जेटी धोरणावर सरकार ठाम

पर्यटनमंत्री रोहन खंवटे : सनबर्न महोत्सवही होणारच


27th October 2022, 11:50 pm
जेटी धोरणावर सरकार ठाम

प्रतिनिधी। गोवन वार्ता      

पणजी : जेटी धोरण नव्या जेटी उभारण्यासाठी नाही. जेटींचा पर्यटनासाठी वापर करण्याचा हेतू आहे. या धोरणाला ग्रामसभांतून विरोध होताना दिसत आहे. विरोध करणाऱ्यांनी सूचना व आक्षेप ३१ ऑक्टोबरपर्यंत सादर करावेत. जेटी धोरण हे खरे तर ‘जेटी पर्यटन धोरण’ आहे. जेटी धोरणाची कार्यवाही होणारच. सरकार यावर ठाम आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली.

पणजीतील दोना पावला जेटी डिसेंबरमध्ये सुरू होईल. दुरुस्ती आणि सौंदर्यीकरणासाठी ही जेटी बंद ठेवण्यात आली होती. ही जेटी सुरू करण्याबाबत पणजीचे आमदार तथा महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीत नूतनीकरण केलेल्या जेटीचे लोकार्पण डिसेंबरमध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला.             

शॅक्स शुल्काबाबत दोन दिवसांत निर्णय            

परवाना शुल्क कमी करण्याची शॅक्स मालकांची मागणी आहे. याबाबत आमदार वीरेश बोरकर यांनीही पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे. शॅक्सच्या वार्षिक तशेच परवाना शुल्काबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी आम्ही चर्चा केली आहे. शॅक बेडचे शुल्क कमी केले जाईल. याबाबत दोन दिवसांत अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असेही मंत्री खंवटे यांनी स्पष्ट केले.

‘सनबर्न’ २८ डिसेंबरपासून

दरवर्षीप्रमाणे यंदाही गोव्यात ‘सनबर्न महोत्सव’ होणार आहे. २८ ते ३० डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या महोत्सवात यंदा गोमंतकीय कलाकारांसाठी ‘गोवन व्हिलेज’ हे विशेष दालन असेल. या अटीवरच ‘सनबर्न’ला परवानगी दिली आहे, असेही पर्यटनमंत्र्यांनी सांगितले.

कोविड महामारीमुळे मागील दोन वर्षे सनबर्न महोत्सव झाला नव्हता. मागील वर्षी आयोजकांनी महोत्सवाची तयारी केली होती, तरीही अखेरच्या क्षणी महोत्सव रद्द करावा लागला. यंदा मात्र हा महोत्सव होणारच आहे. गोव्यातील खाद्यपदार्थ तसेच गोमंतकीय कलाकारांना या महोत्सवात संधी मिळेल. सनबर्न महोत्सवामुळे पर्यटकांची संख्या वाढते. स्थानिक व्यावसायिकांना चार पैसे मिळतात. या महोत्सवात अमलीपदार्थांचा वापर होण्याची शक्यता असते, वाहतूककोंडी होते. या कारणांमुळे पूर्वी या महोत्सवाला विरोध होत होता. आता मात्र तो मावळल्याचे दिसत आहे, असेही पर्यटनमंत्री राेहन खंवटे यावेळी म्हणाले.

यंदा ब्रिटनहून येणारे पर्यटक वाढण्याचा अंदाज

युके व्हिसाच्या प्रश्नामुळे चार्टर विमाने येण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. आता भारतीय वंशाची व्यक्ती ब्रिटनची पंतप्रधान झाली आहे. त्यामुळे युके व्हिसाच्या प्रश्नावर लवकर तोडगा निघण्याची शक्यता आहे. ब्रिटन व युकेहून गोव्यात मोठ्या संख्येने पर्यटक येतात. यंदा दरवर्षीपेक्षा अधिक ब्रिटनहून येणारे पर्यटक गोव्यात येतील, असा विश्वासही पर्यटनमंत्र्यांनी व्यक्त केला.

लमाण्यांवर कारवाईचे पोलिसांना अधिकार            

समुद्र किनाऱ्यांवर लमाणी लोकांचा वावर वाढला आहे. त्यांचा पर्यटकांना त्रास होतो. काही वेळा लमाण्यांमुळे चोरी होण्याची भीतीही असते. किनाऱ्यांवर होणारे गैरव्यवहार तसेच लमाण्यांवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना देण्यात आले आहेत, असेही पर्यटनमंत्री राेहन खंवटे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा
सर्व पहा