अशी दुर्घटना परत होऊ नये, त्याबद्दल प्रत्येकाने आपल्या सभोवताली किंवा आपण ज्यांच्या संपर्कात नेहमी असतो, त्या व्यक्तींच्या स्वभावातील होणारे बदल लक्षात घेताना समाजाप्रती असलेले आपले कर्तव्य निभावण्याचा प्रयत्न करावा व शक्य असल्यास अशा व्यक्तींना योग्य ती मदत जरूर करावी. त्यामुळे कदाचित एखाद्या श्रद्धाचे प्राण वाचू शकतील !!....