प्रतिनिधी। गोवन वार्ता
म्हापसा : कोलवाळ कारागृहातून २१ दिवसांच्या फर्लोवर गेलेला आरोपी जनक विशू कर्मा (रा. मूळ बेहरी-नेपाळ) याच्या विरोधात चार वर्षांनंतर कोलवाळ कारागृह अधीक्षक गौरेश कुट्टीकर यांनी साळगाव पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. त्याआधारे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. १८ मे २०१८ रोजी आरोपी कर्मा फर्लोवर गेला होता. त्यानंतर तो कारागृहात परतलेलाच नाही.
कारागृह प्रशासनाने जनक कर्मा याची मे २०१८ मध्ये २१ दिवसांच्या फर्लोवर सुटका केली होती. त्याला नेण्यासाठी साळगावमधील एका व्यक्तीने हमी दिली होती. मंजूर मुदतीनंतर कर्मा कारागृहात परतलेला नाही. कारागृह प्रशासनाने पोलिसांमार्फत त्याचा शोध घेतला. संबंधित हमीदाराचीही चौकशी केली. अखेर बुधवारी कारागृह अधीक्षकांनी पोलिसांत धाव घेतली. कर्माच्या विरोधात गुन्हा नोंद करून उपनिरीक्षक कृष्णा गावस पुढील तपास करत आहेत.
चिखली-वास्को येथील दोघा अल्पवयीनांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाखाली २ जुलै २०१५ रोजी वास्को पोलिसांनी कर्मा याला अटक केली होती. बाल न्यायालयाने मार्च २०१७ मध्ये कर्मा याला भा.दं.सं. व पॉक्सो कलमांखाली १० वर्षे सक्तमजुरी व २ लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. अटक झाल्यापासून सुरुवातीचे काही दिवस वगळता आरोपी कोलवाळ कारागृहात शिक्षा भोगत होता.
याचिकादार गायब झाल्याने आव्हान याचिका फेटाळली
फर्लोच्या काळात आरोपी जनक कर्मा याने बाल न्यायालयाच्या निवाड्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात ६ जून २०१८ रोजी आव्हान दिले होते. या याचिकेची प्रथम सुनावणी ३ एप्रिल २०१९ रोजी झाली. त्यावेळी याचिकादार फर्लोवरून पळून गेल्याचे निदर्शनास आले होते. खंडपीठाने वॉरंट जारी केला होता. त्यानंतर या याचिकेवरील काही सुनावण्या झाल्या; पण याचिकादार सापडू शकला नाही. शेवटी २४ सप्टेंबर २०२० रोजी खंडपीठाने ही याचिका फोटाळून लावली.


