नाट्य ' तारा ' पार्सेकर

प्रत्येक माणसाच्या अंगी कोणती ना कोणती कलाही असतेच. काही जण या कलेेकडे आवड म्हणून पाहतात तर काही जण कलेसाठी संपूर्ण जीवन झोकून देतात. कहाणी आहे सौ. तारा ज्ञानेश्वर पार्सेकर या स्त्री कलाकाराची जिने संपूर्ण जीवन नाट्यकलेचा हात धरून आपले स्वप्न आणि ध्येय पूर्णत्वास आणले.

Story: तिची गगनभरारी। सिंथिया कृष्णा गावकर |
02nd December 2022, 08:41 Hrs
नाट्य ' तारा ' पार्सेकर

त्यांचा जन्म १० मे १९६९ या दिवशी पेडणे तालुक्यातील वारखंड या गावात झाला. त्यांचे वडील एक अवलिया नाटककार होते त्याच बरोबर संपूर्ण कुटुंबही कुठल्या ना कुठल्यातऱ्हेने नाट्य क्षेत्रात रुजू असल्याकारणाने त्यांना लहानपणापासूनच अभिनयाचे धडे मिळाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्याच मूळ गावातील सरकारी प्राथमिक विद्यालयात झाले. त्यानंतर आपल्या बहिणीला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून त्यांचे मोठे भाऊ आपल्याबरोबर त्यांना मुंबईला घेऊन गेले आणि तिथे नेऊन त्यांनी ताराची चांगल्या इंग्रजी शाळेत भरती केली. पण लहानपणापासूनच निळ्याभोर आकाशाखाली बागडणारी तारा तिला काही ती मुंबईची जादू नगरी पसंत आली नाही. तिने आपल्या वडिलासमान भावाकडे हट्ट करून गावाकडची वाट धरली. त्यानंतर त्यांनी माध्यमिक शिक्षण श्री भगवती हायस्कूल पेडणे येथे तर बारावी पर्यंतचे शिक्षण सरकारी उच्च माध्यमिक विद्यालय पेडणे येथे पूर्ण केले. 

त्यांच्या नाट्य क्षेत्रातील वाटचालीबद्दल विचारले तर त्या आवर्जून सांगतात,  इयत्ता सातवीत शिकत होत्या तेव्हा त्यांनी आयुष्यातील पहिलं नाटक (पंढरपूर) केलं, ज्यात त्यांनी माधवी नामक लहान मुलीची भूमिका सादर केली होती. भूमिका छोटी असली तरी या भूमिकेने त्यांना रंगभूमीवर चढण्याचं धाडस दिलं. त्यानंतर नाट्य सृष्टीतील सुप्रसिध्द दिग्दर्शक आदरणीय श्रीयुत वसंत जोसलकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी वारखंड गावात 'रायगडाला जेव्हा जाग येते ' या नाटकातील सोयराबाईची भूमिका साकारली. 

माणूस जेव्हा स्वतः आणि समाजाने आखलेल्या चौकटीतून बाहेर पडतो तेव्हाच मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता आणि इच्छाशक्ती प्रबळ होते. 'रायगडाला जेव्हा जाग येते' नाटकात उत्तमरित्या भूमिका निभावल्यानंतर तिच्यात अभिनयाप्रति असलेली ओढ तिच्या कुटुंबीयांच्या लक्षात आली आणि तिचे भाऊ श्री प्रदीप परब जे स्वतः एक उत्तम दिग्दर्शक आणि नाट्य कलाकार आहेत त्यांनी पुढाकार घेऊन त्यांना थिएटर आर्ट या विषयात कला अकादमी येथे डिप्लोमा पूर्ण करण्याचा सल्ला दिला. तारानेही त्यांचा सल्ला

स्वीकारत गोवा राज्याचं कलेचं माहेर घर म्हणून नावाजलेल्या कला अकादमीत आपला अभ्यासक्रम पूर्ण केला. शिक्षण पूर्ण झाल्यावर दोन वर्षे प्रतीक्षा करून अखेर त्यांना थिएटर आर्ट शिक्षिका म्हणून तात्पुरत्या स्वरूपात रुजू करण्यात आलं. आणि अशाप्रकारे त्यांची नाळ शिक्षणक्षेत्राशी जोडली गेली. 

