रोहित कदम नवे क्रीडा संचालक

संध्या कामत समाजकल्याण संचालकपदी

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
24th November 2022, 11:42 Hrs
रोहित कदम नवे क्रीडा संचालक

पणजी : काहीच दिवसांपूर्वी क्रीडा प्राधिकरणाच्या (साग) कार्यकारी संचालकपदाच्या अतिरिक्त जबाबदारीतून मुक्त करण्यात आलेल्या अजय गावडे यांना क्रीडा संचालकपदावरूनही बदली​ करून त्यांच्याजागी रोहित कदम यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर, अजय गावडेंची उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) झाली आहे.
सरकारने गुरुवारी यासंदर्भातील आदेश जारी केला. आदेशानुसार, उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी असलेल्या रोहित कदम यांची क्रीडा व युवा व्यवहार खात्याच्या संचालकपदी बदली झाली आहे. गृहनिर्माणच्या अतिरिक्त सचिव आणि समाजकल्याण खात्याच्या संचालकपदाचा अतिरिक्त ताबा असलेल्या संध्या कामत यांची समाजकल्याण खात्याच्या संचालकपदी वर्णी लावण्यात आलेली आहे.
मेघना शेटगावकर यांची महिला आणि बाल कल्याण खात्याअंतर्गत येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवेच्या (आयसीडीएस) संयुक्त सचिवपदी नेमणूक करण्यात आली असून, या पदावर असलेल्या संगीता राऊळ परब यांची कोकणी अकादमीच्या सचिवपदी बदली करण्यात आलेली आहे.
याशिवाय मनुष्यबळ विकास महामंडळाचे (जीएचआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अरविंद बुगडे यांच्याकडे हस्तकला खात्याच्या संचालकपदाची, तर संजय स्कूलच्या सदस्य सचिव नीतल आमोणकर यांच्याकडे गृहनिर्माणच्या संयुक्त सचिवपदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली आहे.