तडजोड

बाकी काहीही असो पण आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेऊन मिळणारा प्रत्येक क्षण आनंदात घालविण्याची तिची धडपड मला खूप काही सांगून, शिकवून गेली.

Story: ललित । शुभदा मराठे |
02nd December 2022, 08:40 pm
तडजोड

दुपारची साडेअकरा बाराची गृहिणीची स्वयंपाक पाणी करण्याची वेळ. मी नेमकी याचवेळी तिच्याकडे गेले, मुद्दामहून नाही पण गेले खरी. ती विळीवर बटाटे चिरीत होती, तेही डाव्या हाताने. पाहून मला भीतीच वाटली. उजव्या हाताला कोपऱात व मनगटात सूज आली होती, बोटे सुजली होती. हात खूप दुखत असावा तिचा. हलवता तर येतच नव्हता. अशा वेळी कोणीतरी मदतीला असणे आवश्यक होते. पण कशाचे काय! काका बाहेर पोथी वाचत बसले होते आणि स्वयंपाक घरात ही विळीवर डाव्या हाताने बटाटे चिरीत होती.

वय वर्षे चौऱ्याहत्तर, पण तरीही सडसडीत, हसतमुख. आम्हाला पाहताच बसा म्हणाली, पाणी घ्या म्हणाली. मला काहीच सुचत नव्हते. डाव्या हाताने तिला बटाटे चिरताना पाहून मन कळवळले. कशी चिरत असेल? मदतीला कोणीच कसे नाही आले? मी मनात कारणे शोधू लागले तिची मुलगा मुलगी परदेशी असतील का किंवा लांबच्या शहरात बदली झाली असेल का? किंवा दोघेही कामानिमित्त दिवसभर बाहेर असतील का? की जवळ असूनही मदत करण्याची इच्छा नसेल? एकदा असाही विचार मनात आला की हिलाच ते आवडत नसावे. इतकी वर्ष स्वतः स्वतःचे करून आलेली ती आत्ता तरी कशाला मदत घेऊ? करेन मी जमेल तसे असे वाटले असेल का तिला? पण  तिचा स्वभाव मुळात तसा  नाहीच. मला काही केल्या उत्तर सापडेना. मनातला गोंधळ वाढतच गेला. याच्यापुढे मी विचार नाही करू शकले.

पण तिच्या जिद्दीचे मला खूप कौतुक वाटले. या वयात ज्या हाताचा आपण अशा कामासाठी उपयोग करतच नाही, त्या हाताने सगळी कामे करण्याची सवय त्या हाताला लावून घेणे वाटते तेवढे सोपे नाही. पण ते तिने केले आणि कोणतेही रडगाणे न गाता. चेहरा आनंदी हसत ठेवण्याचा तिचा निष्फळ प्रयत्न माझ्या नजरेतून सुटला नाही. इतके असूनही तिने कोणाच बद्दल तक्रारीचा सूर काढला नाही. उलट सगळ्यांचीच ती सारवा सारव करत होती आतून तिला किती वेदना होत होत्या हेही मला जाणवत होते. तिच्या हातचे मायेने वाढलेले चमचमीत मिठ्ठास अन्न जेवलेली मी. पण हेही ती दोघेही गोड मानून जेवत होती. नसलेल्या सुखाचा आभास आणत होती त्याचे नवल आणि आदरही वाटला.

एकदा घरी मी सहज म्हणाले होते, ज्यांची मुले श्रीमंत आहेत ज्यांच्याकडे आई-बाबांचा सांभाळ करण्याइतका पैसा आहे, अशा वृद्धांना सरकारी योजनेचा लाभ का बरे मिळवून दिला जातो. याचे उत्तर आज मला सापडले आणि त्याची सत्यताही पटली.

"ज्या दिवशी आपण स्वतः कमवत नाही त्या दिवशी मुलगा सुद्धा आपला नसतो." हे त्या काकांचे बोल आज खरे वाटले. अर्थात यात चुकीचा कोणताही भाग नसतो. तर समस्या असतात. तडजोड होत नाही, वेळ नाही किंवा अन्य कारणे जास्तच असतात कधी ती खरी असतात तर कधी पळवाट म्हणून तयार केलेली असतात इतके मात्र खरे.

"मी चिरते बटाटे" असे म्हणताच" नको झाले चिरून. एवढे पुरे. "असे म्हणत ओट्याचा आधार घेऊन ती हळूहळू उठली. मी मात्र भयभीत. उठताना तोल जाऊन विळीवर पडली बिडली तर… पुढचा विचारच नकोसा वाटला. डाव्या हाताने गॅसची शेगडी पेटवून तिने चहाला पाणी ठेवले. माझ्याच्याने बघवेना. मी पुढे होऊन चहा केला, सगळ्यांना दिला. तिच्याशी बोलता बोलता भाजी फोडणीला टाकायला घेतली. फोडणीचा डबा काढला. त्यात फक्त मोहऱ्या होत्या. हळद हिंग नव्हता. तिच्या लक्षात आले असावे. मोहऱ्याच टाक ती म्हणाली. तशीच फोडणी आमटीलाही केली. आमटीत घालायला चिंच गूळही आणलेला नव्हता.

