भाषण कौशल्याच्या प्रगतीपथावर

मागील लेखात आपण श्रवण कौशल्याच्या विकासावर ध्यान केंद्रित केले होते. आजच्या लेखात आपण व्दितीय कौशल्य पाहूया आणि ते म्हणजे भाषण कौशल्य होय. भाषण म्हणजेच बोलणे, शब्दांचे उच्चारण होणे. सतत बंदिस्त असलेल्या विचारांना मुक्त विहार करण्यास खुले मैदान भाषणाव्दारेच प्राप्त होते. भाषेच्या बाबतील भाषण हा मह्त्त्वाचा मुद्दा हाताळताना आज आपण त्यातीलच काही महत्त्वाचे संदर्भ पहाणार आहोत.

Story: पालकत्व । पूजा भांडारे कामत- सातोस्कर |
18th November 2022, 11:16 pm
भाषण कौशल्याच्या प्रगतीपथावर

श्रवणाच्या विकासाने भाषण कार्यान्वित होणे जसे की आपण जाणतो, जर योग्य पध्दतीने श्रवण झाले, तरच भाषणही योग्य पध्दतीने होते. त्यामुळे सर्वात प्रथम आपण श्रवणाचा विकास केला पाहिजे, कारण श्रवणाचा विकासच भाषणाचा विकास सुनिश्चित करतो.

अक्षर ओळख

भाषणाकरीता नीट अक्षर ओळख असणे गरजेचे आहे. कारण जर अक्षर ओळख नीट असेल, तरच भाषण नीट होईल. जेव्हा मुले अक्षरे ओळखतील, तेव्हाच ती गतीने वाचू शकतील.

भाषणात येणाऱ्या बाधा

वयाप्रमाणे काही मुलांमध्ये शारीरिकरीत्या भाषणाबाबतीत बाधा आढळू शकतात. जसे की जीभ जाड असणे, जीभेला घाव असणे, पोटजीभ नसणे ह्यामुळे बोलण्यास अडथळा निर्माण होतो. अशा विकारांवर शक्य असल्यास योग्य वेळेवर औषधोपचार होणे अपेक्षित आहे, जेणेकरुन मुले लवकरात लवकर बोलण्यास प्रारंभ करतील. मानसिकदृष्ट्या आढावा घेतल्यास असे आढळून येते, की जर बालवयात मुलांनी कुठला धक्कादायक प्रसंग बघितला, तर त्याचा परिणाम मनावर झाल्यामुळे मूल बोलणेच बंद करते, वा त्याच्या मनातील भीती त्याच्यावर हावी झाल्यामुळे एक अक्षरही बोलण्यास तो असमर्थ ठरतो. अशा समस्यांचे वेळेत निवारण होणे गरजेचे असते.

सरावाचा अभाव

लहान वयापासूनच माता पिता आपल्या मुलांशी संवाद साधतात तसेच त्यांना बोलण्यास प्रवृत्त करतात, आई वा बाबा ह्या प्रथम शब्दापासून भाषणाचा प्रवास व विकास सुरु होतो. त्यामुळे भाषणाचा सराव करण्याकरीता मुलांना शक्य तितके बोलके करावे. घरात तसेच वर्गात आई बाबा, कुटुंबीयांच्या संगतीत, तसेच शाळेत मित्रमैत्रिणींसोबत, गुरु सोबत मूल संवाद साधत आहे की नाही ह्यावर लक्ष केंद्रित करावे, शक्य तितके मुलांना बोलके करावे.

मोबाईलपासून शक्यतो दूर 

मोबाईलच्या विश्वात मुले इतकी गुंतलेली आहेत, ज्यामुळे तासनतास त्यांना मोबाईलवर गेम खेळताना एकाकी बसण्याची सवय झाली आहे. अशा परिस्थितीत, भाषणाचा सराव होणे शक्य नाही. त्यामुळे आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढून माता पित्याने मुलांशी बोलले पाहिजे, त्यांच्या भावनांना नजरअंदाज न करता, त्यांचे बोलणे ऐकले पाहिजे, त्यावर मुलांच्या आकलनशक्तीनुसार आपली मते व्यक्त केली पाहिजेत. त्यांच्या गाठीस असलेल्या अनुभवांच्या खजिन्याचा आस्वाद घेतला पाहिजे, व मोबाईलपासून शक्य तितके त्यांना दूर ठेवायला पाहिजे.

व्यासपीठाची भीती- एक फोबीया

फोबीया म्हणजेच भीती, जी कुठल्याही व्यक्ती व वस्तूशी, घटनेशी संबंधित असते. जर मुलांना व्यासपीठाची भीती वाटत असेल तर प्रयत्त्न केल्याने हा फोबीया दूर होऊ शकतो. जे वर्गात आपल्या जागेवर राहून प्रभावीपणे बोलू शकतात, त्याच विद्यार्थ्यांच्या मुखातून, व्यासपीठावर गेल्यावर एक चकार शब्दही निघणार नाही. त्यांच्या मुखावर अस्वस्थता दाटेल, त्यांना चक्करसुध्दा येत आहे का असे वाटेल, क्षणभरात घामाघूम होऊन हात पाय थरथरू लागतील, अशी लक्षणे म्हणजेच व्यासपीठाची भीती होय. ही भीती जर मनात असेल तर ह्याचा सरळ परिणाम भाषणावर नक्कीच होणार, त्यामुळे आधी वर्गात सर्व मुलांच्या समोर धीटपणे उभे रहाण्याचा सराव करुन घेऊन, त्यांच्या भाषणाचा विकास सुनिश्चित करुन त्यानंतरच, मुलांना व्यासपीठाची कल्पना द्यावी.

प्रोत्साहन- एक मुख्य भूमिका

प्रत्येक क्षेत्रात, वयाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रोत्साहन मुख्य भूमिका निभावते. मुलांच्या वयावर ज्यावेळी त्यांचा विकास होत असतो, त्यानुसार त्यांना प्रोत्साहनाची गरज असते. व्यासपीठावर एकटाच उभा असलेला एक विद्यार्थी भाषणाच्या माध्यमातून वा इतर माध्यमातून आपली कला व्यक्त करतो. त्यामुळे प्रेक्षकांकडून असो वा माता पित्याकडून, कुटुंबीयांकडून, गुरुकडून प्रोत्साहन हे एका कलाकाराला मिळणे महत्त्वाचे आहे. त्याच्याकडून चुका जरी झाल्या तर गप्प पहावे, तो स्वत:स सुधारेल, पण ह्याउलट जर त्याची चेष्टा झाली तर त्याचा आत्मविश्वास खालावेल.

वाचन व गायन

घरात वा वर्गात, वाचनाशी संबंधित अनेक स्पर्धा माता पिता व गुरु घेऊ शकतात. घरात वेगवेगळ्या पुस्तकांचे मोठ्याने वाचन करणे, वर्तमानपत्र वाचणे, मासिके वाचणे, अशा अनेक स्पर्धा माता पिता प्रारंभ करु शकतात. उदा. कथाकथन स्पर्धा, कविता वाचन, सादरीकरण स्पर्धा, वत्कृत्त्व स्पर्धा, प्रश्नोत्तराची स्पर्धा, एकपात्री अभिनय स्पर्धा इ, जेणेकरुन मुलांच्या भाषण कौशल्यास चालना मिळेल.

असे काही मुद्दे आहेत, ज्यांच्या माध्यमातून भाषण कौशल्यांचा विकास होऊ शकतो.