मायेचं ऋण

शाळेजवळ जाऊन उभी राहिली तर वॉचमन हाकलवे पण आता कैवल्यच्या धर्माने तिला उजळ माथ्यानं शाळेत जाता यायचं. बाकीच्या आयांसोबत आपल्या मुलासंबंधी बोलता यायचं.

Story: गजाल | गीता गरुड |
19th November 2022, 10:30 pm
मायेचं ऋण

अगला स्टेशन विठ्ठ्लवाडी…पुढील स्थानक विठ्ठलवाडी अशी डब्यात सूचना ऐकू आली नि कैवल्यने जीजीला उतरायचंय म्हंटलं. जीजीने काळ्यापांढऱ्या केसांवरनं रीतसर हात फिरवला. डोकीवरचा पदर उगीचच अधिकच आवरूनसावरून घेतला. तिची उभ्या सळ्यांवाली प्लास्टिकची पिशवी कैवल्यने आपल्या हातीत घेतली व उतरताना तिला अगदी आपल्या पुढे घेतलं. 

हिरव्याकंच काकणांनी भरलेले गोंदीव हात, कपाळाला ठसठशीत लाल चिरी, नाकात मोत्याची नथ, डोळ्यांवर चष्मा असुनही जीजीच्या डोळ्यांतील भांबावलेले, निस्पृह; निरागस भाव सहजच कळत होते. कैवल्यने तिचा हात घट्ट धरला. रेल्वेस्टेशनचा जीना उतरून रस्ता क्रॉस करून बाजारात आल्यावर तिला साडीच्या दुकानात घेऊन गेला.

"हयसर कित्याक रे?

"तुझ्यासाठी लुगडी घेवया दोन."

"खेका व्हयी! हत ती बस झाली."

"जीजी, मिया म्हनतय म्हनान घी."

दुकानात गाद्यांवर पांढऱ्या बेडशीट अंथरल्या होत्या. त्यांवर कैवल्यने जीजीला बसवलं. दुकानदाराने बारीक नक्षीची सुती लुगडी आणून तिच्यासमोर ठेवली. हिरवा, लाल, पिवळा, जांभळा, मोरपंखी..नानाविध रंगांतली लुगडी पाहून जीजी सुखावली. नवरा अचानक गायब झाल्यापासनं तिने रंगीत लुगडी नेसली की बाया तिच्याकडे वेगळ्याच नजरेने पहायच्या. जीजीला फार वाईट वाटायचं. आता मात्र तिने जांभळ्या रंगावर पिवळी खडी असलेलं व डाळिंबी रंगावर पांढरे ठिपके असलेलं अशी दोन लुगडी घेतली. कैवल्यने पैसे दिले नि रीक्षा करून तिला घरी आणलं. दोनच खोल्यांचं घर पण कसं प्रत्येक वस्तू जिथल्या तिथे ठेवली होती. 

कैवल्यने स्टोव्हवर पाणी गरम केलं व जीजीला आंघोळीसाठी ओतून दिलं. त्याने तोवर चहाला आधण ठेवलं.

तो भूतकाळात रमला. नजरेसमोर पूर्वीचे दिवस आले. आईबापाविना तो मामाकडे वैभववाडीत रहायचा खरा पण मामाच्या चार पोरांत अडचणच ठरला होता. जीजीचे यजमान तात्या, कैवल्यच्या मामाकडे काही कामाकरता गेले असता त्यांना कैवल्य भांडी घासताना दिसला. त्यांना दया आली त्याची नि मामांना विचारून करीरोडच्या आपल्या खोलीवर घेऊन आले. अरूंदशी खोली, वरती माळा, बाहेर सारवलेला ओटा त्यापुढे अरूंद बोळ, त्या बोळातून सतत लोकांचा राबता. मामाच्या ऐसपेस घरापेक्षा जीजी नि तात्यांच हे इवलसं घरकुल त्या बालजीवाला आवडलं. आईच्या मायेला पारख्या झालेल्या त्या निष्पाप जीवाला जीजीने आपल्या पदराखाली घेतलं. त्याला शाळेत घातलं.