जेवण करता करता आम्ही बोलत होतो. पण मनातली चलबिचल काही थांबेना. एकदा मनाला समजावले, होते असे काही वेळा, पण एखादा पदार्थ, सगळेच नाही. या वस्तू विकत आणण्याची परिस्थिती नाही असेही नव्हते. मुलाने आणून दिल्या नसतील का? किंवा त्याला वेळ मिळाला नसेलही कदाचित नंतर आणून देईल. आणखी कुणाकडून तरी आणून घेतल्या नसतील का? "आत्ता भाजी आणायला बाजारात जात नसशीलच  ना." मी. "नाही गं. उजवा हात दुखतो ना, त्यामुळे रस्त्याने चालत जायला भीती वाटते. वाटेत पडले बिडले तर".

स्वतः आणू शकत नाही म्हणून सामानाचा तुटवडा असेल का? किंवा कुणाला आणायला सांगतच नसेल का? का सांगूनही कोणी आणून दिले नसेल? अशा अनेक विचारांचे भुंगे डोक्यात भणभणू लागले. एकदम मला आठवले, अरे! ही ऑनलाइन मागवू शकेल की! पण नंतर लक्षात आले, तिला किंवा काकांना फक्त मोबाईलचे इनकमिंग आउटगोइंग एवढेच जुजबी ज्ञान आहे त्यामुळे ती ऑनलाईनही काही मागवू शकत नाही. एकंदर परिस्थितीचा अंदाज घेतल्यावर असे वाटले की वृद्धांनाही नवीन टेक्नॉलॉजीचे ज्ञान देणे किती मोलाचे आहे. त्यादिवशी हे मला पटले आणि मीही सतर्क झाले.

एकेकाळी तिचे घर 'गोकुळ' होते. पाहुण्यारावळ्यांचा राबता होता. येणाऱ्या जाणाऱ्याला कधी विन्मुक्त पाठवले जात नसे. परगावहून आलेल्यांची, नोकरीसाठी आलेल्यांची अभ्यागतांची अशी सर्वांची दुपारच्या वेळी जेवणाची तिथे व्यवस्था होई तिही हसतमुखाने. आज त्याच माऊलीला साधे बटाटे चिरून द्यायलाही तिच्याकडे कोणी फिरकले नव्हते याचे दुःख होते.

आपण म्हणतो दुसऱ्यांना आपण जितके चांगले वागवू, दुसऱ्यांसाठी कष्ट करू, ते प्रसंगी आपल्याला मदतीच्या रूपाने मिळतात. पण हमखास मिळतातच असे नाही हे आज तिला पाहून मला वाटले. मनापासून दिलेल्याचा योग्य वेळेस परतावा मिळतो याला कुठेतरी माझ्या मनामध्ये छेद गेला. मनातली चलबिचलता  वाढली.

आम्ही थोडा वेळ तिथे थांबलो. तासा दीड तासाने तिथून बाहेर पडले. मनात आले पूर्वीसारखी बरी असती तर यावेळी तिने आम्हाला जेवल्याशिवाय बाहेर पडूच दिले नसते. प्रत्येकाच्या जीवनात बालपण, तरुणपण, वृद्धत्व हे येणारच. लहान मुलाप्रमाणे वृद्धांचीही काळजी घ्यावी लागते. पण आताच्या धकाधकीच्या जीवनात आईबाप मुलालाच आया नावाच्या पगारू बाईकडे ठेवून जातात, तिथे वृद्धांना कोण सांभाळणार?

वृद्धांनीही काही बाबतीत तडजोड करावी. वृद्धाश्रम ही परिस्थितीजन्य व्यवस्था आहे ती बुद्धीला कदाचित पटेल पण मनाला नाही म्हणूनच हा शेवटचा पर्याय आहे. तिथे वृद्धांची काळजी घेतली जाते. औषधोपचार, पचेल असा आहार, वाचन, थोडे अध्यात्म जमेल तसे फिरणे या सगळ्यांची तिथे सोय असते. शिवाय मनाला आनंद देणारे नसले तरी समदु:खी असतात. पण वृद्धाश्रम हा सगळ्यात शेवटचा पर्याय असेल. आपल्या वृद्धत्वाच्या काळातील या पर्यायासाठी आर्थिक तरतूद मात्र करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. बिन पैशाने कोणतेही काम होत नाही. बाकी काहीही असो पण आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेऊन मिळणारा प्रत्येक क्षण आनंदात घालविण्याची तिची धडपड मला खूप काही सांगून शिकवून गेली.