अमेरिका आठ वर्षांनंतर बाद फेरीत

|
30th November 2022, 11:08 Hrs

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
अल थुमामा :
अमेरिकेने अल थुमामा स्टेडियमवर ब गटातील त्यांच्या शेवटच्या सामन्यात बुधवारी इराणचा १-० असा पराभव करून बाद फेरीत प्रवेश केला. अमेरिकेच्या संघाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आपला खेळ वेगवान करण्याचा प्रयत्न केला, कारण त्यांना विश्वचषकाच्या बाद फेरीत जाण्यासाठी विजयाची गरज होती. या विजयासह अमेरिकेने फिफा विश्वचषकाच्या अंतिम-१६ मध्ये प्रवेश केला आहे. अमेरिकन संघाने आठ वर्षांनंतर बाद फेरीत प्रवेश केला आहे. यापूर्वी, संघाने २०१४ मध्ये बाद फेरी गाठली होती जिथे त्यांचा प्रवास अंतिम-१६ पर्यंत टिकला होता.
अमेरिकेच्या स्टार मिडफिल्डर क्रिस्टियन पुलिसिकने ३८व्या मिनिटाला गोल करून संघाला इराणविरुद्ध १-० अशी महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली.
पहिल्या हाफच्या शेवटच्या मिनिटाला, अमेरिकेला गोल करण्याची आणखी एक संधी होती. परंतु, रेफरीने अमेरिकन स्ट्रायकर टिमोथी वेह ऑफसाईड ठरवले आणि इराणवर दोन गोलांची आघाडी नाकारली. दोन्ही संघांमधला हा पहिला हा थरारक होता कारण दोघांसाठी बरेच काही पणाला लागले होते. मात्र, अमेरिकेने पूर्वार्धात पूर्णपणे वर्चस्व राखले आणि पहिल्या हाफच्या अखेरपर्यंत संघाने १-० अशी आघाडी घेतली.
दरम्यान, उत्तरार्धात दोन्ही संघांना गोल करता आला नाही, अमेरिकेने इराणला सामन्यात एकही संधी दिली नाही. संपूर्ण सामन्यात इराणने लक्ष्यावर फक्त एक शॉट लावला, पण तोही अमेरिकेच्या गोलरक्षकाने नाकारला आणि अमेरिकेने सामन्याच्या अंतिम शिट्टीने सामना १-० असा जिंकला.

या सामन्यातील विजयासह अमेरिका ५ गुणांसह ब गटातून पात्र ठरणारा दुसरा संघ ठरला आहे. बुधवारी खेळल्या गेलेल्या ‘ब’ गटातील अखेरच्या सामन्यात इंग्लंडने इंग्लंडचा ३-० असा पराभव केला. इंग्लंड ७ गुणांसह ब गटातील अव्वल क्रमांकाचा संघ ठरला आहे.