तात्या मिलमध्ये कामाला होते. तुटपुंज्या कमाईत जीजी संसार चालवीत होती. ध्यानीमनी नसताना, कोरड्या कुशीच्या जीजीला कैवल्यच्या निमित्ताने मातृसुख उपभोगता येऊ लागलं. कैवल्यसोबत पालकसभेला जाताना जीजीला कोण आनंद होई. कधी शाळेची पायरीही न चढलेल्या तिला शाळेचं कोण अप्रुप! कैवल्य येण्याआधी कुणा शाळकरी मुलाकडे ती बघत राहिली की त्याची आई संशयाने तिच्याकडे पाही. शाळेजवळ जाऊन उभी राहिली तर वॉचमन हाकलवे पण आता कैवल्यच्या धर्माने तिला उजळ माथ्यानं शाळेत जाता यायचं. बाकीच्या आयांसोबत आपल्या मुलासंबंधी  बोलता यायचं.

कैवल्य एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत जात होता. सर सर उंच होत होता. वयाच्या मानाने मोठाच दिसायचा. समजही लवकर आली होती त्याला. जीजीला वाणसामान आणून देणं, हिरवा मसाला आणून देणं, घरात केर काढणं, कपबश्या विसळणं अशी कामं न सांगता करायचा. सगळं आलबेल चाललं होतं पण कैवल्य दहावी झाला नि तात्यांचे पुतणे खोलीवर येऊ लागले. येताना तात्यांसाठी फळं, कपडे घेऊन यायचे. "हयसर काय ठेवलाहा तात्यांनू. गावाक चला. आमचो बापूस गेलो. आता तुमीच आमका तेंचे जागी. आमच्या पाठीशी उभे रव्हा." पुतण्यांनी तात्यांवर मायेचं जाळं फेकलं नि तात्या त्यात पुरते अडकले. जीजीने लाख समजावूनही ऐकेनात. पुतण्यांच्या नादाला लागून मिलमधली नोकरी सोडली. जीजीला येणाऱ्या संकटाची चाहूल लागली होती पण त्याहूनही जास्त काळजी तिला कैवल्यची वाटत होती. तात्या खोली विकून जीजीला घेऊन गावी निघून गेले. वडिलोपार्जित घराची डागडुजी केली व सख्ख्या पुतण्यांसोबत राहू लागले, शेती करू लागले.

कैवल्यला सोडून येताना जीजी जणू आपलं काळीजच सोडून आली होती. कैवल्य पुढे छोटी मोठी कामं करत शिकला. चाळीत कुणाच्याही ओट्यावर पथारी पसरून झोपे. कॉलेज नि उरलेल्या वेळात एका वकीलाकडे मदतनीस म्हणून जात असे. त्याच्याच मार्गदर्शनाखाली त्याने वकीलीची परीक्षा दिली नि काही वर्ष त्यांच्या हाताखाली काम करून आता स्वतंत्र प्रेक्टीस करत होता.

तात्यांकडे पैसे असेपर्यंत पुतण्यांनी त्यांना जेऊखाऊ घातलं. बैलजोडी घ्यायची झाली... तात्यांनू पैसे व्हये, मुलांचा जन्मदिवस साजरा करायचा झाला... तात्यांनू पैसे व्हये. तात्याही सढळ हस्ते हाती असलेली पुंजी खर्च करत होते. "म्हातारपणात पुतणेच बघतले. तेंका खूष ठेवूक व्हया," तात्या म्हणायचे. पण हळूहळू तात्यांकडची गंगाजळी लयास जाऊ लागली आणि तात्यांना पुतण्यांचं खरं रुप दिसू लागलं.

पुतण्यांनी सुकलेल्या जखमेवरची खपली ओढून काढावी तसं कधीचं जुनं भांडण उकरून काढलं. तात्यांना पडवीत जाऊन रहा म्हणून सांगितलं. तात्यांना अरेला कारे करता येत नव्हतं. आपणच डागडुजी केलेल्या घराच्या पडवीत त्यांना संसार थाटावा लागला. पुतणे ते पुतणे, त्यांची आईही तात्या नि जीजीला नजरेने बघिनासी झाली. पुतण्यांच्या बायका जीजीला दोन दुडी पाणी आणून देईनात झाल्या. 

ज्या पुतण्यांसाठी ते घरदार विकून गावी आले होते त्यांनी असा दगा दिल्याने तात्या पुरते ढासळले. ते स्वत:शीच बोलत बसत. जीजी त्यांना समजवे, "आपुन दोघा आसव एकामेकाक. आपलो कैवल्य असा. तेका पत्र धाडा. त्यो येऊन घेऊन जाईत आपनाक." पण तात्या एक नाही की दोन नाही.(क्रमश:)