प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गेल्या रविवारपासून सर्वत्र उपलब्ध झालेल्या गोवन वार्ता दिवाळी अंकाला गोव्यासह आजुबाजूच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांतील वाचकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनीही बुधवारी अंकाचे कौतुक केले.
गोवन वार्ता दरवर्षी नवनवीन संकल्पना, विषय घेऊन दिवाळी अंक प्रसिद्ध करत असतो. यावर्षीही गोव्यासह देशभरात धगधगत असलेल्या विषयांना न्याय देण्याचा आणि त्या विषयांच्या खोलात शिरून त्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न गोवन वार्ताने दिवाळी अंकाच्या माध्यमातून केला होता. याशिवाय गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील दर्जेदार कथाकारांच्या १३ कथा, ५० कवींच्या आशयघन कविता, माधुरी दीक्षित, हृतिक रोशन यांच्यासह माती संवर्धनाचे महत्त्व जगाला पटवून देत असलेल्या सद्गुरु जग्गी वासुदेव आदींच्या मुलाखती, प्रत्यक्ष अनुभवातून उतरलेले लेख, रिपोर्ताज अशा साहित्याने समृद्ध अंक वाचकांपर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे. मनोरंजनासह माहितीची खजिना मिळत असल्याने वाचकांनी गोवन वार्ता दिवाळी अंकावर कौतुकाचा वर्षाव सुरू केलेला आहे.
गोवन वार्ता दिवाळी अंक सर्वच बुक स्टॉलवर उपलब्ध करण्यात आलेला आहे. त्यामुळे वाचक आवर्जून अंक विकत घेऊन तो वाचत आहेत आणि आपल्या प्रतिक्रिया गोवन वार्ताला कळवत आहेत.