नाट्य सृष्टी अनुभवत असता त्यांची ओळख गोमंतकातील उमदा दिग्दर्शक आणि नाट्य कलाकार श्री. ज्ञानेश्र्वर पार्सेकर यांच्याशी झाली. दोघेही एकाच मार्गी लीन असल्या कारणाने मने जुळायला वेळ लागला नाही आणि १७ एप्रिल २००२ साली त्यांचे लग्न होऊन त्या कुमारी तारा राजाराम परब पासून सौभाग्यवती ईशा ज्ञानेश्र्वर पार्सेकर झाल्या. ज्या पात्रांबरोबर त्या रंगभूमीवर नाटक करत होत्या आज तीच पात्रे खऱ्याखुऱ्या रूपात त्यांच्या समोर येऊन ठेपली पण सर्वांबरोबर मिळून मिसळून राहणे हे त्यांच्या स्वभावात असल्याकारणाने त्यांना नव्या वास्तूत स्वत:ला सामावून घ्यायला जड झाले नाही. 

श्री. ज्ञानेश्वर पार्सेकर हे सदोदित त्यांच्या नाटकात नवीन चेहऱ्यांना संधी देण्यास तत्पर असतात ही बाब ताराला चांगल्यारित्या ठाऊक होती. याच कारणी इतर स्त्री कलाकारांप्रमाणे त्यांना लग्नानंतर त्यांनी लहानपणापासून ते आतापर्यंत उभ्या केलेल्या नाट्य जगाचे काय? लग्नानंतरही त्यांना या क्षेत्रात कार्यरत राहता येईल का? हा प्रश्न त्यांच्या मनात कधीही आला नाही. किंबहुना लग्न झाल्यानंतर त्यांना अभिनयाबरोबरच नाट्य दिग्दर्शनाची ही संधी मिळाली. त्याचबरोबर त्यांना गोवा राज्याच्या कला आणि संस्कृती मंडळाअंतर्गत बारा वर्षांच्या तपश्चर्येनंतर थिएटर आर्ट शिक्षिका म्हणून स्थायिक करून घेण्यात आले.

त्यांनी आत्तापर्यंत अनेक नाटके रंगभूमीवर सादर केलीत आणि प्रत्येक वेळी रसिकांनी त्यांना भरभरून दाद दिली.  त्यांनी सादर केलेल्या भल्या मोठ्या नाटकांच्या यादीतून काही निवडायची झालीच तर 'मी माझ्या मुलांचा' या नाटकाचे त्यांनी वीसहून जास्त प्रयोग करून त्यांच्याच माहेर गावी ज्या जागी त्यांनी त्यांच्या नाट्य अभिनयाची सुरुवात केली होती त्याच भूमीवर या नाटकाचे दिग्दर्शन करण्याची सोनेरी संधी मिळाली. तसेच 'पाणगो इलो रे बा इलो ' या मालवणी नाटकाचे त्यांनी अनेक प्रयोग केलेत, 'दुरितांचे तिमिर जावो' , 'रायगड ' तसेच 'कौंतेय' नाटकात त्यांनी कर्णाची आई, कुंतीची भूमिका अप्रतिमरित्या साकारली होती. पौराणिक नाटक पाहायला गेले तर संत तुकाराम या नाटकासाठी त्यांना रसिक श्रोत्यांनी भरभरून प्रेम दिलं. त्याचबरोबर शेरास सव्वाशेर, मदरहुड, रंगाचा झाला बेरंग अशा प्रकारच्या अनेक टेली फिल्म्समध्ये पण त्यांनी चोख अभिनय केलेला आहे.

त्या सध्या पेडणे तालुक्यात थिएटर आर्ट टीचर म्हणून कार्यरत असून त्या आपल्या परिने लहान मुलांना कलाक्षेत्रात पारंगत करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याचबरोबर सदोदित ढाल बनून पाठीशी उभे असणाऱ्या त्यांच्या नवऱ्यामुळे त्या अजूनही नाट्यसंपदा आणि त्यांची अभिनय कुशलता जपून आहेत. त्याचबरोबर या लेखाद्वारे त्या कला आणि लोक संस्कृती जपणाऱ्या असंख्य महिला वर्गाला नमन करून त्यांचे हार्दिक अभिनंदन करू  इच्छितात.