ना खाऊंगा, ना खाने दुंगा : मुख्यमंत्री डॉ. सावंत

सरकारी नोकरीसाठी पैसे घेणारे यापुढे थेट तुरुंगात पाठवण्याचा इशारा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th November 2022, 11:51 Hrs
ना खाऊंगा, ना खाने दुंगा : मुख्यमंत्री डॉ. सावंत

पणजी : ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ या तत्त्वानुसार राज्यात आपण पारदर्शक आणि लोकाभिमुख सरकार चालवत आहोत. त्यामुळे यापुढे सरकारी नोकरीचे आमिष दाखवून नागरिकांकडून पैसे उकळणाऱ्यांना थेट तुरुंगात टाकले जाईल, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी आयोजित रोजगार मेळ्यात बोलताना दिला.
सरकारी नोकरीसाठी राज्यातील युवक-युवतींना वारंवार अर्ज करावे लागत होते. मंत्री, आमदारांच्या घरी जावे लागत होते. परंतु, येत्या जानेवारीपासून सरकारी नोकऱ्या देण्याची प्रक्रिया कर्मचारी भरती आयोगामार्फत होईल. त्यासाठी वर्षातून एकदाच परीक्षा घेतल्या जातील. या प्रक्रियेतून सरकारी नोकर भरतीत अधिक पारदर्शकता येऊन पात्र असलेल्यांनाच सरकारी नोकऱ्या मिळतील. त्यामुळे यापुढे सरकारी नोकऱ्यांची आमिषे दाखवून लोकांची फसवणूक करणाऱ्यांना अजिबात दयामाया दाखवली जाणार नाही. अशाप्रकारे कोणी पैसे मागितल्यास नागरिकांनी त्याची थेट तक्रार जवळच्या पोलीस स्थानकात करावी. त्यांना लुटणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून तुरुंगात टाकले जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.
गोव्याच्या इतिहासात प्रथमच राज्य सरकारने रोजगार मेळा आयोजित करून १,२५० जणांना विविध सरकारी खात्यांत नोकऱ्या दिलेल्या आहेत. स्थानिकांना अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार गंभीर आहे. मोपा विमानतळ प्रकल्पात आतापर्यंत स्थानिकांना हजारांवर नोकऱ्या दिलेल्या आहेत. नुकत्याच झालेल्या रोजगार मेळ्यातून एक हजार जणांना नियुक्तीपत्रे दिली असून, उर्वरित तीन ते साडेतीन हजार जणांनाही खासगी क्षेत्रात नोकऱ्या देण्याची प्रक्रिया सुरू आहेत. खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी सरकार विविध कंपन्यांशी करार करीत आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

कौशल्यपूर्ण बना; अन्यथा नोकऱ्या गमवाल!

हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातच पुढील पाच वर्षांत सुमारे दोन लाख नोकऱ्या तयार होणार आहेत. त्यामुळे स्थानिकांनी त्यासाठी लागणारी कौशल्ये आतापासूनच आत्मसात करावी. त्याचे प्रशिक्षण घेऊन तयार व्हावे. अन्यथा केवळ कौशल्याच्या अभावामुळे त्यांच्या नोकऱ्या परराज्यांतील युवक बळकावतील, असेही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नमूद केले.